Home बातम्या नेतृत्वबदलाचा प्रश्‍नच नाही : ब्रार

नेतृत्वबदलाचा प्रश्‍नच नाही : ब्रार

0

बेकायदा खाण घोटाळ्याचा अभ्यास करून आपण कॉंग्रेस अध्यक्षांना अहवाल सादर करणार असल्याचे श्री. ब्रार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. खाण व्यवसायविषयी शाह आयोगाचा अहवाल आल्यावर कॉंग्रेसची समिती त्याचा अभ्यास करेल असेही त्यांनी सांगितले. कालच्या चर्चेवेळी राष्ट्रीय सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांचीही उपस्थिती होती.

बाणावली येथील ताज एक्झोटिका हॉटेलात काल ब्रार व रेड्डी यांनी कॉंग्रेसच्या मंत्री व आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. दुपारी ३ वा. चर्चा सुरू झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमांव यांनी पुढाकार घेऊन बैठक दक्षिण गोव्यात आयोजित केली होती.

कालच्या बैठकीला मुख्यमंत्री दिगंबर कामत, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, बांधकाममंत्री चर्चिल आलेमांव, नगरविकास मंत्री ज्योकीम आलेमांव, शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेर्रात, वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा, वनमंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीस, आमदार प्रताप गावस, बाबू कवळेकर, पांडुरंग मडकईकर, फ्रान्सिस सिल्वेरा, आग्नेल फर्नांडिस, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स या १३ जणांची उपस्थिती होती. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकरही उपस्थित होते. गृहमंत्री रवी नाईक, आमदार दयानंद नार्वेकर, पंचायत मंत्री बाबू आजगावकर, आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस, सभापती प्रतापसिंह राणे, उपसभापती माविन गुदिन्हो, आमदार श्याम सातार्डेकर बैठकीला दिसले नाहीत. दरम्यान, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे अर्ध्या तासानंतर बैठकीतून परतले. मुख्यमंत्री दिगंबर कामत वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्या खासगी वाहनांतून बैठकीला आले. प्रताप गावस हे रात्री ८ वा. येऊन काही वेळाने परतले. गोव्यात बेकायदेशीर खाण प्रकरणावरून सध्या विषय गाजत असल्याने वस्तुस्थितीचा अभ्यास करण्यासाठी गोव्यात आल्याचे ब्रार म्हणाले. कॉंग्रेस भ्रष्टाचाराविरोधात असून दोषींवर कारवाई केली जाईल, तेथे तडजोड नसेल असे त्यांनी स्पष्ट केले. २०१२ मध्ये गोवा विधानसभेची निवडणूक होणार असल्याने प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष, समितीचे पदाधिकारी व आमदारांशी बैठक घेऊन तयारी करण्याचे काम जोरात चालूच राहील अशी माहिती त्यांनी दिली. प्रचाराची दिशा ठरवणे, जाहीरनामा तयार करणे अशा महत्वाच्या विषयांवर चर्चा करून काम सुरू केले जाईल.

कामत यांनी निवडणुकांना सामोरे जावे ः जावडेकर

गोव्यातील बेकायदा खाण घोटाळा हा देशातील सर्वांत मोठा घोटाळा असल्याने या प्रकरणामध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ गुंतल्याने मुख्यमंत्री कामत यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा सादर करून निवडणुकांना सामोरे जावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर यांनी काल केली.

बोगमाळो येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जावडेकर म्हणाले की, गोव्यातील बेकायदा खनिज घोटाळा हा २जी स्पेक्ट्रम घोटाळ्या पेक्षाही मोठा घोटाळा असून अब्जावधी रुपयांची उलाढाल या व्यवहारामध्ये झाली आहे. कामत सरकारमधील संपूर्ण मंत्रिमंडळ या घोटाळ्यात सापडले असून यावर उपाय म्हणून गोवा विधानसभा विसर्जित करून नव्याने निवडणुका घेण्याची मागणी जावडेकर यांनी केली आहे. गोव्यातील बेकायदा खनिज उत्खननामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देणे ही गोव्यातील जनतेची धूळफेक करीत असल्याचे सांगून घोटाळ्यातील कोट्यवधी रुपयांचा विकास होणे शक्य होते असे ते म्हणाले. आतापर्यंत झालेल्या घोटाळ्याची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री कामत यांना होती. गोव्यातील बेकायदा खाण व्यवसायामध्ये सुद्धा माजी केंद्रीयमंत्री ए. राजा यांचा हात असल्याचा आरोप जावडेकर यांनी यावेळी केला.

गोव्यातील बेकायदा खनिज घोटाळ्याच्या चौकशीची मागणी फेटाळून लावताना या प्रकरणाची यापूर्वीच चौकशी झालेली असून घोटाळ्यातील पैसे कशापद्धतीने वसुली करावी यावर विचार व्हायला हवा, असे जावडेकर म्हणाले. यावेळी भाजपा प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर उपस्थित होते.

मंत्रीआमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीस

ब्रार बाणावलीतील हॉटेलमध्ये दाखल झालेले असतानाच मुख्यमंत्री दिगंबर कामत काल संध्याकाळी ५.३० पर्यंत आल्तिनोच्या सरकारी निवासस्थानी होते. त्यांची भेट घेण्यासाठी गृहमंत्री रवी नाईक, वीजमंत्री आलेक्स सिकेरा, जलस्रोतमंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस, शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेर्रात, आमदार आग्नेल फर्नांडिस व पांडुरंग मडकईकर आले होते.

मोन्सेर्रात व मडकईकर यांनी आपला पाठिंबा मुख्यमंत्र्यांना असल्याचे सांगितले. त्यानंतर वरील आमदार, मंत्री ब्रार यांच्या भेटीसाठी गेले. खात्रीलायकरित्या मिळालेल्या माहितीनुसार काल सकाळी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतल्याचे कळते. त्यांच्या भेटीचे कारण समजू शकले नाही.

मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास : बाबूश

दरम्यान, शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेर्रात यांची भेट घेऊन नेतृत्व बदलाविषयी विचारल्यावर ते म्हणाले, आमचा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर पूर्ण विश्‍वास आहे. नेतृत्व बदलाचा प्रश्‍नच उद्भवत नाही.

पाटणेकरांचा कॉंग्रेस प्रवेश शुक्रवारी निश्‍चित

भाजपला सोडचिठ्ठी दिलेले डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर शुक्रवार दि. ३० रोजी सायंकाळी ४ वा. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पाटणेकरांच्या पक्ष प्रवेशानंतर काही दिवसांत त्यांचे असंख्य समर्थकही कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील असे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार राजेश पाटणेकर यांना कॉंग्रेस उमेदवारी निश्‍चित झालेली आहे. त्यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादी युती झाल्यास राष्ट्रवादीचे पांडुरंग राऊत व कॉंग्रेस नेते नरेश सावळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकलेखा अहवाल फुटल्याची चौकशी

गोव्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर हे लोकलेखा समितीचे अध्यक्ष असून बेकायदेशीर खाणींसंबंधीचा अहवाल विधानसभा अधिवेशनापूर्वी प्रसार माध्यमांकडे जाहीर करण्यात आलेला आहे. तो कोणी बाहेर फोडला याची चौकशी होणार असल्याचे श्री. ब्रार म्हणाले. सीलबंद अहवाल फुटलाच कसा याचा तपास होणार असल्याचे ते म्हणाले.