भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची पत्रकार परिषदेत टीका
काँग्रेस पक्ष नॅशनल हेराल्ड प्रकरणातील निर्णयाविरोधात प्रदर्शन करून जनतेची दिशाभूल करीत आहे. मुळात नॅशनल हेराल्ड प्रकरण 2012 मध्ये सुरू झाले. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. काँग्रेसने भाजपला या प्रकरणामध्ये दोष देणे योग्य नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल सांगितले.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात घोटाळा नसेल तर काँग्रेस नेत्यांनी ईडीच्या नोटिशींना उत्तर दिले पाहिजे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यावर नॅशनल हेराल्डची मालमत्ता लुबाडण्याचा आरोप केला होता. काँग्रेस नेत्यांनी नॅशनल हेराल्डची सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची मालमत्ता स्वतःच्या नावावर केली आहे. त्यावेळी नॅशनल हेराल्डला काँग्रेस पक्षाने 90 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. काँग्रेस नेत्यांनी यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक नवीन कंपनी स्थापन केली. नॅशनल हेराल्ड वरील 90 कोटी रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात त्यांची अडीच हजार कोटी रुपयांची मालमत्ता यंग इंडियाच्या नावे केली. यंग इंडियामध्ये सोनिया आणि राहुल गांधी हे प्रत्येकी 38 टक्के भागधारक आहेत. काँग्रेस पक्ष म्हणजे पैशांची देवाण घेवाण करणारी मनी ट्रान्स्फर कंपनी नाही. तरी देखील त्यांनी यंग इंडिया सोबत आर्थिक देवाण-घेवाण केली आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केला.
माहिती घराघरात देणार
ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केल्याने काँग्रेस पक्ष आंदोलन करून धमकीची भाषा वापरत आहे. तसेच, या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाची सविस्तर माहिती घराघरांत पोहोचविण्यात येणार आहे, असेही दामू नाईक यांनी सांगितले.
भाजयुमोची निदर्शने
नॅशनल हेराल्ड प्रकरणी भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी येथील काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर काल निदर्शने केली. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कारवाईचे समर्थन करून काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणा दिल्या. तसेच त्यांच्या प्रतिमांचे दहन केले.

