कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून निर्देश; पावसाअभावी भातशेतीची कामे पूर्णत: ठप्प
राज्यातून पाऊस गायब झाल्याने भातशेतीसह अन्य भाजीपाला लागवड धोक्यात आली आहे आणि तरवा लागवडीची कामे देखील पूर्णपणे खोळंबली आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना राज्यातील शेतीचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. तसेच, राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाल्यास त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यात पडणाऱ्या कमी पावसामुळे शेतीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी खात्याला सर्वेक्षण करून पिकांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, शेतकऱ्यांना भात व इतर पिकांच्या लागवडीविषयी आवश्यक मार्गदर्शन करण्याची सूचना करण्यात आली आहे. कृषी खात्याचे विभागीय अधिकारी आपापल्या भागातील भात व इतर पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करणार आहेत. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात जून महिन्याच्या अखेरपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी भात व इतर पिकांच्या लागवडीच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. आता, तरवा लागवड करण्याच्या वेळी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतकरी चिंताक्रांत बनले आहेत. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, तेथील शेतकरी त्या पाण्याचा वापर करून तरव्याची लागवड करीत आहे; पण ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, त्या भागातील शेतकरी अडचणीत आले आहेत.
कृषी संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी
राज्य सरकारच्या कृषी संचालनालयाने सध्याच्या कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्यात संरक्षक सिंचन, आवश्यक असल्यास भात लावणी पुढे ढकलणे, जलसंधारण आणि पुरेसा पाऊस होईपर्यंत खतांचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, भात उत्पादक शेतकऱ्यांना विभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहण्याची सूचना करण्यात आली आहे. भात पिकांचे नुकसान झाल्यास माहिती द्यावी. सरकारच्या शेतकरी आधार निधीच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे, असे सूचनेत म्हटले आहे.
राज्यावर पाऊस रुसला
राज्यावर पाऊस रुसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून, येत्या 21 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर नसणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. उत्तर तसेच दक्षिण गोव्यातील बहुतेक भागांत 21 रोजीपर्यंत पावसाच्या हलक्या सरी अथवा मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले असून, वरील काळात कुठेही मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सध्या राज्यात उन्हाळ्यासारखे कडक व प्रखर ऊन पडत असून, त्यामुळे एका बाजूला शेती धोक्यात आली असून, दुसऱ्या बाजूला पावसाअभावी धरणांतील पाणीसाठ्यावरही परिणाम झाला आहे. पावसाने अशीच दडी मारल्यास पुढील वर्षी उन्हाळ्यात राज्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
आता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्ट महिन्यात किती पाऊस पडतो, त्यावर पाण्याचे गणित अवलंबून राहणार आहे. स्थिती अशीच राहिल्यास राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

