नीतिश काय करणार?

0
20

भारतीय जनता पक्ष आणि नीतिशकुमार यांचे संयुक्त जनता दल किंवा जेडीयू यांचे संबंध पुन्हा एकदा घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आलेले दिसत आहेत. नीतिश यांनी आज आपल्या पक्षाच्या सर्व आमदार – खासदारांची बैठक बोलावली आहे, त्यात बहुसंख्य लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात त्यावर नीतिश यांची भावी रणनीती अवलंबून असेल. भाजप आणि जेडीयूचे संबंध तुटण्याइतपत सध्या ताणले गेले आहेत हे मात्र स्पष्ट आहे. भाजप आणि जेडीयू यांच्यातील संबंध नेहमीच सोयीनुसार कडूगोड राहिले आहेत. यापूर्वीही भाजपपासून फारकत घेत राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्यास नीतिश यांनी मागेपुढे पाहिले नव्हते. त्यामुळे आता पुन्हा एकवार ते भाजपाला खिंडीत पकडून वेगळे होणार का हे पाहावे लागेल.
भाजप बिहारमध्ये आपले पाय रोवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी जेडीयूला पक्षाने सोबत घेतले. नीतिश यांच्या स्वच्छ प्रतिमेचा वापर करून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. हे करीत असतानाच दुसरीकडे जेडीयूतील नीतिश यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्नही भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून होत असल्याची नीतिश यांची भावना बनली आहे. आपल्या पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात एकच जागा देणे, आपल्याला न विचारता आर.सी.पी. सिंग यांना मंत्री बनवणे, आपले नेतृत्व कमकुवत करण्याच्या आडून आडून हालचाली करणे, गेल्या निवडणुकीमध्ये चिराग पास्वान यांचा वापर करून आपल्या पक्षाची मते विभागली जातील असा प्रयत्न करणे अशा अनेक गोष्टींमुळे नीतिश भाजपा नेतृत्वावर नाराज आहेत. सुशील मोदी यांच्यासारख्या नितिश यांना उपमुख्यमंत्री म्हणून उत्तम साथ देणार्‍या आपल्या नेत्याला भाजपने राज्याबाहेर पाठवले आहे. त्यांच्याजागी ज्या तारकिशोर प्रसाद व रेणू देवी यांना उपमुख्यमंत्रिपद दिले आहे, त्यांचे तळागाळाशी नाते नाही असे नीतिश यांचे म्हणणे आहे. भाजपाचे सर्व निर्णय केंद्रातून घेतले जातात व आपल्याला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न होतो हे वारंवार अनुभवास आल्याने नीतिश संतप्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या नीती आयोगाच्या महत्त्वपूर्ण बैठकीसही ते अनुपस्थित राहिले होते. केंद्र सरकारच्या गेल्या अनेक बैठकांना त्यांनी दांडी मारली आहे. नुकतेच पक्षातून बाहेर पडलेले आर. सी. पी. सिंग यांच्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी असलेल्या जवळिकीमुळेही नीतिश संतप्त आहेत. भाजपाने केंद्रीय मंत्रिपद दिलेल्या आपल्या या नेत्याला राज्यसभेचा दुसरा कार्यकाळ देण्यास नीतिश यांनी संमती दिली नाही, त्यामुळे ते पक्षाबाहेर पडले आहेत. आपल्या राज्याच्या कारभारात अमित शहा रिमोट कंट्रोलने आपला प्रभाव ठेवत आहेत अशी नीतिश यांची भावना बनलेली आहे. सभापतींना पदावरून हटवण्यासारखी साधी मागणीही भाजपकडून पूर्ण केली जात नाही, खुद्द नीतिश मंत्रिमंडळातील भाजपच्या मंत्र्यांची निवड देखील नीतिश यांना विश्वासात न घेता भाजपाकडून परस्पर केली गेली आहे. या सगळ्यामुळे नीतिश संतप्त आहेत. त्यामुळे या सगळ्या संतापाची परिणती हे संबंध ताणले जाण्यात झाली आहे.
खरे तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आणि त्यानंतर वर्षभरात होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी नीतिशकुमारांचा चेहरा भाजपला जनतेपुढे ठेवण्यासाठी हवा आहे. मात्र, अजून काही तसे ठरलेले नाही म्हणत जेडीयू प्रदेशाध्यक्षांनी त्याला बगल दिली आहे. याचाच अर्थ पुढील निवडणुकीत कोणासोबत जायचे यासंदर्भात नीतिश चाचपणी करीत आहेत असा घेता येतो. मात्र, त्यांच्या या पवित्र्याला त्यांच्या पक्षाच्या आमदार – खासदारांची साथ लाभणार का? की महाराष्ट्रात शिवसेनेसंदर्भात जे घडले, तसे काही जेडीयूमध्ये घडवण्याच्या प्रयत्नात भाजपाचे केंद्रीय नेतृत्व आहे असा प्रश्नही निर्माण झालेला आहे. नीतिशकुमार विरोधात जाणार असतील तर त्यांच्या पक्षाला कमकुवत करण्यासाठी कोणत्याही थराला जायला भाजपाचे केंद्रीय नेतृत्व मागेपुढे पाहणार नाही. साम-दाम-दंड-भेद नीतीनुसार आधी सामोपचाराने नीतिश यांचे मन वळवण्याचा प्रयत्न होईल. नाही तर इतर मार्गही हाताळले जाऊ शकतात.
आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरोधात लढायला जेडीयूचे खासदार तयार असतील का, आमदारांनाही भाजपाच्या विरोधात जाण्यात स्वारस्य आहे का, वेळ पडल्यास मध्यावधी निवडणुकीस सामोरे जाण्यास ते तयार आहेत का, नीतिश यांची आपल्या पक्षावर किती पकड आहे याचा उलगडा आजच्या पक्षाच्या बैठकीमध्ये होणार आहे. आपला उद्धव ठाकरे होऊ द्यायचा नसेल तर भाजपाशी ताणले गेलेले संबंध पार तोडायचे की सामोपचाराला जागा ठेवायची याची रणनीती पक्षातील वातावरण पाहून नीतिश यांना आखावी लागेल हे तर उघड आहे.