28 C
Panjim
Tuesday, September 22, 2020

निष्फळ गुर्‍हाळ

जोवर पाकिस्तान भारतासंदर्भातील आपली दुटप्पी नीती सोडत नाही, तोवर त्या देशासमवेत चर्चेची गुर्‍हाळे घालण्यात काहीही अर्थ नाही हे वारंवार सिद्ध होत आले. काल भारत आणि पाकिस्तानच्या विदेश सचिवांदरम्यान  ‘हार्ट ऑफ एशिया’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर जी औपचारिक बैठक झाली, त्यातही वेगळे काही घडले नाही. पाकिस्तानने तेथे ‘काश्मीर’चा राग आळवला आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार आणि काश्मिरी जनतेच्या इच्छेनुरूप ‘न्याय्य तोडगा’ काढावा अशी मागणी भारताकडे केली. हे म्हणजे एखाद्याशी मैत्रीचा हात पुढे करायला जावे आणि त्याने फाड्‌कन मुस्काटात मारावी असे झाले आहे. वास्तविक, या बैठकीत पठाणकोट हल्ल्यानंतर उभय देशांत निर्माण झालेली कोंडी फुटणार असल्याने काश्मीरसारखा वादग्रस्त विषय उपस्थित व्हायला नको होता. संवादाला नुकतीच कुठे पुन्हा सुरूवात होत होती. परंतु या पहिल्याच बैठकीमध्ये काश्मीरचा विषय उपस्थित करून पाकिस्तानने सापाला कितीही दूध पाजले तरी साप तो सापच हीच म्हण खरी केली आहे. ज्या ज्या वेळी भारत मैत्रीचा हात पुढे करतो, त्या त्या वेळी त्या सकारात्मक वातावरणावर विरजण टाकणारी कृती पाकिस्तानकडून घडते हाच आजवरचा इतिहास आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या राजनैतिक संबंधांमध्ये पाकिस्तानकडून वारंवार होणारा विश्वासघात हाच खोडा निर्माण करीत असतो. वाजपेयींनी पाकिस्तानशी मैत्रीचे स्नेहपूर्ण धागे जुळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु त्यांच्या पाठीत कारगिलचा खंजिर खुपसला गेला. मोदींनी सत्तेवर येताक्षणी नवाज शरीफांना आपल्या शपथविधी सोहळ्याला बोलावले, त्यांच्याकडून झालेल्या विश्वासघाताच्या जखमा ताज्या असूनही झाले गेले विसरून पुनश्च हरि ओम् म्हणण्याचा प्रयत्न केला. परंतु शरीफ यांची पाठ वळते न वळते तोच पुन्हा पाकिस्तानी भूमीवरून भारताविरुद्धची कारस्थाने सुरू झाली. उफामध्ये गळाभेट होते न होते तोच काश्मिरी फुटिरतावाद्यांशी उघडउघड हातमिळवणी करून दोन्ही देशांमधील सुधारू पाहणार्‍या संबंधांवर पाकिस्तानने पाणी फेरले. पॅरिसमध्ये हवामान परिषदेवेळी मोदींनी पुन्हा एकवार शरीफांची गळाभेट घेतली. सुषमा स्वराज एका परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानमध्ये जाऊन आल्या. मोदींनी राजकीय शिष्टाचार बाजूला ठेवून नाताळच्या दिवशी नवाज शरीफांच्या घरी आकस्मिक भेट देऊन त्यांना चकित केले. परंतु एवढ्या आत्मियतेच्या या पावलांचे फळ काय मिळाले? पठाणकोट!! आतादेखील काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले सुरू आहेत. पठाणकोट हल्ला परतवला गेल्यावर तरी पाकिस्तान सीमेपारच्या सैतानांना आवरेल अशी अपेक्षा होती, परंतु त्यानंतर पाम्पौर घडले. त्यानंतर सातत्याने हल्ले होत आहेत. अशा अविश्वासाच्या वातावरणात शांतिवार्ता कशी काय सुरू होईल? क्रिकेटपासून व्यक्तिगत संबंधांपर्यंत हरेक गोष्टीद्वारे मोदी सरकारने पाकिस्तानशी असलेले आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न आजवर केला, परंतु पलीकडून केवळ रक्ताळलेले हातच पुढे केले जात असतील तर यातून शांतीचे कबुतर झेप कसे घेईल? स्वतःच्या भूमीत रुजलेल्या आणि फैलावलेल्या दहशतवादाची मुळे उखडून काढण्याऐवजी बलुचिस्तानमधील अशांततेमागे भारतच आहे असा कांगावा केल्याने पाकिस्तानचा चेहरा आंतरराष्ट्रीय पातळीवर उजळू शकत नाही हे त्यांना कळायला हवे. मुंबई हल्ला आणि पठाणकोट हल्ला यांच्याशी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा संबंध होता याचे सबळ पुरावे उपलब्ध असूनही जर पाकिस्तान मसुद अजहरच्या मुसक्या आवळणार नसेल तर हा संवाद पुढेच सरकू शकत नाही. कालच्या विदेश सचिवांदरम्यानच्या चर्चेमध्ये दोन्ही देशांना ग्रासून राहिलेल्या दहशतवादावर कशी मात करता येईल यासंबंधी सकारात्मक चर्चा झाली असती तर तिला काही अर्थ राहिला असता. परंतु मुंबई हल्ल्यापासून मसुद अजहरपर्यंत भारताने उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर पाकिस्तान जर नकारघंटाच वाजवत राहणार असेल आणि उलट ‘काश्मीर, काश्मीर’ चाच जप करीत राहणार असेल, तर अशाने शांतिवार्ता पुन्हा प्रस्थापित होऊच शकणार नाही. उलट अशाने काश्मिरातील फुटिरतावाद्यांना नवे पाठबळ मिळेल. सध्या काश्मीर खोर्‍यातील वातावरण तापले आहेच. त्यावर पाक आपली पोळी भाजू पाहतो आहे. असल्या निष्फळ चर्चांची गुर्‍हाळे हवीत तरी कशासाठी? भारतानेही आता अकारण बोटचेपी वृत्ती न दाखवता कणखर व्हायला हवे. मैत्रिपूर्ण संबंधांतून साधणार्‍या व्यापारी आणि व्यावसायिक हितापेक्षा राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे आहे.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अल्झायमरला दूर ठेवण्यासाठी….

डॉ. गजानन पाणंदीकर(न्युरॉलॉजिस्ट- हेल्थवे हॉस्पिटल) २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर या रोगाचा...

कोरोना विरोधात रसायन द्रव्ये

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) २०२० वर्ष फक्त जगायचे, आरोग्य सांभाळायचे. बस्स..! कोणतीच चिंता नको, कसे होईल ही...

भाजणे : लक्षणे, कारणे, उपचार भाग – २

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर(श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) कित्येक लोकांचा असा गैरसमज असतो की भाजलेल्या जखमेवर टूथपेस्ट, क्रीम, बटर इत्यादी...

गायीचे दूध आणि त्याचे स्वरूप भाग – ३

वैद्य स्वाती हे. अणवेकरम्हापसा आपल्या देशी गाईंचे संगोपन अगदी कमी खर्चात होते. म्हणून त्यांना बेवारशासारख्या रस्त्यावर न सोडता...

हडेलहप्पी नको

संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...

ALSO IN THIS SECTION

हडेलहप्पी नको

संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...

मेहेरबानी का?

गोव्यातील खासगी इस्पितळांवर राज्य सरकार आणि विशेषतः आरोग्य खाते फारच मेहेरबान दिसते. देशातील बहुतेक सर्व राज्यांनी खासगी इस्पितळांतील कोरोना रुग्णांवरील उपचाराचे दर...

असंतोषाचे ‘बादल’

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सत्तराव्या वाढदिनीच त्यांच्या मंत्रिमंडळातील विश्‍वासू मित्रपक्ष शिरोमणी अकाली दलाच्या एकुलत्या एक मंत्री हरसिम्रतकौर बादल यांनी सरकारच्या ‘शेतकरीविरोधी...

चौकशी करा

राज्यातील बांधकाम मजूर घोटाळाप्रकरणी निवृत्तीच्या उंबरठ्यावरून लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी दिलेला निवाडा सरकारची अब्रू वेशीवर टांगणारा आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये बांधकाम...

दिलासा आणि भरवसा

कोरोनाने मानवाची सर्वश्रेष्ठत्वाची अहंता उद्ध्वस्त केली. डोळ्यांना न दिसणारा, संवेदनांना न जाणवणारा एखादा अतिसूक्ष्म विषाणू देखील ह्या अब्जावधी माणसांना एवढे हतबल करू...