>> अजित पवार यांनी दिली माहिती
>> पुस्तक प्रकाशन सोहळ्यात केली होती राजीनाम्याची घोषणा
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर फेरविचार करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. काल मुंबईत झालेल्या ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथा पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनी अचानक आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.
शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला गेले आणि त्यांनी कार्यकर्त्यांची भूमिका सांगितली. त्यानंतर शरद पवारांनी या निर्णयाचा फेरविचार करू परंतु कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले तर आपला निर्णय बदलणार नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
पुस्तक प्रकाशनानंतर शरद पवार सिल्वर ओक या आपल्या निवासस्थानी निघून गेले. त्यावेळी तेथे अजित पवार यांच्यासह विद्या चव्हाण, वंदना चव्हाण, भुजबळ, वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड यांनी पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्या कानावर घातल्या. दरम्यान यावेळी पवार यांच्या या निर्णयाविरोधात वाय. बी. चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. तसेच काही कार्यकर्ते उपोषणाला बसले होते.
अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी, मी माझा निर्णय दिला आहे. विचार करायला दोन ते दिवस लागतील. तेवढे द्या. कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी जावे. उपोषणाला बसलेला कार्यकर्ता दिसला तर मी माझा निर्णय बदलणार नाही अशी आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्याला राज्यातून, देशातून फोन येत आहेत. त्यामुळे आपल्याला या सगळ्यांचा विचार करण्यासाठी दोन-तीन दिवसांचा अवधी लागेल. परंतु कोणीही राजीनामा देऊ नये असे सांगितले.
कार्यकर्ते आक्रमक
शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. तसे न केल्यास आपणही राजीनामा देण्याचा निर्धार सगळ्यांनी केला. त्यानंतर शरद पवारांनी फेरविचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाध्यक्षांचे राजीनामे
महाराष्ट्रात उस्मानाबाद, बुलढाणा जिल्ह्याच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. जळगावतील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांनी निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा आम्हीही काम करणार नाही, आमचे देखील राजीनामे आम्ही पक्षाकडे पाठवू असे सांगितले. तसेच राज्यातील दोन जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. राज्यभरातून कार्यकर्ते शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करत असल्याचे दिसून येत आहे.
राजीनामा स्वीकारणार नाही
कुणीही मुंबईत येण्याचा प्रयत्न करू नये. जे कुणी राजीनामे देत आहेत, त्यांचा एकाचाही राजीनामा स्वीकार केला जाणार नाही. हा राष्ट्रवादी परिवाराचा प्रश्न आहे. आपल्या प्रश्नासाठी ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही, अशा सामान्य नागरिकांना वेठीस धरता कामा नये, या सूचना शरद पवारांनी दिल्या आहेत, अशीही माहिती अजित पवारांनी दिली.