इंडिया’ आघाडीचे दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन; राहुल गांधी, प्रियांका गांधींसह विरोधी खासदारांना घेतले ताब्यात
मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (एसआयआर) प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाविरोधातील काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीचा संघर्ष बुधवारी आणखी तीव्र झाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या खासदारांनी दिल्लीत आंदोलन करीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक विरोधी खासदारांना ताब्यात घेतले. दरम्यान, मंगळवारीही राहुल गांधी आणि विरोधी खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढला होता. त्यावेळीही पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर काल सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काल झालेल्या बैठकीनंतर विरोधी खासदारांनी जंतरमंतरकडे जाण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कथित ‘मतचोरी’विरोधात आवाज उठवत, लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. आंदोलनकर्त्यांनी ‘नो व्होट चोरी, नो डेमोक्रसी चोरी’ आणि ‘इलेक्शन कमिशन, नॉट बीजेपी कमिशन’ अशा घोषणा असलेले फलक हातात घेतले होते.
मोर्चा जंतरमंतरकडे जात असताना पोलिसांनी मार्गात मोठा बंदोबस्त ठेवून अडथळे उभारले. पोलिसांनी खासदारांना पुढे जाण्यापासून रोखल्यानंतर राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी यांना जबरदस्तीने उचलून पोलिसांच्या बसमध्ये नेले. त्यानंतर प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह महिला नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
या आंदोलनाची पार्श्वभूमी मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनावरून निर्माण झालेल्या वादाची आहे. विरोधकांनी एसआयआर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप केला आहे. पात्र मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करावीत आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता आणावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. निवडणूक आयोग आणि भाजपने मात्र विरोधकांचे आरोप फेटाळून लावले असून, मतदारयादीतील अपात्र नावे दूर करण्यासाठी ही प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले
आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधातील विरोधकांचा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात एसआयआर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून संसदेसह देशाच्या राजकीय पटलावरही संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
प्रियंका गांधी रस्त्यावर झोपल्या
जंतरमंतरच्या दिशेने जात असलेल्या बसेस पोलिसांनी थांबवल्यानंतर खासदार प्रियंका गांधी या आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. यावेळी प्रियंका गांधी या थेट रस्त्यावर झोपल्या. त्यानंतर पोलिसांनी प्रियंका गांधी यांनाही ताब्यात घेतले. या सर्व आंदोलनादरम्यान दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी मेडल : राहुल गांधी
विरोधी पक्षाच्या खासदारांवर आणि स्वतःवर दाखल झालेल्या एफआयआरबाबत राहुल गांधींनी काल भाष्य केले. माझ्याविरुद्ध आतापर्यंत 45 एफआयआर दाखल झाले आहेत. आता माझी इच्छा आहे की माझ्याविरुद्ध 100 एफआयआर दाखल व्हावेत. कारण प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एका मेडलसारखा आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांनी केलेल्या निदर्शनांनंतर दाखल एफआयआरला प्रत्युत्तर दिले.

