निवडणूक आघाडीसाठी आरजीपी,आपसोबत 2 दिवसांत चर्चा : काँग्रेस

0
12

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची माहिती; गोवा फॉरवर्डशी युतीबाबत संभ्रम कायम

आगामी 2027 च्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजीपी) आणि आम आदमी पक्ष (आप) यांच्याशी निवडणूक आघाडीच्या विषयावर दोन दिवसांत चर्चा केली जाणार आहे, असे गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पक्ष मुख्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल स्पष्ट केले.

आगामी विधानसभा निवडणुकीतील प्रस्तावित आघाडीबाबत आरजीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार वीरेश बोरकर आणि आपचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांच्याशी यापूर्वीच चर्चा केली आहे. आता, आघाडीच्या विषयावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. ते दोघेहेी व्यस्त असल्याने बुधवारी चर्चेला वेळ मिळू शकला नाही. आता, शुक्रवारपर्यंत आघाडीच्या विषयावर चर्चा केली जाणार आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.

गोवा फॉरवर्ड पक्षासोबत निवडणूक आघाडीच्या विषयावर चर्चा तूर्त थांबलेली आहे. गोवा फॉरवर्डने काँग्रेससोबत आघाडीची चर्चा तूर्त थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा फॉरवर्डने काँग्रेससोबत आघाडीबाबत पुन्हा निर्णय घेतल्यानंतरच चर्चा होईल. गोवा फॉरवर्डसोबत आघाडीबाबत आम्ही सकारात्मक आहोत, असेही चोडणकर यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यात निवडणूक आघाडीबाबत चर्चेला सुरुवात झाली होती. तथापि, गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित विरोधी आमदारांच्या बैठकीच्या निमंत्रणावरून वाद निर्माण झाल्यानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत काँग्रेससोबत निवडणूक आघाडीच्या विषयावर चर्चा तूर्त थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आघाडीच्या चर्चेसाठी समिती नेमणार : बोरकर
आरजीपीच्या प्रदेश अध्यक्षाची लवकरच निवड केली जाणार असून, कॉँग्रेससोबत आघाडीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी वेगळी समिती स्थापन केली जाणार आहे, अशी माहिती आरजीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार वीरेश बोरकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राजकीय व्यवहार समितीची नियुक्ती
गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या राजकीय व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी माणिकराव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गोवा प्रदेश कॉँग्रेस पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीला मान्यता दिली आहे. या समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, डॉ. अंजली निंबाळकर, एदुआर्द फालेरो, विरियातो फर्नांडिस, फ्रान्सिस सार्दिन, रमाकांत खलप, अमित पाटकर, एम. के. शेख, ॲड. कार्लुस फेरेरा, आल्टन डिकॉस्टा, सुनील कवठणकर, दत्ता नाईक, रमाकांत आंगले व इतरांचा समावेश आहे.