निवडणुकीला धार्मिक रंग

0
5
  • गुरुदास सावळ

गोव्यात तीन नवे विक्रम नोंदविणारे श्रीपाद नाईक यांना केंद्रीय मंत्रिमंडळात बढती मिळण्याची बरीच शक्यता आहे. किंबहुना तब्बल सहा वेळा निवडून येणाऱ्या खासदाराला कॅबिनेट मंत्रिपद मिळालेच पाहिजे. नाईक यांना या खेपेला कॅबिनेट मंत्रिपद व महत्त्वाचे खाते नक्कीच मिळेल, असे भाजपचे सर्वच नेते एकमेकांना सांगत आहेत.

भाजपाचे उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी लोकसभा निवडणुकीत तीन विक्रम करत नवा इतिहास घडवला. सतत सहाव्यांदा लोकसभेवर निवडून येऊन त्यांनी दक्षिण गोव्याचे माजी खासदार एदुआर्द फालेरो यांचा पाच वेळा निवडून येण्याचा विक्रम मोडीत काढला. अडीच लाखाहून अधिक मते मिळवून आणखी एक विक्रम नोंदविला, तर तब्बल 1 लक्ष 11 हजारांच्या मताधिक्क्याने तिसरा विक्रम केला. श्रीपाद नाईक आता म्हातारे झाले आहेत. लोकांची कामे ते करत नाहीत अशी टीका भाजपच्याच काही नेत्यांनी केली होती. पंच्याहत्तरी झाल्याने ज्येष्ठांच्या यादीत समावेश करून लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांच्या पंगतीला भाऊंना बसविण्याची तयारी काही लोकांनी चालविली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अशा प्रसंगी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. भंडारी समाजाचे नेते असलेले सद्गृहस्थ श्रीपाद नाईक यांच्यावर अन्याय होईल असे वाटल्याने बऱ्याच वर्तमानपत्रांनी अप्रत्यक्षपणे भाऊंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. श्रीपाद नाईक हेच भाजपाचे उमेदवार असतील अशी घोषणा साखळी परिसरातील एका जाहीर सभेत करून मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला. भंडारी समाजाच्या बहुतेक सर्व नेत्यांनी श्रीपाद नाईक यांना भाजपने तिकीट नाकारले तर ही जागा भाजपला गमवावी लागेल असा इशारा अप्रत्यक्षरीत्या दिला. त्यामुळे अखेर त्यांना तिकीट मिळाले.

रमाकांत खलप यांच्यासारखे तुल्यबळ प्रतिस्पर्धी असूनही श्रीपाद नाईक यांनी 1 लाख 11 हजार मतांची आघाडी घेतली. 20 पैकी 17 मतदारसंघांत भाऊंना भरघोस मते मिळाली. केवळ तीन मतदारसंघांत काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप यांना नाममात्र आघाडी मिळाली. हळदोणे, कळंगुट व सांताक्रूझ हे ते तीन मतदारसंघ होत. हे मतदान विचारात घेता रुडॉल्फ फर्नांडिस व मायकल लोबो यांना आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे.

गोव्यात तीन नवे विक्रम नोंदविणारे श्रीपाद नाईक यांना केंद्रीय मंत्रिमंडळात बढती मिळण्याची बरीच शक्यता आहे. किंबहुना तब्बल सहा वेळा निवडून येणाऱ्या खासदाराला कॅबिनेट मंत्रिपद मिळालेच पाहिजे. नाईक यांना या खेपेला कॅबिनेट मंत्रिपद व महत्त्वाचे खाते नक्कीच मिळेल, असे भाजपचे सर्वच नेते एकमेकांना सांगत आहेत. मनोहर पर्रीकर केंद्रीय मंत्री असताना ते तिसऱ्या क्रमांकावर होते. श्रीपाद नाईक यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच अन्याय करणार नाहीत याची भाजपा कार्यकर्त्यांना खात्री आहे.

सत्तरीतील वाळपई व पर्ये या दोन मतदारसंघांतील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत नवा इतिहास रचला. श्रीपाद नाईक यांना मोठी आघाडी मिळावी म्हणून विश्वजित राणे आणि त्यांची पत्नी डॉ. दिव्या राणे यांनी रात्रंदिन काम केले. मतदारांनी त्यांना जो प्रतिसाद दिला तो पाहता यापुढे विधानसभा निवडणुकीत त्यांना पाडणे म्हणजे सुळावरची पोळी ठरेल! ‘आरजी’ पार्टीचे मनोज परब तेवढेच विश्वजित राणे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्याचे धाडस करू शकतील. काँग्रेस पक्षाला यापुढे वाळपई व पर्ये मतदारसंघांत उमेदवार मिळणे कठीण दिसते.

डिचोली, मये व प्रियोळ मतदारसंघांनी भाजपाला मोठे मतदान केले. ‘आरजी’ पार्टीचे मनोज (तुकाराम) परब यांना प्रत्येक मतदारसंघात सरासरी 2 हजार मते मिळतील अशी अपेक्षा होती अन्‌‍ या अपेक्षेप्रमाणे त्यांना मते मिळाली. ते शर्यतीत नसते तर या 40 हजारांपैकी सुमारे 35 हजार मते खलप यांना मिळाली असती. मात्र त्याचा कोणताही परिणाम निकालावर झाला नसता.

उत्तर गोव्यातील काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप यांना एकूण 1 लाख 41 हजार मते मिळाली. उत्तर गोव्यातून रमाकांत खलप व विजय भिके हे दोघेच उमेदवारीसाठी इच्छुक होते. खलप व विजय भिके यांची तुलना केल्यानंतर खलप यांना तिकीट मिळाले. गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर व विरोधी पक्षनेते युरी आलेमांव वगळल्यास उत्तर गोव्यातील इतर काँग्रेस नेत्यांनी खलप यांना प्रचारात फारशी मदत केली नाही. खलप यांची एकही मोठी सभा झाली नाही. दिल्लीचा एकही नेता उत्तर गोव्यात आला नाही. दक्षिण गोव्यात शशी थरूर वगळता इतर कोणी नेता दिसला नाही. काँग्रेस पक्षाची बँक खाती ईडीने सील केल्याने उमेदवारांना दिल्लीहून योग्य अशी मदत मिळू शकली नाही. एखादी जाहीर सभा घ्यायची असेल तर किमान 30 लाख खर्च येतो. 5-6 हजार लोक आणायचे म्हणजे एवढा खर्च येणारच. सभेला येणाऱ्या लोकांना प्रत्येकी रोख 1 हजार आणि 1 शीतपेय बाटली व वडापाव द्यावा लागतोच. आणि लोक जमले नाहीत तर पत्रकार रिकाम्या खुर्च्यांचे फोटो छापून नाचक्की करतात. त्यामुळे काँग्रेसने जाहीर सभा घेणे टाळले.

सत्ताधारी भाजपा पक्षाचे उमेदवार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तसेच भाजपा पक्षाचे नेते रात्रंदिन कार्यरत होते. त्याशिवाय पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख आदी कार्यकर्त्यांची फळी कार्यरत होती. यांपैकी किमान तीन कार्यकर्ते माझ्या घरी येऊन गेल्याचे मला आठवते. आमच्या पत्रकार नगरात काँग्रेसचे कोणीच कार्यकर्ते कधीच फिरकले नाहीत, तरीही खलप यांना एवढी मते कशी मिळाली हेच कळत नाही.

भाजपाच्या कोअर कमिटीने छाननी करून दक्षिण गोव्यासाठी नरेंद्र सावईकर व बाबू कवळेकर यांची नावे दिल्लीत पाठवली. हे दोघे उमेदवार निवडून येण्याची क्षमता होती. मात्र दोघेही उमेदवार पडेल असल्याने त्यांची नावे वगळण्यात आली. हे दोन्ही उमेदवार पडेल असल्याने नको असे सांगणे योग्य न वाटल्याने महिला राखीव उमेदवार शोधा असा आदेश दिला. मग कोअर कमिटीची बैठक घेऊन अनेक नामवंत लेखक, कलाकार आणि राजकीय नेत्यांच्या नावावर खल करण्यात आला. या महिला नेत्यांकडे निवडून येण्याची क्षमता कमी आहे यावर समितीचे एकमत झाले. तसा अहवाल श्रेष्ठींना सादर करण्यात आला. त्यानंतर सौ. पल्लवी श्रीनिवास धेंपो यांचे नाव पुढे आले. त्यांनी मान्यता दिल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सौ. पल्लवी धेंपो राजकारणात नव्या असल्या तरी सर्वांनी मान्यता-नाव जाहीर करून उमेदवारी अर्ज भरला. दिगंबर कामत, नव्याने मंत्रिपद गळ्यात पडलेले आलेक्स सिक्वेरा, मगोचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर आदी बड्या राजकीय नेत्यांनी आशीर्वाद दिला. सौ. धेंपो यांनी प्रचाराचा धुमधडाकाच लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून पन्ना प्रमुखांपर्यंत सर्वांनी तन-मन-धन अर्पून काम केले. विरोधी काँग्रेस उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचा पक्ष पूर्णपणे असंघटित, विस्कळीत असल्याने त्यांच्या प्रचारात काहीच दम दिसत नव्हता. मुरगाव व सासष्टी वगळता इतर तालुक्यांत ते पोचलेच नाहीत. ‘आरजी’ पार्टीचे उमेदवारही प्रचारात बरेच मागे होते. या सगळ्या गोष्टी विचारात घेता भाजपा उमेदवाराचा विजय स्पष्ट दिसत होता. भाजपाचे बडे नेतेच नव्हे तर सामान्य कार्यकर्तेही खूश होते. फार मोठी आघाडी नसली तरी किमान 100 मतांनी तरी सौ. पल्लवी जिंकतील असे मलाही वाटत होते. त्यामुळे दक्षिण गोव्याचा निकाल ऐकून मलाही धक्का बसला. गेल्या 50 वर्षांतील माझ्या राजकीय अभ्यासाला इतका मोठा धक्का कधीच बसला नव्हता. दक्षिण गोव्यात सौ. पल्लवी यांचा विजय निश्चित असल्याचा गुप्तचर यंत्रणांचाही अहवाल होता.

सासष्टी तालुक्यातील काही मतदारसंघांत काँग्रेस उमेदवाराला भाजपापेक्षा जास्त मते मिळतील असा अंदाज होता; पण मडगाव वगळता इतर सर्व मतदारसंघांत काँग्रेस उमेदवाराला जी आघाडी मिळाली ती अनपेक्षित आहे. ही जादू कशी घडली याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. काही लोकांनी धार्मिक स्तरावर प्रचार केल्याने अल्पसंख्याकांची मते संघटित झाली आणि ही सगळी एकगठ्ठा मते काँग्रेसला मिळाली. मुरगाव व सासष्टी तालुक्यातीलच नव्हे तर सांगे व फोंडा तालुक्यातील अल्पसंख्याक मतेही अशीच संघटित झाली. भाजपाचे सरकार आल्यास अल्पसंख्याकांना धोका आहे असे वातावरण निर्माण झाले व त्याचा फटका सौ. धेंपो यांना बसला. प्रचाराचा हा कल पाहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत माविन गुदिन्हो, नीलेश काब्राल, मायकल लोबो, दिलायला लोबो, रुडॉल्फ फर्नांडिस यांना धोका संभवतो. कोणी कितीही प्रचार केला तरी बाबूश व जेनिफर पणजी आणि ताळगावात बाजी मारणारच याबद्दल शंका नाही.

भाजपाचे अत्यंत निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते नीलेश काब्राल यांना डच्चू देऊन पक्षबदलू आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देण्यात आले होते; पण लोकसभा निवडणुकीत या मंत्रिपदाचा भाजपाला काडीचाही लाभ झाला नाही. उलट नीलेश यांना काढल्याने त्यांच्या काही कट्टर समर्थकांनी काँग्रेस उमेदवाराला मत देऊन आपला राग व्यक्त केला असणार. आलेक्स यांना काढून नीलेश यांना परत मंत्री करावे, अशी मागणी नीलेश यांचे समर्थक करू लागले आहेत.

सासष्टीत जम बसविण्यासाठी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वारंवार शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यांना फारसे यश मिळाले नाही. सत्तेसाठी भाजपात गेलेल्या बऱ्याच आमदारांना कमळ निवडणूक चिन्हावर मतदारांना सामोरे जाण्याचे धाडस झाले नाही. त्यामुळे भाजपाची धाव मडगाव व फातोर्ड्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. कुंकळळी मतदारसंघ कधी एकदा भाजपाच्या ताब्यात आला होता, पण टिकवून ठेवणे जमले नाही. आता राजकारणाने धार्मिक रंग घेतल्याचे दिसून येते. आपल्याला धोका आहे ही विचारसरणी लोकांच्या मनात बिंबली तर यापुढे मडगाव व फातोर्डा मतदारसंघांत काँग्रेसचीच चलती राहील असे दिसते. भाजपाला यापुढे स्वबळावर सत्ता काबीज करायची असल्यास मांद्रे, हळदोणे, मडकई, डिचोली, केपे आदी मतदारसंघांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल.

चालू लोकसभा निवडणुकीतून सर्वच राजकीय पक्ष काही ना काही धडा शिकले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत 303 जागा जिंकलेल्या भाजपाने यंदा 400 जागा जिंकू असा नारा दिला. सुज्ञ मतदारांनी भाजपाला स्पष्ट बहुमतही नाकारले. ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही भाजपाची घोषणा मतदारांना आवडली नाही असे दिसते. त्यामुळे मतदारांनी काँग्रेसला ‘सौ’ पार केली. शरद पवार, नीतीश कुमार, चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आदी सर्व नेत्यांना अपेक्षित यश देऊन खूश केले. कोणी नेत्याने माजू नये म्हणून मतदारांनी त्यांना अद्दलही घडविली. उत्तर प्रदेशात श्रीराम मंदिर उभारल्याने सर्वच्या सर्व जागा भाजपला मिळतील अशी मोठी अपेक्षा भाजपाने बाळगली होती, पण तसे काही घडले नाही.

देशभरात या निवडणुकीतून जनतेने जो कौल दिला त्याने एक मायावती वगळता इतर सर्व नेते खूश आहेत. जागा कमी झाल्या तरी सत्ता टिकली म्हणून भाजपाही खूश आहे. गोव्यातही तीच गत आहे. एक जागा मोठ्या मताधिक्क्याने सहाव्यांदा जिंकल्याचा आनंद एकीकडे आहे, तर दुसरी जागा थोड्याच मतांनी गमावल्याचे दुःख दुसरीकडे आहे. ‘गड आला पण सिंह गेला’ असेच यावेळी म्हणावे लागेल.