काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे जनतेला आवाहन;
वेर्णा येथे कार्यकर्ता मेळावा;
काँग्रेसच गोव्याची अस्मिता जपेल
गोव्यातील 12 मंत्र्यांपैकी बहुतांश हे काँग्रेसचे माजी नेते आहेत. त्यांनी स्वार्थासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षातून स्वार्थासाठी बाहेर पडलेले नेते गद्दार आहेत. गोव्यातील मतदारांनी आगामी निवडणुकीत पक्ष बदलणाऱ्या आमदारांना धडा शिकवला पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी वेर्णा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात काल केले. राज्याची नैसर्गिक संसाधने आणि हितसंबंध, जमीन, पर्यावरण व जंगले यांच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यावा, असेही खर्गे म्हणाले.
गोव्यातील जनता विभागलेली राहिली, तर गोव्याची जमीन, पाणी आणि जंगले धोक्यात येऊ शकतात. राज्याची नैसर्गिक संसाधने आणि हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी गोव्यातील जनतेने एकजुटीने राहून काँग्रेसला पाठिंबा द्यावा, असे आवाहन खर्गे यांनी केले.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसच्या भूमिकेवरही मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रकाश टाकला. या स्वातंत्र्य लढ्यात भाजपचे योगदान काय, असा प्रश्न खर्गे यांनी उपस्थित केला.
काँग्रेस गोव्याची अस्मिता जपेल. काँग्रेसच्या कार्यकाळात गोव्याला घटकराज्याचा दर्जा मिळवून देण्यात आला. काँग्रेस गोव्यातील तरुणांसाठी संधी निर्माण करेल. अमलीपदार्थांच्या समस्येशी सामना करेल. गोव्याची जमीन, पर्यावरण आणि पारंपरिक उपजीविकेचे रक्षण करेल. काँग्रेस महिला, कामगार, शेतकरी, मच्छिमार, छोटे व्यापारी आणि समाजातील दुर्बल घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. काँग्रेस पारदर्शक, उत्तरदायी आणि जन-केंद्रित सरकार देईल. तसेच तरुणांसाठी रोजगार निर्माण करणे आणि अमली पदार्थांचा विळखा रोखणे गरजेचे आहे, असेही मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.
एकजूट असेल, तर सर्व काही साध्य होऊ शकते. आगामी 2027 च्या विधानसभेत भाजपला धडा शिकविण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आणि बुथ स्तरावर संघटना बळकट करण्याचे आवाहन खर्गे यांनी केले.
यावेळी खर्गे यांनी राज्यातील भाजप सरकारवर जहरी टीका केली. हे सरकार अमलीपदार्थांच्या नशेत आहे आणि सत्तेवर आल्यास काँग्रेस अमलीपदार्थांचा व्यापार थांबवेल, असे त्यांनी सांगितले.
‘ती’ टोपी जाळावीच लागेल
दाबोळी विमानतळाजवळ तरुणांनी दाखवलेल्या काळ्या झेंड्यांवर प्रतिक्रिया देताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आपण पांढरी टोपी घालतो, जिचा रंग बदलता येतो; परंतु आरएसएसची काळी टोपी घालणारे तिचा रंग बदलू शकत नाहीत आणि ती जाळूनच टाकावी लागते, असे खर्गे म्हणाले.
उत्तराखंडमधील आपल्या भेटीनंतर तिथे करण्यात आलेल्या ‘शुद्धीकरणा’वरून खर्गे यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. जे लोक इतरांना पापी म्हणतात, त्यांनी आधी स्वतःचे शुद्धीकरण करून घ्यावे, असे ते म्हणाले.
ई20वरून उपरोधिक टीका
मल्लिकार्जुन खर्गे यांनी ई20 इंधन धोरणावरही उपरोधिक टीका केली. माझे वय 85 वर्षे आहे, तरीही माझे इंजिन खूप चांगले काम करत आहे. कारण मी माझ्या इंजिनासाठी ई20 इंधन वापरत नाही, असे खर्गे म्हणाले.
गोवा मुक्तीत काँग्रेसची मोठी भूमिका
गोव्याच्या मुक्तीमध्ये काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मुक्ती संग्रामाची आठवण सांगताना खर्गे म्हणाले की, त्या वेळी ते मॅट्रिकचे (दहावीचे) विद्यार्थी होते आणि त्यांनी गोव्याच्या मुक्तीसाठीच्या आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता, असेही खर्गे यांनी सांगितले.
मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद लोक गोव्यात मजा करण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी येतात; परंतु गोव्यातील जमिनी बाहेरील लोकांसाठी केवळ एक वस्तू बनू शकत नाही. गोव्याची जमीन, अस्मिता आणि भविष्य यांचे रक्षण करण्याची गरज आहे, असेही खर्गे यांनी सांगितले.
यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, आमदार आल्टन डिकॉस्टा, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, अंजली निंबाळकर, दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गोव्यातील सरकार सर्वात भ्रष्ट : खर्गे
आपण राजकारणात 56 वर्षे पूर्ण केली आहेत; परंतु गोव्याच्या सरकारसारखे इतके भ्रष्ट सरकार कधीही पाहिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचार वाढलेला आहे. गोव्यात सुद्धा भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे. या भ्रष्टाचाराला जबाबदार असलेल्यांना सत्तेतून बाहेर काढण्याचे आवाहन मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.

