27.6 C
Panjim
Wednesday, May 19, 2021

निर्णायक लढाईची वेळ

  • दत्ता भि. नाईक

अतिशय घनदाट जंगलांत माओवाद्यांना शस्त्रे कोण पुरवतो याची कसून चौकशी झाली पाहिजे. अग्निशेष, ऋणशेष आणि शत्रुशेष थोडासा ठेवला तरी तो वाढतो. त्यामुळे त्याचा समूळ बीमोड करणे आवश्यक आहे. माओवाद्यांविरोधात आता निर्णायक लढाईची वेळ येऊन ठेपली आहे.

शनिवार, दि. ३ एप्रिल रोजी सकाळी पाच वाजता छत्तीसगड राज्यातील बिजापूरजवळच्या जंगलात सुमारे चारशे माओवाद्यांनी एकाच वेळेस बंदोबस्तासाठी गेलेल्या सुरक्षाजवानांवर हल्ला केला, ज्यात बावीस जणांचा मृत्यू झाला व एक जवान बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. जगदाळपूर येथील छावणीशी संबद्ध असलेले हे जवान या क्षेत्रात शोधमोहिमेवर होते. बावीसपैकी केंद्रीय राखीव दलाचे आठ जवान होते, ज्यात सातजण कोब्रा कमांडो तर एकजण बस्तरिया बटालियनचा सदस्य होता. आठजण जिल्हा राखीव दलाचे, तर सहाजण विशेष कृती दलाचे जवान होते. बेपत्ता असलेला जवान कोब्रा कमांडोचा असून तो माओवाद्यांच्या ताब्यात असल्याचे वृत्त आहे. काही वृत्तसंस्थांच्या मार्फत ही माहिती प्रसृत करण्यात आली आहे.

बावीस जवान हुतात्मे
हल्ला झालेले स्थान बस्तर क्षेत्रातील जोनागुडा व टेकागुडा या गावांच्या सीमारेषेवर असून बिजापूर जिल्ह्याची सीमा याठिकाणी सुकमा जिल्ह्याला भिडते. ही साधी चकमक नव्हती. पाहू गेल्यास माओवाद्यांनी देशाविरुद्ध पुकारलेल्या युद्धाचा हा एक भाग होता. या सशस्त्र हल्ल्यात एकतीस सुरक्षा जवान जखमी झाले असून त्यांतील गंभीर जखमी असलेल्यांचे निधन झाल्यास मृत्यूचा आकडा वाढू शकतो.

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत पूर्णपणे गुंतलेले देशाचे गृहमंत्री अमित शहा आपला संपूर्ण कार्यक्रम रद्द करून जगदाढपूर येथे आले व त्यांनी संबंधितांची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीस छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल, राज्याचे ज्येष्ठ पोलिस अधिकारी तसेच केंद्रीय राखीव दलाचे अधिकारी उपस्थित होते. अमित शहा यांनी ‘हिंसेवर विश्‍वास असलेल्या डाव्या विचारसरणीशी पुकारलेला लढा पूर्णत्वास नेणार व बावीस हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही’ असे वक्तव्य जारी केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सत्तेचे अधिग्रहण केल्यापासून सीमेवर मरण पावलेल्या हुतात्म्यांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठवण्याची पद्धत सुरू केली आहे व तोच नियम आतंकवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांना लावण्यात आल्यामुळे बावीसही हुतात्म्यांचे मृतदेह त्यांच्या-त्यांच्या गावी पाठवण्यात आले आहेत. यामुळे मृतात्म्यांना कस्पटासमान लेखण्याची पद्धत बंद झाली असून परिणाम म्हणून त्यांच्या घरातील व गावातील लोकांपर्यंत आतंकवादाविरुद्ध लढणे आवश्यक असल्याचा संदेश पोहोचतो.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की, गेल्या सहा वर्षांत माओवादविरोधी मोहीम निर्णायक टप्प्यात आलेली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल. राज्य व केंद्र सरकारची माओवादविरोधी दले एकत्रितपणाने काम करत असल्यामुळे आलेल्या नैराश्येपोटी हा हल्ला करण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी पुढे म्हटले आहे.

विकासाला ठाम विरोध
यापूर्वी २१ मार्च रोजी यांनी राखीव दलाच्या तुकडीवर हल्ला करून पाच जवानांचे प्राण घेतले होते. ही पण काही नवीन घटना नव्हे. सुमारे चारशे माओवादी या परिसरात असल्याचा समाचार मिळाल्याने शोधमोहीम आखली असताना ही घटना घडलेली आहे. ही शोधमोहीम दुसरीकडे वळवून सापळा रचूनच जवानांचे प्राण घेतलेले आहेत. यामागे सुरक्षादलांना बातमी पुरवणार्‍यांचा हातही असू शकतो. देशातील सर्व यंत्रणा जागरूकपणे काम करत असताना माओवाद्यांना अशी संधी मिळावी यात देशातील अंतर्गत सुरक्षा यंत्रणा व हेर खाते यांचे अपयश आहे.
माओवादी असो, नक्षलवादी वा अन्य कोणत्याही देशातील कम्युनिस्ट चळवळ चालवणारे गट असोत, ते नेहमीच देशाच्या अविकसित भागातील जनतेला संघटित करून तुमचा प्रदेश भांडवलशाही सरकारने मागास ठेवला असे सांगतात व एकदा जम बसला की पर्यावरणाचे निमित्त पुढे करून विकासाला ठाम विरोध करतात. मागे पडलेल्या जनजातींना भडकावून, त्यांच्या भावनांशी खेळून त्यांना सरकारविरोधात व पर्यायाने देशविरोधात संघटित करतात व नंतर त्यांच्यावर हुकूमत गाजवण्यास सुरुवात करतात. माओवाद्यांनी हात-पाय तोडलेले कितीतरी जनजाती समाजातील लोक या क्षेत्रात दिसतील. जनजातीतील स्त्री-पुरुषांची ढाल करून माओवादी लढत असतात. सरकारी पोलीस दलांनी बेछूट गोळीबार केला तर हे लोक प्रथम मरतील व त्यामुळे सरकार कसे जनजातीविरोधी आहे हे ऊर बडवून सांगणे सोपे होते.

छत्तीसगढ राज्यात भूपेंद्रसिंह बाघेल यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्षाचे सरकार आहे. कॉंग्रेसच्या सत्ताकाळातच देशाच्या दुर्गम भागात माओवाद्यांनी ठाण मांडलेले आहे असा आतापर्यंतचा अनुभव आहे. धर्मांतर करणारे ख्रिस्ती मिशनरी व माओवादी हे दोघेही बस्तर क्षेत्रात एकमेकांना सहाय्य करतात. माओवाद्यांच्या हिंसाचाराचा अवार्ड वापसीवाले विचारवंत व ख्रिस्ती मिशनरी संस्था यांनी कधी निषेध केल्याचे ऐकिवात नाही. कॉंग्रेसने तर या दोन्हींचा पक्षाच्या राजकारणात इतका उपयोग करून घेतलेला आहे की २०१३ सालच्या मे महिन्यात राज्यातील कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांचे माओवाद्यांकडून शिरकाण करण्यात आले व यात पक्षातील एका गटाचाच हात होता असे खात्रीलायकरीत्या समजते.

कबीर कला मंच
माओवाद्यांना सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा आहे हा एक भ्रम पसरवला जातो. यापूर्वीच बस्तर विभागातील लोकांनी ‘सलवा जुडूम’ नावाची माओवादविरोधी सशस्त्र संघटना उभारली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने मनाई केल्यामुळे हा प्रयोग चालू शकला नाही.
खेड्यांना संघटित करून शहरांना वेढा देणे हे माओचे तंत्र यशस्वी ठरले असा प्रचार केला जातो. मार्क्स, लेलीन वा माओवर अंधश्रद्धा पसरवणे हा कम्युनिस्टांच्या वेगवेगळ्या गटांचा व्यवस्थित चाललेला कार्यक्रम असतो. माओचे तंत्र माओच्या एकट्याच्या बळावर यशस्वी झालेले नसून सोव्हिएत रशियाने गुप्त मार्गाने मदत पुरवल्यामुळे कुओमिनटांग पक्षाच्या सरकारचा पराभव झाला ही गोष्ट आता गुप्त राहिलेली नाही.

कबीर कला मंच ही एक शहरी माओवादी-नक्षलवाद्यांची आघाडी आहे. हे एक कला पथक आहे. याच्याद्वारे जनतेचे प्रश्‍न सोडवण्याच्या नावाखाली विद्ध्वंसक विचाराने भरलेली पथनाट्ये व गीते सादर करणे हा या कलामंचचा कार्यक्रम आहे. कबीर हा भक्तिमार्गी संत होता. तो जन्माने मुसलमान विणकर होता म्हणून त्याला सेक्युलर बनवायला सोपे पडते. तो रामानंदस्वामींचा शिष्य होता हे सत्य लपवून ठेवायचे. तो पूजापाठ-नमाज याबद्दल उदासीन होता, परंतु तितकाच तो रामभक्त होता. पण हे सर्व जनतेसमोर येऊ न देणे म्हणजे खोटारडेपणाची निर्लज्ज कमाल करण्यासारखे आहे व हेच या कबीराच्या नावाने चाललेल्या कलामंचाद्वारे चालते. यांपैकी कोणासही कोणत्याही कारणाने अटक झाल्यास देशात मानवाधिकारांचा र्‍हास झाल्याचा गवगवा केला जातो.

अग्निशेष, ऋणशेष आणि शत्रुशेष
हा हल्ला गाफील क्षणी घडला हे उघड सत्य आहे. यापुढे गाफील राहता येणार नाही हा काही नवीन संदेश नव्हे. हा अनुभवही नवीन नाही. केंद्र व राज्य- दोन्ही सरकारांनी या अपयशाचे वाटेकरी असल्याचे मान्य केले पाहिजे. आपण आपल्या जवानांना शत्रूला मारण्यासाठी पाठवतो; शत्रूकडून मारलं जाण्याकरिता नाही हे आता जनतेने सरकारला ठणकावून सांगितले पाहिजे. ३ एप्रिल हा आपल्यासाठी दुःखाचा दिवस असला तरी देशातील माओवादी-नक्षलवादी व तत्सम विचारांच्या लोकांसाठी तो विजय दिवस आहे.

कोणत्याही रोगाशी लढायचे असेल तर त्या रोगाचे पूर्ण निदान झाले पाहिजे. कम्युनिस्ट विचारसरणीने कोणत्याही देशातील लोकांना सुखी केले नाही. सोव्हिएत रशियातील जनता कशी हवालदिल झाली होती हे सर्वज्ञात आहे. रणगाडे देशाच्या सीमेवर पाठवले जातात, परंतु कम्युनिस्ट पक्षाची सरकारे ज्या देशात असतात त्या देशात शहरी भागात आंदोलनकर्त्यांच्या अंगावर रणगाडे घातले जातात. रशियाच्या सायबेरिया प्रदेशातील गुलाग द्वीप समूहातील यातनागृहांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. चीनमध्ये शिंझियाग प्रांतातील मुसलमान जनतेला सध्या अशाच प्रकारच्या यातनागृहात सध्या कोंडले जात आहे व याला सुधारगृह असे गोंडस नाव दिले जात आहे. १९८० ते ९० या काळात पूर्व युरोपमधील कम्युनिस्टांची सद्दी संपली तेव्हा माओवादी व नक्षलवाद्यांचे प्रेरणास्थान असलेल्या अल्बेनियातील जनता इटलीमधील रस्त्यारस्त्यांवर भीक मागत होती. अलीकडे क्युबालाही घरघर लागलेली आहे. हे सर्व उघड सत्य आहे. इतके जाणूनही माओवादाच्या मागे लागणार्‍यांना माथेफिरूच म्हणावे लागेल. अतिशय घनदाट जंगलांत माओवाद्यांना शस्त्रे कोण पुरवतो याची कसून चौकशी झाली पाहिजे. अग्निशेष, ऋणशेष आणि शत्रुशेष थोडासा ठेवला तरी तो वाढतो. त्यामुळे त्याचा समूळ बीमोड करणे आवश्यक आहे. माओवाद्यांविरोधात आता निर्णायक लढाईची वेळ येऊन ठेपली आहे.

STAY CONNECTED

848FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

इकडेही लक्ष द्या

कोरोनाचा वणवा राज्यात चहुदिशांनी भडकल्यावर आणि सर्वतोपरी सज्जतेचे दावे उच्च न्यायालयात उघडे पडल्यावर आता राज्य सरकार उपाययोजनांच्या विहिरी खोदायला निघाले आहे. गोवा...

कोरोना बळींची संख्या २ हजारांजवळ

>> राज्यात शुक्रवारी ६१ मृत्यू, २४५५ बाधित, एकूण बळी १९९८ राज्यात गेल्या चोवीस तासांत पुन्हा एकदा उच्चांकी ६१ रुग्णांचा...

प्राणवायूसंदर्भातील उपाययोजनांचा अहवाल उच्च न्यायालयात सादर

राज्य सरकारचे आरोग्य सचिव रवी धवन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला गोमेकॉमधील प्राणवायू पुरवठा व इतर समस्या सोडविण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा...

गोमेकॉत प्राणवायू टाकी बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ः मुख्यमंत्री

बांबोळी येथील गोमेकॉतील वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन २० हजार लीटर क्षमतेची प्राणवायू टाकी बसविण्याचे काम जोरात सुरू आहे, अशी माहिती...

कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणारच ः मोदी

>>किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकर्‍यांना आठवा हप्ता भारताचे अद्यापही कोरोनाशी सुरू असलेले युद्ध आपण लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्‍वास पंतप्रधान...

ALSO IN THIS SECTION

गोव्यात कोरोनाचा थयथयाट!

प्रमोद ठाकूर ‘कोरोना’च्या दुसर्‍या लाटेने दणका दिल्यानंतर सरकारी यंत्रणेला जाग आली. यापुढे कोरोना महामारीबाबत निष्काळजीपणा नको. ‘जीएमसी’वरील रुग्ण...

मतदारांचा स्पष्ट संदेश

दत्ता भि. नाईक या निवडणुका म्हणजे केंद्रातील सत्ताधारी व सत्ताधारी बनण्याची आकांक्षा बाळगणार्‍यांसाठी संदेश देणारी उपांत्य फेरी आहे....

‘कोविड-१९’चा रोजंदारीवर परिणाम

शशांक गुळगुळे दुसर्‍या लाटेने भारतातील फार मोठा गट आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. या लोकांसाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर साहाय्य...

कोरोनाचे संकट आणि देशातील अराजक

प्रा. विनय ल. बापट संकट मोठे आहे आणि आव्हानही मोठे आहे. यापूर्वीही भारताने अशा महामार्‍यांचा सामना केला आहे...

भारतीय सागरी हद्दीत अमेरिकेचे विनाशकारी जहाज

दत्ता भि. नाईक जे घडले ते वरकरणी साधे वाटत असले तरी दिसते तेवढे ते साधे प्रकरण नाही. एक...