26 C
Panjim
Monday, January 18, 2021

निराधारांचे आश्रयस्थान ः मातृछाया

  • सुरेखा दीक्षित

आज शनिवार दि. ९ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ४.०० वा.तळावली, फोंडा येथे मातृछाया ट्रस्टच्या मातृछाया बालिका कल्याण आश्रमाचा शिलान्यास मा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री. (ऍड.) आलोक कुमारजी तसेच मातृछाया विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. १९७६ ते २०२० अशा सुमारे ४३-४४वर्षांच्या कालखंडात गोमंतकात अर्भकालय ते बाल-संस्कार ते रुग्ण-सेवा अशा विविध क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत संस्थेचा हा अल्प परिचय….

जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे |
निराधार आभाळाचा तोच भार साहे ॥

कवी योगेश्वर अभ्यंकर यांनी लिहिलेले, दशरथ पुजारींनी संगीतबद्ध केलेले आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेले एक जुने भावगीत आहे. त्याच्या वरील ओळी हा लेख लिहिताना आठवल्या. पहिल्याच कडव्यात कुंतीने बाळाला नदीत सोडण्याचा अन् राधिकेने त्याला प्रेमाने वाढवण्याचा उल्लेख आहे. पुढे हेच बाळ कर्णराज म्हणून नावारूपाला आले. कुमारीमातेची महाभारतातील ही कथा आजही एकविसाव्या शतकात घडतेय आणि मातृछायासारख्या संस्था अशा मातेने त्याग केलेल्या बालकांना आपली मायेची छाया देत आहेत. गोव्यात १४ नोव्हेंबर १९७६ साली सुरू झालेल्या मातृछायेच्या कार्याने कितीतरी बालक-बालिकांचे भाग्य पालटले आहे.

मातृछाया संकल्प-३५ स्मरणिकेत ज्यांनी मातृछाया सुरू केली, वाढवली आणि २५ वर्षे झाल्यानंतर सेवाकार्याचे निरनिराळे आयाम जोडले- त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकणारे लेख आहेत. कोणतेही नवीन कार्य सुरू केले जाते तेव्हा प्रारंभी अनंक अडचणींशी सामना करत वाटचाल करावी लागते. पायाचे दगड रचणार्‍यांना अतोनात कष्ट सोसावे लागतात. सुरुवातीच्या काळातील विजया भांगे (दीक्षित), अलका परुळेकर, अनिता कवळेकर, सौ. प्रतिभा व श्री दत्तात्रय जोशी, मोडक दाम्पत्य आणि अन्य संचालकांच्या लेखांतून मातृछाया संस्थेला आकार देणार्‍या परिश्रमांचे दर्शन होते अन् या सर्वांविषयीचा आदर दुणावतो.

सुरुवातीच्या कार्यकर्त्यांचे काम मी जवळून पाहिले आहे, हे सेवाकार्य एकप्रकारे आव्हानच आहे. साधा स्वतःचा प्रपंच चालवायचा म्हटले तरी नित्य नवनवीन अडचणींना तोंड देताना नाकी नऊ येते. इथे तर तान्हुल्या बाळांपासून किशोरवयीन मुलींपर्यंत ६० ते ७० लेकरांचा सांभाळ करायचा असतो. सर्वांचे संगोपन, पोषण, आरोग्य, शिक्षण, संस्कार इत्यादींकडे जातीने लक्ष देऊन मुलांना घडवणे सोपे नाही. अर्थात या कार्याला अनेकांचा हातभार लागतो अन् काम सुकर होते.

विश्वस्त मंडळ, संचालक, कार्यकारी समिती, दैनंदिन व्यवस्था सांभाळणारे कार्यकर्ते, मुलांचे आरोग्य तपासणीसाठी येणारे डॉक्टर, आर्थिक भार उचलणारे आश्रयदाते, आदि सर्वांच्या सहकार्याने हा गोवर्धन उचलला आहे. अर्भकालयापर्यंतचं कार्य सीमित न ठेवता पंचवीस वर्षांनंतर प्रत्येक तालुक्यात सेवाकार्य उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवून संस्थेचा विस्तार केला आहे, त्याचे सर्व श्रेय ह्या मंडळींना जाते. विश्व हिंदू परिषदेसाठी मातृछाया संस्था संपूर्ण भारतात गौरवास पात्र ठरली आहे.

विविधतेने विनटलेल्या भारताची सांस्कृतिक परंपरा जितकी प्राचीन आहे, तितकीच त्याची वैश्विक आध्यात्मिक बाजू पण शाश्‍वत, सनातन आहे. संपूर्ण जगाचा विश्वगुरू बनण्याची क्षमता भारतात आहे आणि हे भाकित स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार, प्रथम सरसंघचालक प. पू. गोळवलकर गुरुजी आणि अनेक राष्ट्रपुरुषांनी व्यक्त केले आहे. कोणत्याही समाजाची काही बलस्थानं असतात तशी त्याची कमकुवत बाजूही असते. बहुविध पदर असलेल्या हिंदू समाजात उणीवाही बर्‍याच आहेत. पण राष्ट्र, धर्म, संस्कृती आपली मानली तर त्याचे दोषही आपलेच असतात. वंचितांना आम्हीच घराबाहेर काढले तर परधर्मीय पुळका येऊन त्यांना आपला आधार द्यायला पुढे येतात अन् त्याचे दुष्परिणाम नंतर संपूर्ण देशाला भोगावे लागतात, हे आम्ही अनुभवलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर मातृछायेसारख्या सेवा प्रकल्पाचे कार्य प्रशंसेस पात्र ठरते.
केवळ सोडून दिलेली अनाथ बालकेच नव्हे तर ज्या बालकांना एक पालक नाही किंवा हलाखीच्या परिस्थितीमुळे संगोपन करणे शक्य नाही अशांनाही मातृछायेत आश्रय मिळतो. त्यांचे भरण-पोषण, शिक्षण, एवढेच नव्हे तर ती संस्कारपूर्ण वातावरणात चारित्र्यसंपन्न कशी होतील याचीही काळजी घेतली जाते. एकदा का मातृछायेचा उंबरठा ओलांडून मुला-मुलींनी प्रवेश केला की तेथील संस्कारपूर्ण वातावरणाचा प्रभाव त्यांच्यावर नकळतच पडतो. तळावली येथे बाल कल्याण आश्रमात लहान-मोठे मुलगे मिळून ६० जण आहेत. मडगावातील बालिका कल्याण आश्रमात १८ मुली आहेत. एखाद्या मोठ्या कुटुंबात असल्याप्रमाणे त्यांचं संगोपन केलं जातं. सर्व सणवार, वाढदिवस हिंदू परंपरेनुसार साजरे केले जातात. उत्सव समारंभात सहभागी होण्याचा वेगळाच आनंद मुलांना मिळतो. रांगोळी, सुशोभन, संगीत, नाटक, नृत्य, कथाकथन, हस्तकला, चित्रकला इत्यादी कलांमधून त्यांच्यामधील सुप्त गुणांना प्रकट होण्याची संधी मिळते. प्रत्येकाची काही ना काही स्वभाववैशिष्ट्ये असतातच. एवढ्या मोठ्या कुटुंबात एकत्र राहिल्याने मिळून-मिसळून राहण्याचे धडे मिळतात आणि त्याचप्रमाणे स्वभावाचे कंगोरेही घासले जातात. लहान-मोठी जबाबदारी पार पाडल्याने आत्मविश्वास वाढतो. क्रीडाक्षेत्रातही मुले चांगली चमकतात. रुसवे-फुगवे, भांडण-तंटे नाहीत असे नाही पण ती तर सगळ्याच कुटुंबात बघायला मिळतात. खेळाच्या वेळी आनंदात ती कशी दूर पळतात हे मुलांना कळतही नसावे.

इथे आलेले नवजात शिशु तर प्रेमाच्या स्पर्शासाठी आसुसली असतात. मातृछायेत बाळाचे रीतसर बारसे होऊन केवळ नावच दिले जात नाही तर त्याच्यासाठी कितीतरी नाती निर्माण होतात अन् सगळे बाळाचे कौतुक करतात. मायेच्या स्पर्शाचे मोरपीस अंगावरून फिरले की ते बाळसं धरायला लागतं. बाळाला दत्तक घ्यायला बरेच आई-बाबा वाट बघत असतात. कायदेशीर सोपस्कार झाले की बाळाला हक्काचं घर मिळतं. सुरुवातीला दत्तक न गेलेल्या मातृछायेतील मुली तिथेच मोठ्या झाल्या. उपवर झालेल्या मुला-मुलींची लग्नेही संस्था करून देते. मुलांचा केवळ सांभाळ करूनच कार्य थांबत नाही तर समाजात स्थिरस्थावर कशी होतील, ही कुटुंबाची असते तशी जबाबदारी घेतली जाते.

सेवाकार्यामध्ये रुग्णसेवा केंद्र, बांबोळी, मडगाव, म्हापसा, फोंडा येथील कार्य विशेष उल्लेखनीय आहे. २००२ साली बांबोळी येथे गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये जे रुग्णसेवा केंद्र सुरू केले त्याचा विस्तार होतच आहे. कारण समाजात ही सेवा अत्यावश्यक आहे. आजारी पडलेल्या मनुष्याचे नातेवाईक काळजीपोटी इतके विमनस्क असतात की त्यांना काही सुचत नाही. मोठ्या इस्पितळातील वातावरण पाहून ते अजूनच चक्रावून जातात. डॉक्टरांनी सल्ला दिलेले इलाजही परवडत नाहीत. औषधासाठी पैसे नसतात. खेड्यातून आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना प्रिस्क्रिप्शन वाचता येत नाही. अशा भांबावलेल्या अवस्थेत रुग्णसेवा केंद्राचे कार्यकर्ते मदत करतात तेव्हा त्यांना ते देवदूतच वाटतात. रजिस्ट्रेशन करणे, डॉक्टरांकडे घेऊन जाणे, रक्तदानात मदत करणे, औषधे मिळवून देणे, वेळप्रसंगी खाण्यापिण्याची व्यवस्था करणे इत्यादी कामे हे सेवाव्रती चोखपणे करतात.

मातृछायेच्या कार्याबद्दल लोकांना आपुलकी वाटते. गोवा तसे समृद्ध राज्य आणि लोकांमध्ये दानतही भरपूर आहे. एखादे कार्य मनाला भावले की मदत करायला अनेक हात पुढे येतात. मातृछायेचे कार्य जसजसे लोकांप्रत पोचायला लागले तसतसे कुवतीनुसार सहकार्य करणारे दाते समोर येऊ लागले. कुणी स्वतःच्या मुलाचा वाढदिवस मातृछायेत साजरा करतो तर कुणी दत्तक योजना, वधू-वर संशोधन कामात सहकार्य करतो. आज ज्या संस्थेच्या इमारती उभ्या आहेत त्याही हितचिंतकांच्या दातृत्वातूनच साकार झाल्या. शासन व प्रशासनातही संस्थेविषयी आदर आहे. कार्यालयीन कामंही तत्परतेनं होतात. संस्था चालवायची म्हणजे मनुष्यबळ व आर्थिक बळ दोन्हींची आवश्यकता असते. पण लोकांची सदिच्छा यात महत्त्वाची ठरते. ती असेल तर सर्वकाही साध्य होतं. मातृछायेची आजवरची वाटचाल बघितली तर तिच्या विस्तारासाठी अजूनही लोक धावून येतील यात तिळमात्र शंका नाही. हे श्रेय जे कार्यकर्ते सुरुवातीपासून झटले त्यांना जातं. सर्वांना त्रिवार वंदन!!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मागणी मान्य

अखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...

मेळावलीतील आयआयटी प्रकल्पाचे

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

पंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस

अंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...

ALSO IN THIS SECTION

उरल्या सगळ्या त्या आठवणी…

सोमवारी रात्री गोकर्णला देवदर्शनासाठी जाताना केंद्रीय संरक्षण व आयुष राज्यमंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अंकोल्याजवळ झालेल्या अपघातात...

शाणी

प्राजक्ता प्र. गावकर(नगरगाव- वाळपई) आबालवृद्धांना त्याच्याबद्दल विलक्षण आपुलकी आहे. कुणाच्याही घरी काही कार्य असेल तर त्याचे पान ठरलेले...

विश्‍वशांतीचे प्रतिनिधी ः स्वामी विवेकानंद

डॉ. लता स. नाईक ‘‘माय डियर ब्रदर्स अँड सिस्टर्स’’ म्हणून त्यांनी सर्व श्रोतृवृंदाला संबोधले व सभागृहात अजरामर असा...

अहंकाराचा वारा न लागो …

ज.अ. रेडकर.(सांताक्रूझ) गैर व भ्रष्ट मार्गाने मिळवलेली संपत्ती तर कधीच सुख आणि समाधान देऊ शकत नाही. सत्ता आज...

मातृछाया : भारतीय संस्कार आणि आधुनिक विज्ञान

संगीता अभ्यंकर, फोंडा जीवशास्त्र शिक्षक, लेखक आणि निवेदक वेगवेगळ्या पालकांचा जनुकीय वारसा घेऊन आलेली मुले...