नियोजन

0
40
  • प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

नियोजन हा पायाचा गदड आहे. त्याच्यावर उभी राहणारी इमारत ही स्वप्नपूर्ती आहे. पायाचा दगड कोणाला दिसत नाही; पण डोळ्यांसमोर दिसणारे शिल्प त्याची साक्ष देत असते. नियोजन नेहमीच अदृश्य असते आणि त्याचे फळ आपल्यासमोर चमकत असते.

प्रगती आणि विकास हे मानवाच्या जीवनात साध्य करायच्या उद्दिष्टाचे घटक आहेत. उद्योगी माणूस रात्रंदिवस धडपडत असतो. परंतु आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळायला हवी. त्यासाठी नियोजन आवश्यक आहे. आपल्याकडे असलेली साधन-सामग्री आणि भविष्यात आपल्याला अपेक्षित असलेली मिळकत यांच्या आधाराने नियोजन करायचे असते. नियोजन म्हणजे प्लॅनिंग. आजच्या युगात त्याला विशेष महत्त्व आहे.

राष्ट्रालादेखील नियोजन लागते. आपल्या भारत देशाचे नियोजन स्वातंत्र्यानंतर १९५१ साली सुरू झाले. पाच वर्षांची पंचवार्षिक योजना ठरवण्यात आली. त्याच्यामध्ये कालमानानुसार अनेक अडथळे आले. १९६२ साली चीनने आक्रमण केले. १९६५ साली भारत-पाक युद्ध झाले, १९७१ साली बांगलादेशचा मुक्तिसंघर्ष झाला, १९९९ साली पाकिस्तानचे कारगील युद्ध व अधूनमधून सीमाप्रांतांत होणारी घुसखोरी आणि सगळी आर्थिक घडी हादरविणारा आतंकवाद… या सगळ्या समस्यांमधून वाट काढत आपले नियोजन नेहमी पुढेच जात राहिले. तरीसुद्धा अवर्षण, दुष्काळ, महापूर, उपासमारी, वादळ व तुफान, भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी, रोगराई अशी संकटे येतच राहिली. कर्जाचे ओझे वाढतच गेले. प्रगतीचा आलेख कधीकधी खालावला गेला.

एवढा सगळा संघर्ष असूनदेखील आपली लोकशाही पुढे जातच राहिली. राष्ट्र उभारणीसाठी कोट्यवधी हात पुढे सरसावतच राहिले. नाउमेद न होता माणसे जगतच राहिली. विविध जाती, विविध धर्म, विविध भाषा असूनदेखील संस्कृतीतील राष्ट्रीय एकात्मता आपण निष्ठेने जपली हेच खूप झाले. आम्ही आपापसात कसेही भांडू, पण आपला राष्ट्रध्वज नेहमीच उंच आकाशात फडकायला हवा. माणसे येतील व जातील, पण राष्ट्र सदासर्वकाळ अजरामर असायला हवे. हा संदेश जनमानसात स्थिरावणे व रुजवणे हे काम तंत्रशुद्ध नियोजनाचेच आहे.

आपले कृषिक्षेत्र, उद्योग, दळणवळण, पर्यटन, शिक्षण, आयात-निर्यात, वित्त, बँकिंग या सगळ्या स्तरांवर संतुलित नियोजन हवे. आपले अंदाजाचे आकडे व प्रत्यक्ष प्राप्तीचे आकडे यांच्यामध्ये विषमता आहे. जे टार्गेट आपण ठरवतो ते हस्तगत करता येईलच असे नसते. तरीदेखील आपली झेप तिथपर्यंत पोचणारी असते.
नियोजनामध्ये प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता हे फार मोठे पैलू असतात. जे काही आपण ठरवले ते पवित्र मनाने व निरपेक्ष वृत्तीने, त्याच्यामध्ये आपला कसलाच वैयक्तिक स्वार्थ नसतो. कोणालाही ते आकडे तपासणी करता येतात. त्याच्यामध्ये लपवण्यासारखे काहीच नसते. अफरातफरीचे नुसते शाब्दिक आरोप करून उपयोगाचे नाही, तर प्रत्यक्ष आकडेवारीचे मूल्यमापन करूनच आपले अभिप्राय देणे इष्ट ठरेल. नाहीतर गैरसमज आणि असमंजसपणा हे दोषच अतिशय धोकादायक ठरू शकतात.
थोड्याशा उत्पन्नातदेखील आपण नियोजनाने सुखा-समाधानात राहू शकतो. अवाजवी व अवांतर खर्च शक्यतो टाळावा आणि अनिवार्य व आवश्यक खर्चावर विशेष भर द्यावा. आपल्याला ‘प्रायोरिटी लिस्ट’ करावे लागेल. आपल्या तातडीच्या गरजा शोधाव्या लागतील. मुलांचे पालन-पोषण, शिक्षण, व्यवसाय, लग्न व निवास-समस्या यांच्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
कुटुंब नियोजन ही एक आजची प्रमुख समस्या आहे. आपले कुटुंब केवढे मोठे अथवा लहान असावे हे आपणच ठरवावे. मुलं एक किंवा दोन इथपर्यंत सीमित राहाणे किंवा तीन-चार मर्यादेपर्यंत जाणे हादेखील आपल्याच कुटुंब नियोजनाचा भाग असतो.

कित्येकदा संताननिर्मिती हे देवाघरचे देणे असते. ज्याला हवीत त्यांना मुले मिळत नाहीत आणि ज्यांना नको तिथे वर्षाला एक अशी भर पडतच राहते. कुटुंबाचे क्षेत्र जसे आपल्या नशिबात येते, ते स्वीकारतच नियोजनाचा पाया सुदृढ करण्यामध्ये आपल्या कौशल्याची खरी परीक्षा होते. सकारात्मक वृत्तीने प्रत्येकाच्या जीवनाला योग्य आकार देण्यासाठी तांत्रिक नियोजनाची आपल्याला गरज असते. दैवावर अथवा नशिबावर अवलंबून राहाणे नियोजनाला मान्य नसते. जिथे आपल्याला पोचायचे आहे त्याची पूर्वतयारी आपण स्वतःच करायला हवी. ‘अदृश्य हात’ आपल्या मदतीसाठी येतील ही अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणाचे ठरेल.

आपले उद्दिष्ट साध्य व्हावे यासाठी परमेश्‍वराची प्रार्थना जरूर करावी, पण आपल्याला हात पांघरून राहिल्या ठिकाणी देवाने आणून द्यावे असा विचारच मनात आणणे नियोजनाला मान्य नाही.
नियोजन आपण डोळसपणे ठरवावे. अमर्याद कल्पना करणे नियोजनाला अभिप्रेत नाही. कल्पनाजग आणि व्यवहारजग यांच्यामध्ये अंतर असते. कल्पनेच्या स्वप्नसृष्टीपर्यंत आपण झेप घेऊ शकू याच्यामध्ये शाश्‍वती नसते; पण नियोजनाच्या सीमेपर्यंत आपली मजल पोचेल याचा आपल्याला आत्मविश्‍वास असतो.
कठोर प्रयत्न करून जेव्हा यश मिळते त्याचा आनंद अवर्णनीय असतो. यशस्वी नियोजन आपल्याला या स्वर्गीय आनंदाची प्राप्ती करून देते. आपली दृष्टी जर व्यापक नसेल तर आपले नियोजन कमकुवत व तकलादू ठरते. पत्त्यांच्या अर्धवट बंगल्याप्रमाणे ते कोसळते. नियोजनाचा पाया व कळस तंत्रशुद्धपणे रचलेला असेल तर सगळे जग या कृतीचे मुक्तकंठाने प्रशंसा करते.

जो आजच्या जगात यशस्वी ठरतो त्याच्यामागे त्याच्या यशस्वी नियोजनाचे पाळबळ असते. एका दिवसात कोणच यशाच्या शिखरावर पोहोचत नाही, तर कित्येक दिवसांची तपश्‍चर्या त्यासाठी आवश्यक असते. हे सत्य नियोजनच आपल्याला शिकवत असते.

नियोजन हा पायाचा गदड आहे. त्याच्यावर उभी राहणारी इमारत ही स्वप्नपूर्ती आहे. पायाचा दगड कोणाला दिसत नाही; पण डोळ्यांसमोर दिसणारे शिल्प त्याची साक्ष देत असते. नियोजन नेहमीच अदृश्य असते आणि त्याचे फळ आपल्यासमोर चमकत असते.