वाहतूक खात्याने पणजी महापालिका तसेच ताळगांव या भागातील सर्व शहर बस मालकांची बैठक घेऊन खात्याने अधिसूचित केलेल्या बसथांब्यांवरच बसगाड्या थांबविण्याचा आदेश दिला. या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. बसमालकांनी याबाबतीत सरकारला सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी सांगितले.
शहरातील १७७ बसथांबे खात्याने अधिसूचित करून प्रत्येक थांब्यावर फलक लावण्यात आले आाहेत, त्यामुळे बसगाड्यांना दिलेल्या ५० मीटरांच्या जागेतच बसेस थांबवाव्या लागतील. सध्या सर्व बस चालकांना शिक्षित करण्यासाठी व प्रवाशांमध्ये जागृती करण्यासाठी पुढील आठ दिवस दिले असून त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दडात्मक कारवाई केली जाईल, असे देसाई यांनी सांगितले.
बसचालक प्रवाशी दिसेल तेथे बस थांबवीत असत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होतो. वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे वाहतूक खात्याने वाहतूक व्यवस्थेत शिस्त आणण्याचे ठरवून वरील निर्णय घेतला होता. ही व्यवस्था पणजी शहरापुरतीच नसून अन्य शहरांतही बस थांबे अधिसूचित करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.