– डॉ. सोमनाथ कोमरपंत
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी लौकिक जगाचा दिनांक १०
मार्च १९९९ रोजी निरोप घेतला. त्याला आज चौदा वर्षे लोटली. गेल्या वर्षी त्यांची जन्मशताब्दी महाराष्ट्रात, बृहन्महाराष्ट्रात आणि अन्य ठिकाणी अनेक उपक्रमांनिशी साजरी झाली. त्यांचा जन्मदिन ‘मराठीदिन’ म्हणून साजरा होत असतो. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्याशी असलेले त्यांचे अतूट नाते अशा तर्हेने अधोरेखित झालेले आहे. काव्यनिर्मिती हा कुसुमाग्रजांच्या जीवनाचा मर्मबंध. नाटक, कादंबरी, कथा, ललित निबंध, बालकविता, आस्वादक समीक्षा हे वाङ्मयप्रकार त्यांनी लीलया हाताळले. त्यांवरही त्यांनी कुसुमाग्रजमुद्रा उमटविली. याचे कारण कवित्वशक्ती हा त्यांचा प्राणबिंदू होता. त्यांनी काही अनुवाद केले. त्यातूनही त्यांची श्रद्धास्थाने प्रकट झाली.
१९३३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘जीवनलहरी’ या पहिल्या कवितासंग्रहात पहिली कविता होती ती अशी ः
छेडुं नका तार फुका
भग्न पुरा हो वीणा
नाद मधू होइल कां
कां आशा व्यर्थ कुणा
वाळुरणीं जळ कुठलें
भग्न जिवा सुख कुठलें
जीवन, तर सुंदरता
सुंदर होण्यांत सरे
जीवनसौंदर्याची इतिकर्तव्यता कुसुमाग्रजांनी जीवन सुंदर होण्यातच मानली. या गंगोत्रीचा केवढा मोठा गंगाप्रवाह त्यांच्या जीवनात झाला! त्याचा आनंदानुभव आपण सर्वांनी घेतला आहे. कुसुमाग्रज गेले तरी त्यांच्या कवितेचा कुसुमगंध मागे राहिला. मृत्यूची तमा त्यांना कधीही नाही. त्यांनी एकदा उद्गार काढले होते ः
ती शून्यामधली यात्रा
वार्यातील एक विराणी
गगनात विसर्जित होता
डोळ्यांत कशाला पाणी?
कुसुमाग्रजांच्या जीवनात त्यांच्या कवितेचे स्थान कोणते? ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाल्यावर त्यांनी काढलेल्या उद्गारांद्वारे आपण हे समजून घ्यायला हवे. परिणतप्रज्ञ अवस्थेतील त्यांचे हे चिंतन आहे ः
‘‘त्या दिवलीच्या उजेडात माझे मीपण तर मला सापडलेच, पण या मीपणाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संबंधही सापडला. हे कवितेचे ऋण कधीही न फिटणारे आणि तरीही मी कविता जगलो नाही. पण कवितेनेच मला जगवले आहे आणि माझ्या जगण्याला माझ्यापुरताच एक विशेष अर्थ मिळवून दिला आहे.’’ मृत्यू समीप येऊन ठेपल्यावरही ते लिहून गेले ः
जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतामधुनी राहीन मी
या रचनेनंतर लवकरच त्यांनी लौकिक जीवनाला पूर्णविराम दिला. पण सर्जनशील आत्म्यांचे उद्गार आणि विरामचिन्हे रसिकांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देतात. जीवनाच्या समरप्रसंगी आशय पुरवितात. त्यादृष्टीने कुसुमाग्रज आमच्यातच आहेत.
**********
कुसुमाग्रजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विखुरलेल्या अप्रकाशित कविता वसंत सं. पाटील, श्री. शं. सराफ आणि रेखा भांडारे यांनी एकत्रित करून त्यांचे संपादन केले. ‘थांब सहेली’ या नावाने हा कवितासंग्रह २००२ मध्ये प्रसिद्ध झाला. यातील गद्य स्वरूपाची परिशिष्टेदेखील महत्त्वपूर्ण आहेत. कुसुमाग्रजांच्या कवितेचा गाभारा निरंतर गंधित राहिला. कुसुमाग्रजांच्या आठवणी जागवताना ‘थांब सहेली’च्या अंतरंगात प्रवेश करावासा वाटतो. या संग्रहात पहिलीच कणिका आहे ‘थांब सहेली.’
थांब सहेली सराईत या
वाट संपली इथे
प्रदेश पुढला मज एकाकी
असे जायचे जिथे
कुसुमाग्रजांचे उपरोल्लिखित उद्गार आठवले की कुणाशी केलेला हा संवाद आहे हे चटकन ओळखता येते. कवी आणि त्याची कविता हा कुसुमाग्रजांचा जिव्हाळ्याचा विषय. साहित्यजगत हे त्यांचे स्वानंदाचे जिव्हार. या विश्वात वावरणारे सारे त्यांचे आप्त. १९८४ साली त्यांचे निकटतम स्नेही प्रभाकर पाध्ये, वा. रा. ढवळे आणि बा. भ. बोरकर दिवंगत झाले. हा अंतराय त्यांना साहवेना. ‘स्मरण’ या कवितेत त्यांनी केलेले भावसंस्मरण आहे. मनस्वी प्रभाकर पाध्ये यांच्याविषयी ते उद्गारतात ः
जगभर गाजलेला प्रकांडपंडित
पण स्वतःच्या बालकीय भावोद्रेकांशी बांधलेला.
वा. रा. ढवळे यांच्या मैत्राविषयीचा कृतज्ञताभाव ते प्रकट करतात ः
साहित्य आणि साहित्यिक यांवरील
नितांत माया
ही ज्यांच्या जीवनाची आधारशिळा,
त्या मायेच्या मेघाला बहुधा
कृतक कोपाची एक रुपेरी किनारही.
मुंबईच्या मायानगरीत आल्यावर, माझ्या
ग्रामीण बाह्यासह, संकोचशील अंतरासह
मला आपल्या निःस्वार्थ पंखाखाली घेणारे.
बा. भ. बोरकरांविषयीचा आत्मीय भाव प्रकट करताना कुसुमाग्रज म्हणतात ः
– आणि आता बाकीबाबही.
आमच्या काव्याकाशातील पुनवेचा चंद्र
चांदणं जगणारा, चांदणं उधळणारा,
केवळ मातीतच नव्हे, तर रेताडातही
चांदण्याची रोपं पेरणारा.
—————–
तशा आपल्या पायवाटा वेगळ्याच,
पण माझ्या खांद्यावरील तुमचा हात
कधीच सैल झाला नाही.
कवीची भाववृत्ती कोणत्या वेळी आणि कशी फुलारून येईल हे सांगणे अगम्य– शक्तीपलीकडचे. तारुण्याच्या उमाठ्यावर कुसुमाग्रजांनी ‘विशाखा’मध्ये ‘गोदाकाठचा संधिकाल’ चित्रांकित केला. ही तसबीर आजही अम्लान रंगांची आहे. आयुष्याच्या संध्याकाळी मात्र त्यांनी ‘गोदाकाठचा उषःकाल’ रंगविला. तात्पर्य एकच, गोदावरी हा त्यांच्या अंतर्यामीचा आदिस्रोत होता. ‘नदी’ या ललित निबंधात गोदावरीने त्यांच्या प्रतिभेला केलेल्या सर्वांगस्पर्शाविषयी त्यांनी ममत्वाने आणि तन्मयतेने लिहिले आहे. कुसुमाग्रजस्पर्शाच्या अनेक प्रतिमांनी ही कविता विनटलेली आहे. ‘उमाठ्यावर उसळणारी अमरज्वाला’, ‘कनकरसापरि पसरू लागलेले क्षितिजावरील तेज’, ‘आरुण कुसुमांनी मोहरलेले मेघांचे कुंज’, ‘अंबरगत झळाळणारे हिरण्मय कळस’, ‘सुवर्णगरुडापरी बैसलेला सोनेरी प्रकाश’, ‘तटाच्या पायर्या प्रक्षाळत सामगीत गात संथपणे जाणारी जीवनमय माता’, ‘नितळ निळ्या पाण्यावर हलणार्या कांचनलहरी’, ‘आमित कालच्या लाटांवरती तरंगणार्या स्मृती’ आणि ‘स्वप्नाशांची इंद्रधनुष्ये’ या प्रतिमा कुसुमाग्रजांच्या प्रतिभाविलासाची साक्ष देतात. निसर्ग हा या प्रतिभेला ऊर्जा पुरविणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. निसर्गानुभूतीद्वारा त्यांचा अमृतानुभव व्यक्त होताना दिसतो. या दृष्टीने त्यांची ‘कोर’ ही कविता लक्षणीय वाटते. ते सुरुवातीलाच म्हणतात ः
माझ्या आकाशात उदे
एक अष्टमीची कोर
माझ्या धूसर मेघात
तिने केले आहे घर
पूर्णत्वाचा त्यांना ध्यास नाही. अपूर्णत्व त्यांना पुरेसे आहे. समधात वृत्ती हा कुसुमाग्रजांचा जीवनविशेष आहे. त्याचे पारदर्शी अन् प्रांजळ रूप येथे प्रकटले आहे ः
तिच्या चांदण्याला नाही
पूर्णपण पुनवेचे
हवे कोणाला ते पूर्ण
माझे भाग्य अपूर्णाचे
पक्व फळाप्रमाणे हा अनुभव आता पिकलेला आहे. मधुर रस त्यातून स्रवतो आहे. जीवननिष्ठेची ओतप्रोत गोडी त्यात भरलेली आहे. कुसुमाग्रज म्हणतात ः
अपूर्णाला नसे तीर
नित्य अपेक्षेची लाट
मंद चांदण्यात माझी
भिजे अमृतात वाट
कोणत्याही भाष्याविना या अनुभवाचे रसपान करावे. तृप्त व्हावे.
‘पांथ’ हीदेखील सौंदर्यानुभूतीने रसरसलेली कविता आहे. आत्मभाव तिच्यातून ओसंडून वाहतो आहे. कवी उद्गारतो ः
माझ्या दाट वृक्षावर मुशाफिर पक्षी आलेला आहे… त्याच्या शुभ्र पंखांवर निळ्या तारकांची नक्षी आहे… त्याच्या गतीमध्ये गर्भित मेघमंडलाचा ठाव आहे… त्याच्या ओल्या आर्त नेत्रांतून चिंब करुणेचा भाव आहे… त्याच्या चोचीमध्ये थोडे सूर्यतेज खुडलेले आहे… त्याच्या पिसांमध्ये चैत्रपुनवेचे कण दडलेले आहेत… त्याच्या कूजनात दिगन्ताचा स्वर लाभतो आहे… त्याच्या स्वरांतून अंधुकसे अनंताचे घर दिसू लागलेले आहे.
या कवितेच्या शेवटी अंतर्मुखतेच्या प्रवासाची नवी वाट कळते.
पक्षी निघे प्रवासाला
पांथ बांधला पथाने
जगणेही झाडासवे
व्हायचे हे सुने सुने.
खरे पाहता ही निःशब्दाची अनुभूती आहे. कुसुमाग्रजांनी तिला शब्दरूप दिले आहे.
‘कोकिळे’ या कवितेत कवी उषःकाली आसमंत कसा फुलून आलेला आहे त्याचे काव्यात्म वर्णन करतो. निळाईत केशराच्या बागा फुललेल्या आहेत… मेघामेघांतून लाल ज्योत पाजळते आहे… पूर्वेकडे भास्कराचा रथ येत आहे… कांचनाचे कोवळे ऊन उधळत तो येत आहे… धरेवर त्याचे सर्वत्र स्वागताचे सोहळे सुरू झालेले आहेत… पर्वताने रेशमी शाल पांघरली आहे… निर्झरांत माणकांचा रस मिसळलेला आहे… डोक्यावर जरतारी टोप धारण करून झाडे नटलेली आहेत… नदीच्या कंठात रत्नमाला उजळते आहे. अशा वेळी कोकिळेस ‘उठा बाई उठा आता’ म्हणून कवी हाक देतो. आभाळात मंजुळाचे मळे फुलवा असे आवाहन करतो. त्यातील ‘ळ’ची पुनरावृत्ती पाहण्यासारखी. शब्दांचा असा लडिवाळपणा कुसुमाग्रजच करू जाणे.
जीवनातील भावात्मक अनुभूती आणि अखंड आशावाद अधोरेखित करणारी कविता म्हणजे ‘पहाटतारा’ अल्पाक्षररमणीयत्व असलेली. निसर्गातील दृष्टान्त देत देत जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणारी. कुठेही बोधवादाचा लवलेश नाही. दोन भिन्न चित्रांमधील अंतर्विरोधी लय मनात भिनणारी. आपण नेहमीच ही निसर्गचित्रे पाहतो; पण चिंतनाची शक्ती कुसुमाग्रजांनाच प्राप्त झालेली. अर्थवलये विस्तारत नेणारा आशय ते सहजतेने मांडतात.
रात्र भयानक खंत कशाला?
काळोखासहि असे किनारा
ध्वज सूर्याचा घनात रोवित
नभात येईल पहाटतारा.
आणि अचानक जीवन जगण्याची लय अंतःकरणात भिनून जाते. ‘व्हावं’ ही निसर्गानुभूतीच्या आधारे लिहिलेली कविता म्हणजे नितांत मधुर भावनांनी व्यक्त झालेले पसायदानच आहे. भावकोमलतेचा हा गाभारा आहे ः
मन कोमल कोमल
जसं दव फुलातील
मन उदार उदार
नदी माऊलीचं तीर
‘मल्मली चांदणे’ आणि ‘मृगनक्षत्र’मधील निसर्गानुभूती ही मुळातून अनुभवण्याची चीज आहे. त्यांत फक्त निसर्गचित्रेच नाहीत. अधिक काही तरी आहे.
‘थांब सहेली’मधील प्रेमानुभूतीची धून ही मनाच्या एकान्तवासात अनुभवायला हवी. कवी ‘पेला’ या कवितेत म्हणतो ः
तू आली नाहीस
येणारही नव्हतीस,
पण या पेल्याच्या काठावर
तुझे ओठ येऊन बसले आहेत
तुझ्या संमतीशिवाय.
‘चाफा’ या कवितेत कवी म्हणतो ः
तू दिलेल्या
चाफ्याच्या फुलातच
मी तुला पाहतो आहे
अनुभवतो आहे
आणि माझ्या अस्तित्वात
शोषतो आहे.
उषेच्या सत्त्वात
आकारलेलं हे गंधमार्दव
पंख पसरीत आहे
विराट सुपर्णासारखं
माझ्या भोवतालावर
आणि बरसात करीत आहे
आत्मिक लावण्याची
माझ्या म्लान
जाणिवांवर
आणि यातलं तुला
काहीच माहीत नाही
त्या फुलांपासून
तू केव्हाच अलग झाली आहेस.
‘थांब सहेली’मधील जीवनचिंतनाचा अंतर्नाद हा कुसुमाग्रजांच्या सहासष्ट वर्षांतील अथक काव्यजीवनातील परिणतबिंदू होय.
‘हिरवी बेटे’, ‘सरहद्द’, ‘छपरे’, ‘दिवली’, ‘प्रस्तावना–विचार’, ‘काव्य’, ‘प्रवासी एकाकी’, ‘भजन’, ‘असे महात्मे’, ‘शोकान्तिका’, ‘बापूजी’, ‘महाकाव्य’, ‘रिटायर परमेश्वर’, ‘नास्तिक’, ‘अभ्रहीन आभाळात’, ‘सवाल’, ‘असीम’, ‘सुखात्मिका’, ‘कसली खंती?’, ‘पाऊले’, ‘बिहारमधील अकरा’ आणि ‘हे प्रवासी नमस्ते’ या जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांत लिहिलेल्या कवितांचे सूक्ष्म अवलोकन करावे. कुसुमाग्रजांच्या प्राणशक्तीतील हा अंतःसूर होय हे कळायला विलंब लागत नाही. या संग्रहातील परिशिष्टांत सामावलेली स्वगते आणि अवशिष्ट भाग हा या भावचिंतनाचा एक भाग आहे. पण त्याचा विचार हा एक स्वतंत्र विषय आहे. एकच म्हणता येईल ः कुसुमाग्रजांचे गद्य आणि पद्य या सीमारेषा म्हणजे अभ्यासाची एक सोय आहे. त्या दोहोंमधील मूलकंद शोधावा. ‘पाऊले’मध्ये मानवी संस्कृतीच्या परिक्रमेचा अंतर्शोध आहे. कुसुमाग्रजांच्या प्रज्ञा–प्रतिभेच्या मुशीतून जे नवनीत हाताशी गवसले आहे ते असे आहे ः
अशी पाऊले या पृथ्वीच्या रस्त्यावर, इतिहासावर प्रकाश प्रेरित चालत होती. म्हणून धरती सूर्य–कुळातून तुटली नाही. तिमिराचे तट भेदून मानव चालत राहिला. मानवी संस्कृतीच्या संदर्भात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी म्हटल्याप्रमाणे ः ‘माणूस मरतो; पण मानवता जगते.’
‘हे प्रवासी नमस्ते-’ हे जवळजवळ निरोपाचे गाणे आहे. ‘मातीमधील यात्रा सरणे’, ‘हृदयात मूर्ती उरणे’, ‘धरती श्रीमान् करून जाणे’ आणि ‘नीलाचेही नयन झरणे’ या प्रक्रियांची अधोरेखिते ही कुसुमाग्रजांच्या जीवननिष्ठेची अधोरेखितेच होत.
आपल्या ‘मृण्मय’ जीवनातून निघून जाताना माणसाने काय हिरण्मय द्यायचे असते? कुसुमाग्रजांना स्वतःला कधी हा प्रश्न विचारण्याची गरज भासली नाही. त्यांच्या जीवनव्रताची सांगता ‘थांब सहेली’मध्ये आहे. त्यातील निःशेष संक्षेपाने येथे सामावलेले आहे याचा प्रत्यय येतो.

