नावेलीतील अपघातात दांपत्याचा बळी

0
15

>> अपघातांचे सत्र सुरुच; कारची दुभाजकासह दगडी कुंपणाला धडक; चौघे जखमी; चालकाला डुलकी लागल्याने अपघात

राज्यात आठवडाभरापासून अपघातांची मालिका सुरूच असून, काल पहाटे नावेली येथे झालेल्या स्वयंअपघातात एका दांपत्याचा मृत्यू झाला. त्याशिवाय कारचालकासह चौघे जखमी झाले. हा अपघात पहाटे ५.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. दुबईहून मायदेशी परतलेल्या या दांपत्यावर घरी पोहोचण्याआधीच काळाने घाला घातला. ज्योकिम रॉड्रिग्स (७२) आणि त्यांची पत्नी लीना आल्बेर्टिना ज्योकिम रोचा रॉड्रिग्स (७४) अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योकीम रॉड्रिग्स, त्यांची पत्नी लिना आल्बेर्टिना ज्योकीम रोचा रॉड्रिग्स, त्यांची मुलगी जेसिआ सिबा रॉड्रिग्स (५२), नात व्हेनिता नोरोन्हा (१६) ही चौघे दुबईहून काल गोव्यात परतली होती. दाबोळी विमानतळावर उतरून सर्वजण टुरिस्ट टॅक्सीने (क्र. जीए-०८-व्ही-४२०७) आपल्या करमणे येथील घरी निघाले होते.
चिंचोणे येथील जावई सांतान नोरोन्हा यांनी आपली पत्नी, मुलगी आणि सासू-सासर्‍यांना विमानतळावरून घरी आणण्यासाठी भाडेपट्टीवर बॅनी पेरेरा यांची टुरिस्ट टॅक्सी भाडेपट्टीवर घेतली होती. ही टॅक्सी बॅनी पेरेरा हेच चालवत होते. पहाटे ३ वाजता विमानतळावरून सर्वांना घेऊन तो घरी परतत होता. नावेली चर्चजवळील रस्त्यावरून करमणे येथे निघाला असता नागमोडे येथे पहाटे ५.४५ च्या सुमारास कारला स्वयंअपघात घडला. सुरवातीस कारची धडक उजव्या बाजूने रस्त्यावरील दुभाजकाला बसली व त्यानंतर तोल गेल्याने डाव्या बाजूने असलेल्या दगडी कुंपणाला जोराची धडक बसली, त्यात दोघे ज्योकिम व लीना हे पती-पत्नी ठार झाले. या अपघातात कारच्या दर्शनी भागासह एका बाजूचा चक्काचूर झाला. कारचालकाला डुलकी लागल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटून हा अपघात घडला. या अपघात कारचालक बॅनी पेरेरा, सांतान नोरोन्हा, जेसिआ सिबा रॉड्रिग्स आणि व्हेनिता नोरोन्हा या जखमी झाल्या. त्यांना लगेचच बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

१० दिवसांत ८ बळी

राज्यात २४ जुलैपासून अपघातांचे सत्र सुरू झाले असून, ते काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. २४ जुलै रोजी अटल सेतूवर झालेल्या अपघातात एका पोलिसाचा बळी गेला होता. २८ जुलै रोजी झुआरी पुलावरील अपघातात चौघांचा, तर धारगळ येथील अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता काल २ ऑगस्टला झालेल्या एका दांपत्याचा बळी गेला. त्यामुळे गेल्या १० दिवसांत तब्बल ८ जणांना अपघातात प्राण गमवावा लागला.