नावेलीच्या ‘त्या’ केंद्रावरील मतदानाची चौकशी सुरू

0
74
लोकसभा निवडणुकीवेळी नावेली विधानसभा मतदारसंघातील एका केंद्रावर मतदारांना यादीत नाव नसल्याचे सांगून परत पाठवल्या प्रकरणी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी मिहीर वर्धन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी काही दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असे आश्‍वासन श्री. वर्धन यांनी दिल्याचे तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार चर्चिल आलेमांव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

१३ रोजी लोकसभा निवडणुकीवेळी नावेली मतदारसंघातील एक मतदान केंद्रावर सरकार नियुक्त मतदान केंद्र अधिकार्‍याने (बीएलओ) ४२ मतदारांना यादीत नावे नसल्याचे सांगून परत पाठवल्याचा आरोप करून श्री. आलेमांव यांनी १४ एप्रिल रोजी तक्रार नोंदवली होती. बीएलओने जुनी यादी वापरून मतदारांना परत पाठवल्याचा आरोप होता. इतरही काही मतदार केंद्रावर असे प्रकार घडल्याचा चर्चिल यांचा आरोप होता. 
लोकसभा निवडणुकीवेळी युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष वालंका आलेमांव यांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध काम केल्याने त्यांच्यावर कारवाई होईल, असे सांगण्यात येते. यावर प्रतिक्रिया देताना आलेमाव यांनी प्रश्‍न केला की, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बंधूनी भाजपात प्रवेश केला आहे, म्हणून पंतप्रधानांवर शिस्तभंगाची कारवाई कॉंग्रेस करणार आहे का? दरम्यान, लोकसभा निवडणुकीत आपणास ४० हजारांपेक्षा जास्त मते मिळतील व त्यात ८ हजारपेक्षा जास्त मते नावेली मतदारसंघात असतील, असे आलेमाव म्हणाले.