नारीशक्तीचा विश्वविजय

0
9

भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकून ऐतिहासिक यश संपादन केले. विश्वविजयाचा दुष्काळ संपवत भारतीय महिलांनी आपले नाव क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविले. हा केवळ क्रिकेटमधील विजय नाही, तर भारतीय समाजातील महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. हा विजय त्या सर्व संघर्षांचा, प्रयत्नांचा आणि दृढनिश्चयाचा परिपाक आहे, जो अनेक वर्षं भारतीय महिला खेळाडूंनी घाम आणि अश्रू गाळत साधला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची ही झेप अनेक वर्षांच्या कठोर प्रयत्नांची फलश्रुती आहे. एका काळी महिला क्रिकेटकडे केवळ ‘पूरक’ स्वरूपात पाहिले जात होते, पण आज या संघाने आपल्या कामगिरीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या विश्वचषकात भारताने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या बलाढ्य संघांना नमवून जे वर्चस्व दाखवले. ते महिला क्रिकेटच्या नवनिर्मित सामर्थ्याचे द्योतक आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या शांत, परिपक्व नेतृत्वाखाली संघाने दाखवलेली एकजूट आणि धैर्य विलक्षण होते. स्मृती मंधाना साखळी फेरीत दाखवलेले सातत्य तिच्या लौकिकाचा वाढता आलेख दर्शवणारे ठरले. भन्नाट फॉर्ममध्ये असताना भारताची उदयोन्मुख दमदार सलामीवीर प्रतीका रावल जायबंदी झाली. मोक्याच्या क्षणी बसलेल्या या धक्क्यामुळे टीम इंडिया काहीशी बॅकफूटवर गेली. परंतु, राखीव खेळाडूंत देखील नसलेल्या शफाली वर्माला संघात घेण्याचा संघ व्यवस्थापनाचा निर्णय विजेतेपदाच्या लढतीत मास्ट्ररस्ट्रोक ठरला. मुंबईकर जेमिमाचे योगदान देखील विसरून चालणारे नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात जेमिमा रॉड्रिग्सने केलेली धीरोदात्त खेळी क्रिकेट रसिकांच्या नेहमीच स्मरणात राहील. संपूर्ण स्पर्धेत धावा जमविण्यासाठी संघर्ष केल्यानंतर सर्वांत बलाढ्य प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तिने ठोकलेले शतक भारताच्या विश्वविजयातील सर्वांत निर्णायक खेळींपैकी ठरले. अनुभवी रेणुका ठाकूर, युवा क्रांती गौड, नवोदित श्री चरणी व अष्टपैलू दीप्ती शर्मा यांच्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना गुडघे टेकवायला भाग पाडले. या सर्व खेळाडूंनी भारताच्या क्रिकेट इतिहासात आपली नावे सुवर्णाक्षरांनी कोरली आहेत. या रणरागिणींनी आपल्या प्रशिक्षण कौशल्याने संपन्न करत अमोल मुजुमदार यांनी वाहवा मिळविली. हरमनने विजयानंतर ‘कोच सर’चे धरलेले पाय मेहनत फळास लागल्याचेच ध्योतक हेोते. हा विजय केवळ एक स्पर्धा जिंकण्यापुरता मर्यादित नाही. हा भारतातील स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने झालेला एक मोठा टप्पा आहे. ग्रामीण भागातील किंवा छोट्या शहरांतील असंख्य तरुणींना आता या संघातील खेळाडूंमध्ये स्वतःचे प्रतिबिंब दिसते या विजयानंतर अनेक पालक आपल्या मुलींना खेळात उतरवण्याचे धाडस दाखवतील, हा सामाजिक बदलाचाही विजय आहे.
भारतीय महिला संघाचा प्रवास सोपा नव्हता. संसाधनांची कमतरता, माध्यमांचे दुर्लक्ष, आर्थिक मर्यादा या सगळ्यांवर मात करून या खेळाडूंनी आपला मार्ग स्वतः तयार केला. मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंनी या प्रवासाचा पाया घातला; आजची पिढी त्यावर उभी आहे. त्यामुळे हा विजय त्यांच्या वारशाचाही गौरव आहे. या ऐतिहासिक यशानंतर आता भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाची जबाबदारी अधिक वाढते. महिला खेळाडूंना अधिक आर्थिक बळकटी, उत्तम प्रशिक्षक, दर्जेदार स्पर्धा देणे गरजेचे आहे. वूमन्स प्रीमियर लीग ही सुरुवात चांगली आहे, पण तिचा विस्तार आणि व्यावसायिक पातळीवरचा विकास आवश्यक आहे. सरकार आणि कॉर्पोरेट क्षेत्रानेही या संघाच्या यशाला फक्त अभिनंदनापुरते न ठेवता, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे. कारण हा संघ केवळ भारताचे प्रतिनिधित्व करत नाही, तर स्त्री शक्तीचा नवा चेहरा बनला आहे. आजची भारतीय मुलगी केवळ स्वप्न पाहत नाही, तर ती स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद ठेवते आणि हा विश्वचषक त्या आत्मविश्वासाचा पुरावा आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी या विजयाचे महत्त्व केवळ चषकापुरते राहणार नाही, तर तो ‘तू करू शकतेस’ या भावनेचा जिवंत पुरावा ठरेल. भारतीय महिला क्रिकेटचा हा सुवर्णक्षण देशातील प्रत्येक नागरिकाच्या हृदयात अभिमान निर्माण करणारा आहे. मैदानावरून उंचावलेला तिरंगा झेंडा आता प्रत्येक भारतीय मुलीच्या स्वप्नातही फडकणार आहे. ही केवळ बॅट आणि बॉलची लढाई नव्हती, ती होती समानतेच्या, आत्मविश्वासाच्या आणि सक्षमीकरणाच्या विजयाची कहाणी.