नादुरुस्त ट्रकला दुचाकीचीधडक बसून तरुणाचा मृत्यू

0
14

चिखली-कोलवाळमधील घटना; एक गंभीर जखमी

कोलवाळ औद्योगिक वसाहतीजवळ सोमवारी रात्री 11.30 च्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात रवीश यदुनंद तारी (20, रा. सांत इस्तेव, तिसवाडी) या तरुणाचा मृत्यू झाला, तर लक्ष्मण भोसले (18, रा. हळदोणा) हा गंभीर जखमी झाला आहे. ते दोघेही मित्र असून कामुर्ली येथे नातेवाईकांकडे जाऊन परत येत असताना हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, चिखली-कोलवाळ येथील ग्लेनमार्क कंपनीजवळ एक नादुरुस्त झालेला मालवाहू ट्रक मागील आठ दिवसांपासून रस्त्याच्या कडेला उभा होता. सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास दुचाकीने या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी रवीश तारी याला मृत घोषित केले, तर लक्ष्मण भोसले याला पुढील उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) येथे हलविण्यात आले. या अपघाताचा पंचनामा पोलीस उपनिरीक्षक दत्तराज राणे आणि सहाय्यक उपनिरीक्षक अनिल पिळगावकर यांनी केला.

23 दिवसांत 18 जणांचा मृत्यू
जून महिन्यातील अपघातांची आकडेवारी धक्कादायक आहे. केवळ 23 दिवसांत 22 अपघातांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सहा अपघात अत्यंत भीषण स्वरूपाचे होते. मृतांमध्ये 14 ज्येष्ठ नागरिक आणि चार तरुणांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांत तीन दाम्पत्यांसह अनेक नागरिकांना अपघातांमध्ये जीव गमवावा लागला आहे. वाढता वेग, वाहतूक नियमांचे उल्लंघन, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे आणि रस्त्यांवरील अडथळे ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत.