Home बातम्या नात्यांची गुंतागुंत

नात्यांची गुंतागुंत

0

– बीना नायक

पर्वरी

हल्ली माहेर कुठलं नि सासर कुठलं तेच ओळखायला येत नाही. शहरात दूर कुठेतरी शिकण्यासाठी अथवा नोकरीसाठी कुणी मुलगा निघाला की निरोप देतेवेळी आईबरोबर इतर बायकांचे डोळेही सहज पाणावत होते. मग कुणी आणलेला लोणच्याचा डबा, चकल्या वगैरे जिन्नस बॅगेत भरताना त्या मुलांना सामान कधीच ‘जड’ वाटलं नाही. पण निघताना पावलं मात्र जड व्हायची. पदार्थ दोन दिवसांत संपूनही जायचे, पण त्या आठवणींच्या गाठोड्यात बांधलेली संस्काराची शिदोरी त्याला पुढे आयुष्यभर पुरत होती.

…………..

व्यवहार आणि भावना एकत्र नांदत नाहीत म्हणतात. त्यांचा समतोल बघायला मिळणं फार दुर्मीळ. पूर्वी माणसाचं जीवन भावनेने बांधलेलं होतं; आता व्यवहाराने गुंडाळलंय. व्यवहारावर आधारलेले नातेसंबंध हे वरून गोंडस पण आतून ठिसूळ. भावनेचं तसं नाही. भावनिक बंध खोलवर गुंतलेले, म्हणूनच अतूट असतात. त्यासाठी ते जन्मानेच असावे लागतात असं काही नाही. असं सगळ्यात जवळचं नातं म्हणजे शेजार किंवा मित्रमैत्रिणी. खरं तर नातेवाइकांपेक्षाही यांची सोबत जास्त असते. आजकाल माणूस स्वत:भोवतीच एवढा गुरफटलेला गेलाय की बंद दाराच्या पलीकडेही माणसं राहतात याचा त्याला सहज विसर पडलाय. भिंती पूर्वीही होत्या, पण त्या घराघरांना जोडणार्‍या होत्या. मनाची कवाडं सदैव उघडी असणार्‍या त्या वेळच्या माणसांना मधल्या भिंती कधीच आड आल्या नाहीत.

सण हे खरं तर माणसामाणसांना सांधणारे पूल असतात. या पुलांखालून आता बरंच पाणी वाहून गेलंय. पहाटेच्या वेळी शेजारच्या दारी फुललेली जाईची टपोरी फुलं तोडताना कुणाची परवानगी घ्यावी लागत नव्हती. चतुर्थीच्या वेळी करंजीला नक्षीदार करणारी एकच कातण घराघरांतून हक्कानं फिरत होती. शंकरपाळ्या काय किंवा लाडू काय, अनेकजणींच्या हातांचा स्निग्धपणा घेऊनच ते आकार घेत होते. गणपतीच्या दिवसांत एका घरात समस्त बालगोपाळांनी केलेला ‘गणपती बाप्पा मोरया’चा घोष सगळ्याच घरातनं तितक्याच मोठ्यानं येत असे. आताशा गणपती विसर्जनाच्या तळीवर शेजार्‍यांची गाठ पडते तेव्हा कळतं, ‘‘अरेच्या! यांच्याकडेही गणपती होता वाटतं!’’

हे सारं फक्त सणावारीच व्हायचं असं नव्हतं. एरवीही घरात केळफुलाची भाजी कधीही केली तर शेजारच्या काकांसाठी एक डबा भरून जायचाच. ताटात वाढलेली नावडती भाजी पाहून मी नाक मुरडायला लागले, की पटकन उठून ‘‘थांब, तुला माझ्याकडच्या बटाट्याच्या फोडी आणून देते’’ असं म्हणत वाटी घेऊन येणार्‍या काकू वेगळ्या घरात राहतात असं कधी वाटलंच नाही. शिंदेच्या घरात नाका-तोंडाला पाणी आणणारी तिखट भरती वांगी केली की त्यातल्या दोन वांग्यांना माझ्या घरची दिशा सांगावी लागत नव्हती. आता भाजीबाजारात भरल्या टोपल्यांतून ती वांगी शोधूनही सापडत नाहीत. याही पलीकडे जाऊन आम्हा मुलांना वडिलांकडून मिळणारा प्रासंगिक मार आईइतकाच तिथं उभ्या असलेल्या ताईंनी किंवा काकूंनी किती तरी वेळा वाचवला असेल. त्यांच्या पदरामागे लपतानाही खात्रीचा आधार वाटायचा. एका घराचा जावईबापू आला तर बाकी घरांतूनही त्याला जावयाचाच मान मिळत होता. माहेरवाशीण आली की सगळ्या बायका तिच्याभोवती गोळा व्हायच्या. हल्ली माहेर कुठलं नि सासर कुठलं तेच ओळखायला येत नाही. शहरात दूर कुठेतरी शिकण्यासाठी अथवा नोकरीसाठी कुणी मुलगा निघाला की निरोप देतेवेळी आईबरोबर इतर बायकांचे डोळेही सहज पाणावत होते. मग कुणी आणलेला लोणच्याचा डबा, चकल्या वगैरे जिन्नस बॅगेत भरताना त्या मुलांना सामान कधीच ‘जड’ वाटलं नाही. पण निघताना पावलं मात्र जड व्हायची. पदार्थ दोन दिवसांत संपूनही जायचे, पण त्या आठवणींच्या गाठोड्यात बांधलेली संस्काराची शिदोरी त्याला पुढे आयुष्यभर पुरत होती. घरातला माणूस तापाने फणफणला तर त्याची धग भिंतीपलीकडेही जाणवणारी ती संवेदना आता गेलीय कुठं?

आता जागा तीच आहे. इमारती झाल्या. माणसं तीच; पण पूर्वी माणसामाणसांतून गुंफलेली आपलेपणाची माळ आज तुटली आहे. तिचे मणी विखुरलेले आहेत. कॉंक्रीटमध्ये एवढी ताकद आहे का, की माणसानेही त्यात वाळूसारखं मिसळून घट्ट होऊन जावं? जीवन धावपळीच झालंय हे मान्य, पण फोडणीत टाकलेल्या लसणाचा वास जर शेजारी जाऊ शकतो तर त्याहीपेक्षा वेगवान असणारं मन दोन क्षणांसाठीही जाऊन येऊ नये? आज पूर्वीपेक्षाही कितीतरी जास्त पट धावपळ आहे तरी या सगळ्या सोसायट्या झोपल्यासारख्या का वाटतात? एकमेकांत संवाद, देवाणघेवाण अजिबातच नाही असं नाही, पण भावनिक ओलावा कुठं तरी कमी झाल्यासारखा वाटतो. एकाच इमारतीत वेगवेगळ्या विंगमध्ये राहणार्‍या व्यक्ती जेव्हा पार्किंगमध्ये भेटल्यावर ‘या ना एकदा घरी’ म्हणतात, तेव्हा ते अगत्य असतं की शिष्टाचार याचा संशय येऊन जातो. हा ‘एकदा’ उगवेलच याची खात्री नसते.

आता सगळ्या सणांना मिठाई बॉक्सेस देण्याची फॅशन आलीय. या मिठाईत साखर असते पण गोडवा नसतो. मकर संक्रांतीच्या ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ या बोलांची फक्त अक्षरं उरलीत, अर्थ कधीच हरवून गेलाय. वटपौर्णिमेला सखी-शेजारणींबरोबर वडाच्या पाराशी जमणार्‍या स्त्रिया हल्ली नाइलाजास्तव त्याच्याच फांद्या बाजारातून आणून आपापल्या घरात धागा गुंडाळतात तेव्हा वाटतं, हे वडाचं पूजन आहे की स्वत:भोवती घातलेलं बंधन? एकूण काय, सणही माणसाला एकत्र आणायला कुचकामी ठरू पाहताहेत, अशीच परिस्थिती आहे. पुढच्या काळात ते फक्त कॅलेंडरवरच शिल्लक राहतील की काय अशी भीती वाटते.

कितीही घाई असली, तरी पार्किंगमध्ये गाडीला किक मारताना शेजार्‍याशी दोन वाक्य पण मनापासून बोलली तरी पुष्कळ आहे. अडीअडचणीला आपण हक्कानं शेजार्‍याला हाक मारावी व त्यानंही तत्परतेनं, आपुलकीनं धावून यावं, अशी परिस्थिती आता आपणच निर्माण करायला हवी. म्हणजे मग भिंतींना कान असतात तसं मनही येईल.

………….