नाती जपायला हवीत!

0
24
  • ज. अ. रेडकर

बहरलेल्या झाडावर अनेकविध पक्षी येतात आणि बहर ओसरला, वृक्ष निष्पर्ण झाला की ते त्याकडे पाठ फिरवतात. वृक्षाची मुळे मात्र वृक्षाच्या अंतिम श्वासापर्यंत साथ करतात. नात्याच्या बाबतीत हेच घडत असते. म्हणूनच नाती जपायला हवीत!!

संपूर्ण जगात भारतीय कुटुंबपद्धती सर्वश्रेष्ठ मानली जाते. कारण इथे नाती जपली जातात. परस्परांशी जुळलेले हृदबंध घट्ट विणीचे असतात. सख्खे-चुलत, मामे-मावस आणि कधी कधी सावत्र भावंडेदेखील एकमेकांना जीव की प्राण असतात. एकत्र कुटुंबपद्धती असताना सख्खे कोण, चुलत कोण, सावत्र कोण हा भेददेखील कुणाला कळायचा नाही एवढी सलगता नात्यांत होती.

शिक्षणासाठी आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी-धंद्यानिमित्ताने माणसे दूर गेली आणि त्यांचे संबंध कालपरत्वे दुरावत गेले. काहीजण तर आपला जन्मगाव विसरले. बालपणी मित्रांच्या संगतीत खेळलेल्या सूरपारंब्या, ते नदीतील पोहणे, खेळाच्या डावावरून केलेली भांडणे व मारामाऱ्या, कुणाच्याही मालकीच्या झाडावर दगड मारून पाडलेल्या कैऱ्या, चिंचा किंवा बोरे आणि घोळक्यातील मुलींच्यावर पाडलेले इम्प्रेशन! या सगळ्या आठवणी वयोपरत्वे आणि कालपरत्वे पुसट होत जातात. नातीदेखील आता खूपच संकुचित झाली आहेत. पती-पत्नी, आपली मुले एवढाच आकृतिबंध उरला आहे. या छोटेखानी कुटुंबापलीकडे वेगळे जग असते हे अनेकांना ठाऊकदेखील नसते. वडीलधाऱ्या मंडळीचा आदर राखावा, त्यांना उलट उत्तरे देऊ नयेत, आपली चूक झाली असेल तर माफी मागावी, घरातून बाहेर निघताना वडीलधाऱ्यांची परवानगी घ्यावी, कुठे जाणार आणि परत कधी येणार याची सूचना द्यावी यांसारखे संस्कार नवीन पिढीवर होत नाहीत. व्यक्तिस्वातंत्र्याचा टेंभा मिरवला जातो खरा, परंतु यातून स्वैराचाराचा जन्म होतो आहे हे विसरले जाते.

नात्यांची वीण उसवत गेली तशी मने तुटत गेली. कालच एका फेसबुक मित्राने पोस्ट टाकली होती की, कुणाबद्दल अधिक अपेक्षा ठेवू नये म्हणजे नाती तुटत नाहीत. किंबहुना आपल्या मुलाबाळांकडूनदेखील अपेक्षा ठेवू नयेत. आपण त्यांना जन्म दिला, त्यांचे उत्तम संगोपन केले, त्यांना उत्तम शिक्षण दिले, त्यांचे लाड पुरवले हे आपले कर्तव्य आणि आवड म्हणून केले. त्या बदल्यात मुलांनी आमच्या वृद्धापकाळात आमची काळजी घ्यावी अशी अपेक्षा ठेवू नये. तारुण्याच्या काळात आपणच आपल्या वृद्धापकाळाची तरतूद करून ठेवावी म्हणजे कुणावर अवलंबून राहू लागू नये. तार्किकदृष्ट्या आणि बदलत्या काळानुसार हे विचार कितीही उदात्त वाटत असले तरी आपण आपला वंशवेल वाढवतो तो कुठल्यातरी अपेक्षेनेच ना! मुलांचे संगोपन हे जसे आई-वडिलांचे कर्तव्य असते त्याप्रमाणे मातापित्याच्या वृद्धापकाळी त्यांची देखभाल करणे, त्यांची काळजी वाहणे ही मुलांची जबाबदारी नसावी का? खरे तर हा संस्काराचा भाग आहे. कुटुंबात जसे संस्कार मुलांवर घडवले जातात तशी मुले घडतात. आपण आपल्या आई-वडिलांचा मानसन्मान राखत असू तर तो संस्कार अप्रत्यक्षरीत्या घरातील लहान मुलांवर होत असतो आणि याउलट आपले वर्तन असेल तर आपली मुले मोठी झाल्यावर आपल्याशी फटकून वागू लागतात.

साधारणपणे पहिला, पाचवा, पंचविसावा, पन्नासावा, पंचाहत्तरवा, ऐंशीवा वाढदिवस हे काही महत्त्वाचे टप्पे असतात. शिशुवयातील मुलांचे वाढदिवस त्यांचे आई-वडील मोठ्या कौतुकाने करतात. जवळच्या नातलगांना, मित्रमंडळीला यासाठी आग्रहाने निमंत्रित केले जाते. मुले मोठी झाली, वयात आली की त्यांचे वाढदिवस ती आपल्या मित्रांबरोबर कुठल्यातरी रम्य ठिकाणी सेलिब्रेट करतात. तिथे त्यांना मुक्तपणे धिंगाणा घालता येतो. घरात असे स्वातंत्र्य त्यांना मिळत नसते. म्हणून ही मुले अशी वागतात. मुळात धिंगाणा घालण्यासाठीच त्यांना निमित्त हवे असते. श्रीमंतांच्या मुलांचे वाढदिवस दुहेरी पद्धतीने साजरे केले जातात. एक आपल्या आई-वडिलांच्या आणि नातलगांच्या बरोबर आणि दुसरा खास मित्र-मैत्रिणींसोबत कुठल्यातरी तारांकित हॉटेलमध्ये किंवा पर्यटनक्षेत्री!

कालपरवाच आमच्या एका धनाढ्य नातेवाइकाचा वाढदिवस त्याच्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांनी आयोजित केला होता असे सांगितले जाते. पण या भव्य सोहळ्याचा खर्च मालक म्हणून त्यानेच उचलला असणार यात संशय नाही. वास्तविक त्याच्या आयुष्यातील सुवर्णमयी वाढदिवस होता. याचे निमंत्रण त्याने आपल्या जवळच्या नातेवाइकांना देणे अपेक्षित होते. परंतु तसे घडले नाही. किंबहुना त्याने गावी हयात असलेल्या वृद्ध मातापित्यालादेखील या प्रसंगी बोलावून घेतले नाही किंवा गावी जाऊन त्यांना आणले नाही. आपल्या मुलाचे होत असलेले कौतुक पाहणे यात कोणत्याही मातापित्याला अपूर्व आनंद वाटतो. तोच याने हिरावून घेतला. आपली पत्नी, मुले आणि नव्याने मिळालेले मित्र यांच्या संगतीत हा वाढदिवस त्याने थाटात साजरा केला.

मला काही ही गोष्ट रूचली नाही. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून मुलाचे लाड पुरवले, शिक्षण दिले, यामुळे तो आज उद्योगपती झाला होता. बक्कळ पैसा कमावत होता. पण तो आपल्या जन्मदात्यांनाच विसरला!
पैसा असला की मित्रांचे कोंडाळे आपल्याभोवती आपसूक जमा होते; आणि निर्धनता येते तेव्हा हेच मित्र आपल्यापासून दूर जातात, काहीवेळा तर ओळखदेखील दाखवीत नाहीत. आपले आई-वडील आणि जवळचे नातेवाईक तसे नसतात. पैसा असो अथवा नसो, आपली माणसे आपली साथ कधीच सोडत नाहीत. कठीण प्रसंगी धीर देणारी आणि मदत करणारी आपलीच माणसे असतात. कोणत्याही कठीण प्रसंगीच नात्यातील माणसांची आणि मित्रांची खरी ओळख पटत असते. बहरलेल्या झाडावर अनेकविध पक्षी येतात आणि बहर ओसरला, वृक्ष वठला, निष्पर्ण झाला की ते त्याकडे पाठ फिरवतात. वृक्षाची मुळे मात्र वृक्षाच्या अंतिम श्वासापर्यंत साथ करतात. नात्याच्या बाबतीत हेच घडत असते. म्हणूनच नाती जपायला हवीत!!