– विष्णू सूर्या वाघ
‘नाटक’ या कलाप्रकाराकडे आपण आजपर्यंत ‘एक करमणुकीचे साधन’ या दृष्टिकोनातूनच बव्हंशी पाहिले आहे. मध्यंतरीच्या काळात ही दृष्टी थोडीशी बदलली आणि नाटकाकडे आपण ‘अभिव्यक्तीचे साधन’ म्हणून पाहू लागलो. काहीजणांनी नाटक हे प्रबोधनाचे साधन म्हणूनही वापरले. आजकाल बिझनेस मॅनेजमेंटच्या दुनियेत नाटक हे व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन म्हणून वापरतात. या पार्श्वभूमीवर नाटक आणि अध्यात्म यांचा दुरान्वयानेही काही संबंध असू शकेल का? असा प्रश्न कोणालाही या लेखाचे शीर्षक वाचल्यानंतर पडू शकेल.
आधुनिक मराठी रंगभूमीचा उगम एकोणीसाव्या शतकाच्या मध्यावर झाला. विसाव्या शतकात मराठी नाटक सर्वांगाने बहरले, आणि आता एकविसाव्या शतकात मनोरंजनाच्या क्षेत्रातली नाटकांची मॉनोपोली जाऊन आपणाला अनेक पर्याय उपलब्ध झाले. आजच्या युगाचा कल हा सामूहिकरीत्या एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेण्याऐवजी व्यक्तिगत पातळीवर तिचा अनुभव घेण्याकडे अधिक आहे. अर्थात विसावं शतक, एकविसावं शतक हे सगळे शब्दप्रयोग सापेक्ष आहेत. आपल्याला जेवढं काही ज्ञात असेल त्याच्या चौकटीतच माणूस आपली परिमाणं वसवतो. अज्ञाताचा वेध कोणीही घेऊ शकलेला नाही. त्यासाठी आपली साधनं अपुरी आहेत. ज्ञानाची कक्षा विस्तीर्ण असली तरी ती सीमित आहे.
जगाचा आरंभ कधी झाला आपल्याला नक्की माहीत नाही. या विराट ब्रह्मांडाची व्याप्ती केवढी आणि अवकाशाच्या चिरंतन पोकळीत पृथ्वीचं नेमकं स्थान काय… आपण आजही सांगू शकत नाही. आज आम्ही शतकांचा हिशेब मांडायला बसलो आहोत, पण आदिकालापासून सरत गेलेल्या युगाब्दांची गणना कुणी करू शकलाय का? इतिहासाच्या रंगमंचावर निर्मिकाने रचलेले अगणित खेळ काळाच्या पटलावर कुणी चितारू शकलाय का? या विराट ब्रह्मांडनाट्यात भूमिका करायचे सोडूनच द्या, पण एक साधा प्रेक्षक बनून एका क्षणापुरतं तरी या नाटकाचा आस्वाद आपण घेऊ शकलो आहोत का?
नाटक ः आदिमायेच्या विराटगर्भातील मायासृष्टी
माफ करा, हे प्रश्न कदाचित आपल्याला अनाठायी वाटतील. आपण म्हणाल… नाटकासंबंधी लिहिता लिहिता हा माणूस अध्यात्माची भाषा का बोलतो आहे? याचं कारण एवढंच आहे की नाटक आणि अध्यात्म यांचा गहिरा संबंध आहे. आपल्या वेदान्तात माया-भ्रमाचं वर्णन आहे. आपल्या भोवतालची ही सृष्टी म्हणजे मायेचं अपत्य. या दृश्य जगाच्या पलीकडे सत्य आहे. मायेचं पडळ भेदून त्या सत्याला भिडणं हीच खरी मुक्ती! वेद-उपनिषदात हजारो वर्षांपूर्वी सांगितलेला मायाविचार हाच आपण जिला आज रंगभूमी म्हणतो तिचा अंतःस्थ गाभा. ‘ऑल दि वर्ल्ड इज थिएटर’ हे वाक्य शेक्सपियरने लिहिले म्हणून आपण त्याचं केवढं कौतुक करतो! पण विश्वनाट्याचा खरा सूत्रधार हा परमेश्वर आहे. आपण सर्व त्याच्या हातातील कळसूत्री बाहुली आहोत. आपल्याला वेगवेगळ्या भूमिका देऊन तो स्वतः मात्र या नाटकापासून पूर्णतया अलिप्त राहतो हा सिद्धांत आपल्या वेदांनी, आमच्या उपनिषदांनी मांडला होता याचं आपल्याला सोयिस्करपणे विस्मरण होतं. त्याच विचाराचा धागा पकडून नाटकाची व्याख्या करायची झाली तर मी म्हणेन की नाटक ही आदिमायेच्या विराटगर्भात अंकुरित होणारी मायासृष्टीच आहे. मायेची दृश्य आणि अदृश्य अशी दोन रूपं आहेत. यांनाच आपण मूर्त (लेपलीशींश) आणि अमूर्त (रलीींीरलीं) असं म्हणतो. एखादा शिल्पकार छिन्नी-हातोडा घेऊन दगडापुढं बसतो तेव्हा या पाषाणाचा गणपती बनवावा की मारुती हे त्यानं आधी ठरवलेलं असतं. हीच त्याची अमूर्त कल्पना नंतर छिन्नी-हातोडा घेऊन तो पाषाणाचे टवके उडवीत जातो आणि जशी त्याची कल्पना असेल त्याप्रमाणं शिल्प तयार होतं. हे त्या पाषाणाचं मूर्त स्वरूप. नाटक ही कलाही अशीच आहे. नाटकाचं उत्पत्तीस्थान म्हणजे माणसाचा स्वभाव, त्याचे विकार, त्याचे विचार. या स्वभावांना लाभलेलं मूर्त स्वरूप म्हणजे त्या नाटकातील पात्रं, त्यांचं वर्तन, त्यातील घटना, त्याना लाभलेलं स्थल आणि काळ. या सर्वाचा संयोग अपेक्षित प्रमाणात झाला तरच नाटक पूर्ण होईल. कुठलीही एक बाजू कमकुवत राहिली तर ते नाटक आपल्याला समाधानी करू शकणार नाही.
मघाशी उल्लेख केलेल्या आदिमाया तत्त्वाचा आणि नाटकाचा संबंध काय आहे ते एका संस्कृत वचनावरून दिसून येईल.
कवयोनटवर्गश्च रंगभूमिः सभासदाः|
एतन्नाट्यकलायास्तुप्रोक्त मंग चतुष्टयम्॥
कवि षड्गुणसंपन्नो नाटकं पंचलक्षणम्|
नटो दशगुणश्चैव रंगभूमीश्चतुर्गुणा॥
सभागुणत्रयोपेतामुनीभिः परिकिर्तीता|
त्रयोविंशनिसंख्याकैर्गुणैर्युक्ता मनोरमा॥
महामायेव संयाती कलानाट्यस्यपूर्णनाम्|
पुरुषंरंजयित्वांच भुक्तिं मुक्तिंप्रयच्छती॥
नाट्यकला म्हणजे चार चाकांवर उभी असलेली एक सुवर्णशकटिका किंवा चार खांबांवर उभी राहिलेली एक सुंदर इमारत. वैद्यकात चिकित्सेची म्हणजे रोग बरा करण्याच्या कलेची चार अंगे सांगितलेली आहेत. ती अशी- वैद्य, औषध, परिचारक व रोगी. त्यातील प्रत्येकाचे चार गुण कल्पिलेले आहेत. म्हणून वैद्यकशास्त्र षोडशकलात्मक आहे असं आपण मानतो. त्याच धर्तीवर कवी, नट, रंगभूमी आणि सभासद हे रंगभूमीचे चार स्तंभ आहेत असं भरताचं नाट्यशास्त्र सांगतं. कवी म्हणजे आजच्या परिभाषेतला नाटककार. नट म्हणजे कलाकार. रंगभूमी म्हणजे दिग्दर्शक, नेपथ्य, ध्वनी, प्रकाश, रंगभूषा, वेशभूषा इत्यादी तांत्रिक अंगांचा संयोग आणि सभासद म्हणजे नाटक पाहणारा अर्थात प्रेक्षक.
उपरोल्लेखित चारही घटकांच्या अंगभूत गुणांचंही वर्णन भरतमुनीनं केलंय. बहुश्रुतता, कल्पकता, प्रतिभा, भाषेची स्वाधीनता, शब्दलालित्य व प्रसाद हे सहा गुण कवीच्या ठायी असावे असं शास्त्र मानतं. म्हणून कवीला ‘षड्गुणसंपन्न’ असं म्हटलंय.
‘नटोदशगुणः प्रोक्तः’ असं कलाकाराचं वर्णन आहे. कलाकार हा दहा गुणांनी युक्त करावा. निरोगी, बांधेसूद व अनुरूप शरीर हे तीन कायिक गुण, स्पष्ट भाषण, निर्दोष शब्दोच्चार व गोड आवाज हे तीन वाचिक गुण आणि स्मरणशक्ती, बुद्धी, अनुकरणशक्ती व नाट्यकलेचे प्रशिक्षण हे चार मानसिक गुण असे एकंदर दहा गुण कलाकाराच्या अंगी असावे असं नाट्यशास्त्राचं म्हणणं आहे.
रंगभूमीच्या म्हणजेच तंत्राच्या परिपूर्णतेसाठी सुविस्तीर्णता, रचनाबद्धता, स्वच्छता आणि उपकरणांची पूर्तता हे चार गुण आवश्यक मानले आहेत. मला वाटतं याचं विस्तारानं विवरण करायची गरज नाही. राहता राहिलं चौथं अंग- सभासदवर्ग अथवा प्रेक्षक- हासुद्धा तीन गुणांनी युक्त पाहिजे. विदग्धता, रसिकता आणि उदारता. नाट्यकलेची लेखन, अभिनय, दिग्दर्शन तंत्र ही सर्व अंगं परिपूर्ण असली आणि ‘प्रेक्षक’ हे चौथं अंग मात्र कोलमडलेलं असलं तर रंगभूमीही निरर्थक बनते. प्रभावहीन होऊन जाते!
आमची मुळं याच जमिनीत!
भरतमुनीच्या नाट्यशास्त्राचा विस्तारानं केलेला हा उल्लेख कदाचित आपल्याला कंटाळवाणा वाटेल. नाट्यसृष्टीच्या परंपरेबद्दल एखादं लांबलचक आख्यान मी लिहायला बसलोय की काय अशीही शंका आपल्याला वाटणं साहजिक आहे. पण मित्रांनो, या परंपरेचं स्मरण एवढ्याचसाठी केलं की बदलत्या काळाच्या प्रवाहात आपल्या परंपरेचे काही अंतःप्रवाह आपण बुजवून टाकले आहेत, आमच्या प्रेरणाच आम्ही विसरून चाललो आहोत, याची थोडीतरी जाणीव आपल्याला झाली पाहिजे.
ग्रीक आणि पाश्चात्त्य रंगभूमीचा मोठेपणा आंधळेपणानं स्वीकारताना आमच्या भूमीतली नाट्यकला पाश्चात्त्य परंपरेचं ‘बॉनसाय’ नसून भारतीयत्वाच्या जीवनशैलीतून निपजलेला विराट वटवृक्ष आहे याचं विस्मरण आम्हाला झालंय. म्हणून आज हे जुने प्रवाह धुंडाळत उगमाकडे जाण्याची वेळ आली आहे असे मला वाटते. आजच्या मॉडर्न मराठी थिएटरवर शेक्सपियर, मोलियर, इस्बेन, शॉ यांचा पगडा असेलही कदाचित, पण आदिकाळापासून इथल्या लोकजीवनाला आपल्या सावलीखाली घेऊन जगविणार्या नाट्यवृक्षाची पाळंमुळं मात्र भास, कालिदास, भवभूती, श्रीहर्ष या आद्य संस्कृत साहित्यिकांनी कसलेल्या भूमीतच रुजली आहेत हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही!
प्रादेशिकताही विश्वात्मक असावी
आपण कदाचित म्हणाल, मी नमनाला घडाभर तेल ओतलंय संस्कृत रंगभूमीचा विचार स्पष्ट करण्यासाठी. त्याचं कारण एवढंच की, नाटकाकडे प्रादेशिक दृष्टिकोनातून न पाहता थोडंसं वैश्विक पातळीवर जाऊन पाहावं लागेल. नाटक ही एक कला आहे आणि कला ही कधीच प्रादेशिक असू शकत नाही असं माझं प्रांजळ मत आहे. कलेमध्ये प्रादेशिकता जरूर असावी, पण त्या प्रादेशिकतेला विश्वात्मकतेचा आयाम नसेल तर तिचा अभिनिवेश अर्थशून्य बनतो! पाणी विहिरीत असतं. ओहोळातही पाणी असतं. पाणी नदीतून वाहतं आणि समुद्रातही पाणीच असतं. ओहोळ, नदी, विहीर, समुद्र यांचा विचार वेगळेपणे करता येईल. पण पाण्याचा विचार पृथक्पणे करता येईल का? पाण्याचा मूलभूत गुणधर्म तर एकच आहे. त्याचप्रमाणे ‘नाटक’ या कलेचा धर्मही एकच आहे. ‘गोमंतकीय मराठी नाटक’ या कल्पनेच्या कुंपणात आमचं नाटक बंदिस्त होऊ नये यासाठीच एका विस्तृत परंपरेचा वेध मी घेतला.
मराठी नाटकाच्या या परंपरेकडे मी पाहतो तेव्हा नाटक आणि अध्यात्म या दोन विषयांचा संबंध जोडताना एक दुवा ठळकपणे लक्षात येतो तो हा की मराठी संगीत रंगभूमीला खर्या अर्थाने जन्म देणारे आणि अण्णासाहेब किर्लोस्करांना संगीत नाटक लिहिण्याची प्रेरणा देणारे कृष्णंभट्ट बांदकर हे मुळात अध्यात्माचे अधिकारी होते. ‘विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे’ यासारख्या अभंगांची रचना ज्यानी केली, ‘स्वात्मतत्त्वामृत’सारखा पारमार्थिक व आध्यात्मिक ज्ञान देणारा ग्रंथ ज्यानी लिहिला ते बांदकर अध्यात्मक्षेत्रातील सर्वमान्य व्यक्ती होती. पण त्यांनी नाटकाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले नाही. प्रभू रामचंद्राची सेवा म्हणून त्यांनी नाट्यरचना केली.
अण्णासाहेब किर्लोस्करांना ‘सं. शाकुंतल’ लिहिण्याची प्रेरणा देणारे संतकवी कै. कृष्णंभट्ट बांदकर यांच्या व्यास्तव्यानं पुनित झालेल्या डोंगरी गावात मी जन्माला आलो हे मी माझं पूर्वसंचित मानतो. संगीत नाटकाचे जनकत्व बांदकरमहाराजांकडे जाणे साहजिक असताना इतिहासानं मात्र ही कीर्तीमाला अण्णासाहेब किर्लोस्करांच्या गळ्यात घातली याचा विषाद मलाही वाटतो. पण त्याचा फाजील अभिनिवेश बाळगून किर्लोस्करांना बांदकरांहून कनिष्ठ दर्जाचा नाटककार ठरवण्याचा प्रमाद मी करणार नाही. डोंगरीच्या खेडवळ परिसरात बहुजनसमाजातील अशिक्षित लोकांना एकत्र करून त्यांच्याकरवी ‘शुकरंभासंवाद’, ‘नटसुभद्राविलास’, ‘अहिल्योद्धार’, ‘लोपामुद्रा संवाद’ आणि इतर नाटके लिहिणारे कृष्णंभटजी ‘कलाकृती’च्या दृष्टिकोनातून नाटकाचा विचार करू शकले नव्हते. साहित्य हे रंजनासाठी नाही, भगवद्भक्तीच्या प्रसारासाठी आहे अशीच त्यांची ठाम समजूत होती. त्यामुळे कृष्णभटजींना नाटकाचा स्थायी आकृतीबंध उमजू शकला नाही.
मिठाच्या व्यापारासाठी लॉर्ड क्रॉफर्डबरोबर गोव्यात आलेल्या किर्लोस्करांनी डोंगरीला जाऊन ही नाटकं पाहिली आणि या माध्यमाची ताकद त्यांनी हेरली. नाटक ही कला आहे आणि कलेत प्रबोधनाबरोबरच रंजनही असावं लागतं याचा साक्षात्कार घडलेल्या किर्लोस्करांना बांदकरांचा कृपाशीर्वाद लाभला आणि ‘शाकुंतल’ जन्माला आलं. त्यानंतरच्या ‘सौभद्र’ने अक्षरशः इतिहास घडवला. कृष्ण, बलराम, अर्जुन, नारद, सुभद्रा, रुक्मिणी ही पात्रं घेऊन किर्लोस्करांना एक उत्कृष्ट भक्तिरसप्रधान नाटक लिहिता आलं असतं, पण विषयाच्या पौराणिकतेला महत्त्व देण्यापेक्षा किर्लोस्करांनी या पौराणिक पात्रांच्या अंतरातले माणुसकीचे पदर उलगडून दाखवले. संगीत नाटकांचं जनकत्व बांदकरांऐवजी अण्णासाहेबांना का गेलं या प्रश्नाचं तटस्थपणे चिंतन करताना हे सारं मला जाणवतं.
एवढंच कशाला, आधुनिक मराठी नाटकाचे जनक म्हणून १८५३ साली सं. ‘सीतास्वयंवर’ सादर करणार्या विष्णुदास भाव्यांचं नाव घ्यावं की त्याहीपूर्वी सुदूर दक्षिणेकडच्या तंजावरमध्ये मराठी नाटकं करणार्या शहाराजे भोसल्यांना मुजरा करावा हा प्रश्नही मला फारसा महत्त्वाचा वाटत नाही. कारण गोमंतकीय लोकसमाजात नाटकांची प्रेरणा त्याही आधीपासून चालत आली आहे. गोमंतकाचा दशावतार, जागर, रणमाले या सर्व लोककलाप्रकारांचा अंतस्थ गाभा नाटकांचाच आहे. फरक एवढाच की लोकनाट्यातले हे सारे रंगकर्मी मौखिक परंपरेच्या वाटा चोखाळत राहिले आणि दुर्दैवाने इतिहासाच्या पटावर त्यांची तप्त नाममुद्रा कधीच उमटू शकली नाही. यात भर पडली ती साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ पोर्तुगीज दडपशाहीची. गोमंतकीय समाजाच्या सर्वच प्रेरणा दडपून ठेवणारा हा काळ म्हणजे गोव्याच्या आत्म्याची एक लांबलचक काळोखी रात्रच होती. आमचं सुदैव एवढंच की या निबीड अंधारातही या भूमीतले कलाकार आपापल्या कलासाधनेच्या मिणमिणत्या पणत्या हाती घेऊन प्रकाशाच्या वाटा शोधीत राहिले. त्या सर्व ज्ञात-अज्ञाताना माझा भावपूर्वक नमस्कार!

