नाईटक्लब अग्नितांडवातील बळींच्याकुटुंबीयांना अद्याप नुकसानभरपाई नाही

0
9

मानवाधिकार आयोगाची कामगार आयुक्तांना नोटीस

हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईटक्लबला लागलेल्या आगीत मृत्युमूखी पडलेल्या 20 कामगारांच्या कुटुंबीयांना अद्याप नुकसानभरपाई न मिळाल्याप्रकरणी गोवा मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. गोवा मानवाधिकार आयोगाने याबाबत गोव्याच्या कामगार आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

हॉटेल एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेने 22 डिसेंबर 2025 रोजी मानवाधिकार आयोगाकडे यासंबंधी तक्रार नोंदवल्यानंतर आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. कर्मचारी नुकसानभरपाई कायद्यानुसार मृत कामगारांच्या वारसांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी आयोगाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

बर्च नाईटक्लबला लागलेल्या आगीत 25 जण मृत्युमूखी पडले होते. त्यापैकी 20 जण हे वरील नाईट क्लबचे कर्मचारी होते. हे कामगार झारखंड, आसाम, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र व नेपाळ येथील स्थलांतरित कामगार होते. गोवा तसेच केंद्र सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले होते.