हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबमधील आग प्रकरणात अटक केलेल्या नाईटक्लबचा सहमालक अजय गुप्ता याच्या पोलीस कोठडीत म्हापसा येथील न्यायालयाने आणखी चार दिवसांची वाढ काल केली.
हणजूण पोलिसांनी क्लबचा सहमालक अजय गुप्ता याची पोलीस कोठडीतील मुदत पूर्ण झाल्याने त्याला म्हापसा येथील न्यायालयात हजर केले. यावेळी अजय गुप्ता याच्या वकिलांनी त्याची आरोग्यविषयक समस्या न्यायालयासमोर मांडून जामीन मंजूर करण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्देश दिला. न्यायालयाने वैद्यकीय अहवालानंतर अजय गुप्ता याच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ करताना त्याला पोलीस कोठडीत गादी वापरण्याची मुभा दिली. दुसऱ्या बाजूला, म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाने या प्रकरणात सुरुवातीला अटक केलेल्या पाच संशयितांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत काल रवानगी केली. त्यात राजीव मोडक, प्रियांशू ठाकूर, राजवीर सिंघानिया, विवेक सिंग आणि भारत कोहली यांचा समावेश आहे.

