नाईटक्लबच्या मालकांविरोधातब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी

0
12

क्लबचे अन्य भागीदार आणि जमीनमालकांविरुद्ध लुकआऊट नोटीस

हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या नाईटक्लबच्या मालकांनी थायलंडला पलायन केल्याने गोवा पोलिसांनी इंटरपोलच्या माध्यमातून त्यांच्याविरोधात ‘ब्ल्यू कॉर्नर’ नोटीस जारी करून घेतली आहे. तसेच, या प्रकरणाच्या तपासात महत्त्वपूर्ण ठरणारे क्लबचे अन्य भागीदार अजय गुप्ता आणि जमीनमालक सुरिंदर कुमार खोसला (ब्रिटिश नागरिक) फरार झाले असून, त्यांच्याविरुद्ध लुकआउट नोटीस गोवा पोलिसांनी जारी केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली असून, विविध ठिकाणी ती पाठविण्यात आलेली आहे, अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी हणजूण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली. यावेळी उत्तर गोव्याच्या पोलीस अधीक्षकांची उपस्थिती होती.

हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईटक्लबमधील दुर्घटनेप्रकरणी आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. या क्लबचे मालक गौरव लुथरा व सौरभ लुथरा हे थायलंडमध्ये पळाल्याने इंटरपोलच्या मदतीने त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. गोवा पोलिसांनी एका दिवसात इंटरपोलकडून त्यांच्याविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी नवी दिल्लीत अजय गुप्ता आणि सुरींदर कुमार खोसला यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ते अद्याप सापडू शकलेले नाहीत. त्यामुळे त्या दोघांविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे, असेही पोलीस उपमहानिरीक्षकांनी सांगितले.

दोन अधिकाऱ्यांची
हणजूण पोलिसांकडून चौकशी

भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर निलंबित केलेल्या तत्कालीन पंचायत संचालिका सिद्धी हर्ळणकर आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन सदस्य सचिव शमिला मोंतेरो यांनी चौकशीसाठी हणजूण पोलीस स्थानकात काल उपस्थिती लावली. हडफडे-नागवा पंचायतीचे तत्कालीन पंचायत सचिव रघुवीर बागकर हे मात्र उपस्थित राहिले नाहीत, अशी माहिती उपमहानिरीक्षकांनी दिली.

पंचायतीतून कागदपत्रे जप्त
हडफडे-नागवा पंचायतीचे सरपंच रोशन रेडकर यांची चौकशी करण्यात आली आहे. हडफडे येथील नाईटक्लब उभारण्यात आलेल्या सर्वे क्रमांक 150 (0) ची कागदपत्रे पंचायत कार्यालयातून जप्त केली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

एका दिवसांत ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी
हडफडे येथील नाईटक्लबला आग लागली, त्यावेळी लुथरा बंधू गोव्यात नव्हते. त्यावेळी ते दोघेही नवी दिल्ली येथे होते. या प्रकरणात लुथरा बंधूंना अटक करण्यास वेळकाढूपणा करण्यात आलेला नाही. त्यांच्याविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस केवळ एका दिवसात जारी करून घेण्यात यश मिळाले आहे. सीबीआय आणि इंटरपोलच्या माध्यमातून विदेशात पलायन केलेल्या लुथरा बंधूंना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी सांगितले.

17 मृतांच्या कायदेशीर वारसांना 85 लाख रुपये मंजूर
हडफडे येथील नाईटक्लबमधील भीषण आगीत बळी गेलेल्या 25 पैकी 17 जणांच्या कायदेशीर वारसांना आणि जवळच्या नातेवाईकांना मदत म्हणून 85 लाख रुपये काल राज्य सरकारने मंजूर केले. यासंबंधीचा आदेश उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी जारी केला.

पाचव्या संशयिताला गोव्यात आणले
या प्रकरणामध्ये नवी दिल्ली येथे अटक करण्यात आलेल्या भरत कोहली याला गोव्यात काल आणण्यात आले. या प्रकरणात अटक केलेले पाच जण हे बर्च नाईटक्लबच्या व्यवस्थापनाचे काम करीत होते, असे पोलीस उपमहानिरीक्षकांनी सांगितले.

सुरक्षा आढावा समितीची स्थापना
हडफडे येथे नाईटक्लबलाभीषण आग लागल्याच्या प्रकरणानंतर राज्य सरकारच्या गृह खात्याने सुरक्षा आढावा समितीची स्थापना केली आहे. राज्यातील पर्यटन व्यवसायाशी निगडीत हॉटेल्स, क्लब व इतर आस्थापनांच्या आग प्रतिबंधक व इतर सुरक्षा उपाययोजनांच्या तपासणीचा आढावा या समितीकडून घेतला जाणार आहे. राज्याचे महसूल सचिव संदीप जॅकीस (आयएएस) यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत सदस्य म्हणून उपपोलीस महानिरीक्षक वर्षा शर्मा (आयपीएस), प्रनब भट, संदीप चोडणेकर, राजेंद्र हळदणकर यांचा समावेश आहे.

दर महिन्याला तपासणी अहवाल द्यावा लागणार
तसेच, वरिष्ठ नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एका संयुक्त अंमलबजावणी आणि देखरेख समिती स्थापन केली आहे. वरिष्ठ श्रेणी, नागरी सेवा अधिकारी या समितीच्या अध्यक्षपदी असतील. तसेच, सदस्य म्हणून पोलीस निरीक्षक, स्टेशन फायर ऑफिसर, कार्यकारी अभियंता (पीडब्लूडी), कार्यकारी अभियंता (वीज खाते) ही समिती पर्यटन व्यवसायाशी निगडीत असलेल्या आस्थापनांची तपासणी करणार आहे. या समितीला प्रत्येक महिन्याला अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे.

वागातोरमधील रोमियो लेन रेस्टॉरंटचा
किनाऱ्यावरील अतिक्रमित भाग जमीनदोस्त

लथुरा बंधूच्या मालकीच्या रोमियो लेन या रेस्टॉरंटचा वागातोर समुद्रकिनाऱ्यावरील काही अतिक्रमित भाग पर्यटन खात्याने काल पाडला. समुद्रकिनाऱ्यावर अतिक्रमण केलेला 198 चौरस मीटर क्षेत्रफळाचा रेस्टॉरंटचा भाग जमीनदोस्त करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

वागातोर समुद्रकिनाऱ्यावर रोमियो लेन या रेस्टॉरंटने अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम केले होते. यापूर्वी अनेक वेळा पर्यटन खात्याने बेकायदा भाग पाडले होते. यावर्षी जुलै 2025 मध्ये रोमियो लेनने केलेले बेकायदा बांधकाम पाडण्यात आले होते. त्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा बेकायदा बांधकाम करून रेस्टॉरंटचा विस्तार करण्यात आला, अशी माहिती पर्यटन खात्याचे उपसंचालक धीरज वागळे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

रोमियो लेन रेस्टॉरंटचा समुद्रकिनाऱ्यावर अतिक्रमण केलेला केवळ 198 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भाग पाडला आहे. खाजगी जमिनीवर असलेल्या मुख्य संरचनेला पर्यटन खात्याकडून हात लावला जाणार नाही. त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या इतर खात्यांकडून घेतला जाणार आहे, असेही धीरज वागळे यांनी सांगितले.
समुद्रकिनाऱ्यावर लाकडाच्या साहाय्याने केलेले बांधकाम बुलडोझरच्या सहाय्याने पाडण्यात आले. हडफडे येथील लुथरा बंधूच्या नाईटक्लबमधील भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर वागातोर येथील रोमियो लेनच्या बेकायदा बांधकामाचा विषय चर्चेत आला होता. त्यामुळे पर्यटन खात्याने तातडीने पावले उचलत ही कारवाई केली.

21 जणांचे मृतदेह विविध राज्यांतील गावी पाठवले

हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबमधील अग्निकांडातील मृतांपैकी 21 जणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यासाठी त्यांच्या राज्यांत पाठवण्यात आले. त्यासाठी मृतदेहांची वाहतूक, कागदपत्रांची पूर्तता आणि विमानतळावरील सर्व सोपस्कार पूर्ण करणे आदी सर्व बाबी गोवा सरकारने पूर्ण केल्या.
गोवा सरकारच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले की, उर्वरित चार मृतांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवण्यासाठीचे सोपस्कार पूर्ण केले जात आहे. त्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडे संपर्क साधला जात आहे. सर्व मृतांच्या नातेवाईकांना निवास, वाहतूक व इतर सुविधा पुरवल्या जात आहेत. त्याकामी पोलीस, आरोग्य खाते, विमानतळ प्राधिकरण अशा सर्व खात्यांशी समन्वय साधण्याचे काम राज्य प्रशासन करीत आहे. मृतदेह नेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सरकारने सर्व ती काळजी घेतल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

एसआयटी चौकशीची मागणी; येत्या 16 डिसेंबरला सुनावणी

हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईटक्लबमध्ये झालेल्या अग्निकांड प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाकडून चौकशी केली जावी, या मागणीसाठी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर येत्या 16 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
बर्च नाईटक्लबमध्ये गर्दी झाली असता त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास आलेले अपयश, तसेच प्रशासकीय त्रुटी यासंबंधीची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या (निवृत्त) नेतृत्त्वाखाली एका आयोगाची स्थापना केली जावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. तसेच क्लबचे अवैध बांधकाम व अन्य परवाने नसताना चालू असलेले व्यवहार याचीही चौकशी व्हावी व कोणकोणत्या अधिकाऱ्यानी त्याकडे दुर्लक्ष केले, त्या सगळ्यांचीही चौकशी करण्याची मागणी याचिकेतून केली आहे.