हडफडे नाईटक्लब अग्नितांडव प्रकरण : अग्नितांडवानंतर भल्या पहाटेच काढला पळ; गोवा पोलीस इंटरपोलची मदत घेणार; नवी दिल्लीतून एकास अटक
हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबचे मालक व व्यवस्थापकीय संचालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा या बंधूंनी अग्नितांडवाच्या दुर्घटनेनंतर काही तासांतच थायलंडच्या फुकेत येथे पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. मध्यरात्री अग्नितांडवाची घटना घडल्यानंतर रविवारी भल्या पहाटेच दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांनी इंडिगोच्या विमानाने विदेशात पलायन केले. त्या दोघांनाही लवकरात लवकर अटक करण्यासाठी गोवा पोलिसांनी सीबीआयच्या इंटरपोल विभागाशी समन्वय साधण्यासाठी पावले उचलली आहेत. तसेच या प्रकरणी आणखी एका संशयित आरोपीला नवी दिल्लीत अटक करण्यात गोवा पोलिसांना काल यश आले. या प्रकरणात आत्तापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला, राज्य सरकारने या दुर्घटनेच्या चौकशीसाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समितीची नियुक्ती काल केली. या समितीला आठ दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचा निर्देश देण्यात आला आहे. दरम्यान, या चौकशी समितीने घटनास्थळाला भेट देऊन चौकशीला सुरुवात केली आहे.
साकवाडी हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबला शनिवारी मध्यरात्री 12 च्या दरम्यान लागलेल्या भीषण आगीत 5 पर्यटक आणि क्लबच्या 20 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तसेच मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश होता. आग क्लबच्या पहिल्या मजल्यावर लागली आणि नंतर बघता बघता वणव्यासारखी आग सर्वत्र पसरली. यावेळी घाबरून या मजल्यावरील लोकांनी पळ काढला. मात्र, तळघरात असलेल्यांना पळता आले नाही. त्यामुळे तेथील दोघांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेकांचा धुराच्या लोटामुळे गुदमरून मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य 6 जण जखमी झाले होते, त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आता गोवा पोलिसांनी कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी रविवारी लगेचच चौघांना अटक केली होती. त्यानंतर गोवा पोलिसांनी काल भरत करण सिंग कोहली (49, रा. नवी दिल्ली) याला अटक केली.
चौघांना 6 दिवस पोलीस कोठडी
या दुर्घटनेप्रकरणी रविवारी अटक केलेल्या चौघांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणी क्लबचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव मोडक, महाव्यवस्थापक विवेक सिंह, बार व्यवस्थापक राजीव सिंघानिया आणि गेट व्यवस्थापक रियांशू ठाकूर यांना हणजूण पोलिसांनी अटक केली होती.
लुकआऊट नोटीस काढली; पण
बर्च नाईट क्लबचे मालक सौरभ लुथरा व गौरव लुथरा यांचा कोठेही थांगपत्ता लागत नसल्याने गोवा पोलिसांनी सुरुवातीला लुकआऊट नोटीस जारी केली होती. त्यांनी विदेशात पलायन करू नये म्हणून तातडीने लुकआऊट नोटीस जारी केली होती. या प्रकरणात सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा व इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात अटकेच्या भीतीने लुथरा बंधूंनी विदेशात पळ काढला आहे.
अधिकाऱ्यांचीही चौकशी
याशिवाय, क्लबला विविध परवानग्या व परवाने देण्यात सहभागी असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून झालेल्या अनुपालनातील त्रुटी व प्रक्रियात्मक उल्लंघनांची पडताळणी करण्यासाठी पोलिसांकडून त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे.
पहाटे 5.30 वाजता इंडिगोच्या
विमानाने लुथरा बंधू विदेशात
गोवा पोलिसांच्या विनंतीवरून मुंबई येथील इमिग्रेशन ब्युरो (बीओआय)ने लुथरा बंधूविरुद्ध लुक आऊट नोटीस (एलओसी) जारी केली. मात्र सौरभ आणि गौरव हे दोन्ही संशयित आरोपी रविवार दि. 7 डिसेंबर रोजी पहाटे 5.30 वाजता म्हणजेच मध्यरात्री घडलेल्या घटनेनंतर लगेचच इंडिगोच्या 6ई 1073 विमानाने फुकेतला रवाना झाले, अशी माहिती इमिग्रेशन ब्युरोने गोवा पोलिसांना दिली. दोघेही संशयित आरोपी पोलीस चौकशी टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.
लुथरा बंधूंनी तिकीट बुक केलेले
इंडिगोचे ‘ते’ विमान वेळेवर निघाले!
इंडिगो विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनामुळे गेल्या आठवडाभरातून देशभरातील विमानसेवा कोलमडली आहे. इंडिगोची हजारो विमान उड्डाणे रद्द झाली असून, प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. मात्र लुथरा बंधू इंडिगोच्या ज्या विमानातून फुकेतला गेले, ते विमान वेळेवर म्हणजे रविवारी पहाटे 5.30 वाजता या नियोजित वेळेलाच रवाना झाले. इंडिगो कंपनीच्या या कार्यतत्परतेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
नाईटक्लबच्या मालकांच्या अटकेसाठी
पोलिसांनी तातडीने पावले उचलली; पण…
हडफडे येथे बर्च बाय रोमियो लेन या नाइटक्लबमधील आग प्रकरणी मालकांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर लगेचच पोलिसांनी संशयित आरोपी सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना ताब्यात घेण्यासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या. दोघांचाही शोध घेण्यासाठी गोवा पोलिसांचे एक पथक नवी दिल्लीला तातडीने रवाना करण्यात आले होते. तथापि, ते दोघेही निवासस्थानी उपलब्ध नसल्याने त्यांच्या घरावर नोटीस चिकटवण्यात आली.
चौकशी समितीत कोण?
राज्य सरकारने उत्तर जिल्हा न्यायदंडाधिकारी अंकित यादव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीत दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा, फॉरेन्सिक सायन्सचे आशुतोष आपटे, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे उपसंचालक राजेंद्र हळदणकर यांचा समावेश आहे. या समितीला आठ दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचा निर्देश देण्यात आला आहे. आगीची कारणे शोधणे, आवश्यक परवाने तपासणे, एजन्सी व विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करणे, उपाययोजनांची शिफारस करणे, विविध विभागांकडून रेकॉर्ड आणि कागदपत्रे मागवून समन्स जारी करून चौकशी करणे, अशा जबाबदाऱ्या या चौकशी समितीला पार पाडाव्या लागतील.
समितीकडून घटनास्थळाची पाहणी
उत्तर जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या चौकशी समितीने आगीत भस्मसात झालेल्या बर्च बाय रोमिओ लेन क्लबची काल पाहणी केली. या समितीने सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर जप्त केला. फॉरेन्सिक सायन्स डीव्हीआरमधील फुटेजची तपासणी करणार आहे. या चौकशी समितीने क्लबची सखोल तपासणी केली आणि यंत्रणेबद्दल माहिती जाणून घेतली.
पाचव्या संशयिताला अटक
हडफडेे येथील बर्च नाईट क्लबमधील आगीच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांचे पथक नवी दिल्ली येथे गेले आहे. या पथकाने भरत करण सिंग कोहली याला अटक केली आहे. तो बर्च नाइट क्लबचे दैनंदिन कामकाज बघत असे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. पुढील चौकशीसाठी गोव्यात आणण्यासाठी त्याचा ट्रान्झिट रिमांड गोवा पोलिसांनी मिळवला आहे.
समितीला अधिकाऱ्यांच्या चौकशीचा अधिकार
या आग प्रकरणात सरकारच्या विविध खात्याचे अधिकारी आणि पंचायतीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा अधिकार समितीला आहे. कागदपत्रे व संबंधितांची चौकशी करून अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे, असे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी सांगितले.
दुर्घटनेबद्दल क्लबचा मालक काय म्हणाला?
बर्च नाईट क्लबचा मालक सौरभ लुथरा याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे या दुर्घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. सौरभने संबंधित घटनेवर दुःख व तीव्र शोक व्यक्त करत लिहिले आहे की, पीडित कुटुंबांसोबत आम्ही एकजुटीने उभे राहणार आहोत. या दुर्दैवी दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबदल व्यवस्थापन दुःख व्यक्त करते. या दुःखाच्या क्षणी मृतांच्या, तसेच जखमीच्या कुटुंबीयांसोबत व्यवस्थापन एकजुटीने उभे आहे.
सर्व मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन
हडफडे येथील नाईटक्लबमधील दुर्घटनेत मृत पावलेल्या सर्वांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे आणि मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, आगीत जखमी झालेल्या पाच जणांची प्रकृती स्थिर आहे. एक जखमी आतिश मेहता यांच्या प्रकृती सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.
राज्यातील नाईटक्लब, रेस्टॉरंट्स,
मद्यालयांचे 7 दिवसांत ऑडिट करा
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा आदेश; अन्यथा परवाने रद्द
राज्यातील सर्व नाईटक्लब, रेस्टॉरंट्स, मद्यालये, महोत्सव आयोजन स्थळे (इव्हेंट व्हेन्यूज) आदींनी आठवडाभरात म्हणजेच येत्या सात दिवसांत आपल्या अंतर्गत सुरक्षिततेसंबंधीचे ‘ऑडिट’ तयार करून त्यासंबंधीचा अहवाल जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या, अग्निसेवा अधिकाऱ्यांच्या अथवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ठरवलेल्या पथकांच्या तपासणीसाठी तयार ठेवावा, असा आदेश काल राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने काढला.
हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन क्लबमधील अग्नितांडवात 25 जणांचा मृत्यूनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने वरील आदेश काढला आहे.
सर्व नाईटक्लब, रेस्टॉरंट्स, मद्यालयांतील अग्निसुरक्षा, विद्युत यंत्रणा, वास्तूचा आकार याबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये, असे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपल्या आदेशातून स्पष्ट केले आहे.
अग्निशामक दलाचे वैध ना हरकत दाखला (एनओसी) मिळवावा, क्षमतेपेक्षा जास्त ग्राहकांना आत प्रवेश देऊन गर्दी करू नये, धोक्याच्या वेळी वाजवता येईल असा अलार्म बसवावा, डिटेक्टर्स, स्प्रिंकलर्स व अग्निशामक यंत्रणा बसवावी, प्रमाणित अशीच विद्युत यंत्रणा बसवावी तसेच आपत्त्कालीन वेळी बाहेर पडण्यासाठी योग्य अशी वाट ठेवावी व त्याठिकाणी योग्य अशा विजेची सोय असावी, तसेच तेथे सूचना फलक बसवावेत, सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते सर्व प्रशिक्षण देण्यात यावे, आणीबाणीच्या प्रसंगी बाहेर कसे पडावे त्यासंबंधीच्या ड्रिल्सचे वेळोवेळी आयोजन केले जावे, असे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
आदेश न पाळल्यास व्यवसाय बंद पाडणार
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या नाईट क्लब, रेस्टॉरंट्स, मद्यालये यांचे परवाने रद्द केले जातील अथवा ते निलंबित केले जातील किंवा त्यांचा व्यवसाय आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 तसेच अन्य कायद्याखाली बंद केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.