पर्यटन खात्याने तयार केलेल्या नव्या किनारी शॅक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना जारी केली असून काही पारंपरिक शॅक मालकांनी सरकारच्या नव्या धोरणावर असमाधान व्यक्त केले आहे. त्यांनी न्यायालयातही जाण्याची तयारी केल्याचे सांगण्यात आले.
नव्या धोरणानुसार शॅक परवाने तीन वर्षांच्या काळासाठी म्हणजे दि. ३१ मे २०१६ पर्यंतच्या मुदतीसाठी देण्याचा निर्णय खात्याने घेतला आहे. ९० टक्के शॅक्स अनुभवी शॅकवाल्यांना तर १० टक्के नव्या लोकांना देण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक शॅकमध्ये सीसीटीव्ही बसविणे सक्तीचे केले आहे.
प्रत्येक शॅकमध्ये टॉयलेटची व्यवस्था तसेच कचर्याचे व्यवस्थापनही करणे सक्तीचे केले आहे. कोणत्याही शॅकमध्ये अमलीपदार्थांचा गैर व्यवहार होत असल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
यावर्षी सरकारने एकूण ३४७ शॅक्सना परवाने देण्याचे ठरविले आहे. त्यात २४० उत्तरेतील शॅक्सचा समावेश आहे. वरील ९० टक्के शॅक्स परवान्यांपैकी ६० टक्के परवाने सात व त्याहून अधिक वर्षांचा तर २० टक्के शॅक्स ४ ते ६ वर्षांचा अनुभव असलेल्यांना देण्यात येईल. विदेशी नागरिकांना शॅक देण्यास बंदी घालण्यात आली आहे. काल दि. १७ पासून नोव्हा गोवा हॉटेल समोर असलेल्या पर्यटक खात्याच्या कार्यालयात शॅक परवान्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध केले असून दि. २५ पर्यंत अर्ज स्वीकारले जाईल व सोडत पद्धतीने परवान्यांचे वितरण होईल, असे कळविले आहे.