नव्या राष्ट्रपतींचा जोहार!

0
27

देशाच्या पंधराव्या राष्ट्रपतिपदाची सूत्रे काल स्वीकारताना द्रौपदी मुर्मू यांनी देशाला ‘जोहार’ म्हणत प्रणाम केला. संत चोखामेळ्याने ‘जोहार मायबाप जोहार’ म्हणत घातलेली साद एकेकाळी बालगंधर्वांनी ‘कान्होपात्रा’मध्ये अजरामर केलेली असल्याने हा शब्द आपल्याला त्याच्या विशिष्ट अर्थासह परिचित आहे. झारखंडच्या संथाळ आदिवासींमध्ये आजही तो वापरला जातो. त्यामुळे मुर्मूंच्या या ‘जोहार’ने या देशाच्या उच्चभ्रू वर्गांना देशाच्या सर्वोच्च पदावर आरूढ होत असताना भारतीय लोकशाहीची खरी ताकद दाखवून दिलेली आहे. त्यामुळे त्यांचा हा ‘जोहार’ ऐतिहासिक आहे. केवळ देशालाच नव्हे, तर अवघ्या जगाला आजच्या भारताच्या सर्वसमावेशकतेचा प्रत्यय आणून देणारे हे अभिवादन आहे. ही सर्वसमावेशकता कदाचित अद्याप तळागाळापर्यंत खर्‍या अर्थाने झिरपलेली नसेलही, परंतु किमान प्रगतिशील विचारांच्या भारताने ती स्वीकारलेली आहे याचा प्रत्यय मुर्मू यांच्या राष्ट्रपतिपदावरील निवडीने निश्‍चितपणे आणून दिलेला आहे. त्यांच्या निवडीमागे ‘महिला’, ‘आदिवासी’, ‘गरीब’, ‘मागास भागाची प्रतिनिधी’ असे अनेक निकष राजकीय कारणांखातर लावले गेलेही असतील, परंतु काहीही जरी असले तरी खरोखर तळागाळातून स्वतःच्या हिंमतीने, कर्तृत्वाने वर आलेल्या एका स्त्रीची ही निवड प्रत्येक देशवासीयासाठी अभिमानाचा विषय ठरला पाहिजे. कोणी शंकेखोर म्हणेल की जरी त्या आदिवासी असल्या तरी त्यांचे वडील त्यांच्या गावचे पुढारी होते, त्यामुळेच गावात महिलांना शिकवण्याची रीत नव्हती, तरी त्यांना शिक्षण घेता आले; परंतु शिक्षण, उच्च शिक्षण, सरकारी नोकरी, राजकारणातील पदार्पण आणि व्यक्तिगत जीवनातील एकाहून एक कठोर आपत्तींना धैर्याने तोंड देतानाही खचून न जाता जीवनाला अर्थपूर्णता देण्याचा मुर्मू यांनी केलेला प्रयत्न, त्यासाठी घेतलेले परिश्रम, केलेली धडपड दृष्टिआड केली जाऊ नये. स्वतःच्या कर्तबगारीवर त्या या देशातील एका अतिमागास भागामधून पुढे आल्या आणि आता देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झालेल्या आहेत. त्यामुळेच या महिलेने केलेला हा ‘जोहार’ आज अवघ्या देशाला साद घालतो आहे, झोपलेल्यांना आणि झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करतो आहे.
राष्ट्रपतिपद हे काही नुसते शोभेचे पद नसते हे डॉ. अब्दुल कलाम यांनी दाखवून दिले. देशाच्या तरुणाईपर्यंत ते सातत्याने जात राहिले, नव्या पिढीचे खरेखुरे प्रेरणास्त्रोत बनले. राष्ट्रपती हा ‘जनतेचा राष्ट्रपती’ असला पाहिजे हे त्यांनी या देशाला दाखवून दिले. त्यामुळे ते पद भूषविणार्‍यांचीही त्याच मार्गाने जाणे ही त्यांची नैतिक जबाबदारी ठरते. राष्ट्रपती हे सरकारपक्षाचे रबरस्टॅम्प नसावेत ही देशवासीयांची किमान अपेक्षा राहिली आहे. मुर्मू जेव्हा झारखंडच्या राज्यपालपदी होत्या तेव्हा आदिवासींच्या जमिनी हिरावून घेऊ शकणारी दोन विधेयके तेथील भाजपच्या मुख्यमंत्र्यांना परत पाठवून त्यामध्ये आदिवासींच्या हितरक्षणार्थ बदल करण्यास त्यांनी भाग पाडलेले होते. त्यामुळे आपल्या यापुढील कारकीर्दीतही त्या हाच लोकहिताचा बाणा स्वीकारतील अशी आशा या शुभप्रसंगी देशाला आहे.
मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या रूपाने एक सुसंस्कृत, शालीन दलित राष्ट्रपती देशाला लाभला. त्यांची कारकीर्द कोवीड काळात झाकोळली गेली तरी स्वतः तीस टक्के वेतन कमी घेण्यापासून पंतप्रधान निधीला मासिक वेतन देण्यापर्यंत काटकसरीचे दर्शन घडवीत कोविंद यांनी देशवासीयांची मने जिंकली. आता मुर्मू यांच्याकडे देश अपेक्षेने पाहतो आहे.
कालच्या आपल्या पहिल्याच भाषणामध्ये द्रौपदी मुर्मू यांनी ‘‘गरीब भारत स्वप्न पाहू शकतो आणि ते खरे करू शकतो’’ याची आपली निवड हा पुरावा असल्याचे प्रतिपादन केले. देशातील दीनदुर्बळांना, उपेक्षितांना आपलीशी वाटावी अशी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदी आलेली आहे ही केवळ वरवर मिरविण्याची बाब नाही. त्यामुळे ‘दीनदुबळ्यांचे कल्याण’ यावर आपले लक्ष केंद्रित असेल असे नवनिर्वाचित राष्ट्रपती महोदया म्हणाल्या आहेत. ‘‘केवळ स्वतःच्या भवितव्याचा विचार करू नका, देशाच्या भवितव्याचा विचार करा’’ असा मौलिक संदेशही त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणातून देशातील तरुणाईला दिलेला आहे. आपल्या पुढील कारकिर्दीमध्ये राष्ट्रपतींद्वारे या सगळ्या घटकांसाठी व्यापक उपक्रम हाती घेते जातील वा सरकारला त्यासाठी प्रेरित केले जाईल अशी अपेक्षा करायला हरकत नसावी. त्या जेथून आल्या त्या उडिसातील रायरंगपूरमध्ये काल जल्लोष चालला होता. हाच जल्लोष संपूर्ण देशाला साजरा करावासा वाटावा अशी उज्ज्वल कारकीर्द राष्ट्रपती महोदयांची असेल अशी अपेक्षा करूया.