नव्या राज्यपालांचे स्वागत

0
20

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री पुसापती अशोक गजपती राजू यांची नेमणूक काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली. अशोक गजपती राजू हे तेलगू देसमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सध्याचे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार तेलगू देसमच्या पाठिंब्यावर चालले असल्याने त्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याची राज्यपालपदी ही नेमणूक झाली आहे ह्यात आश्चर्य नाही. अशोक गजपती राजू हे तेलगू देसमचे ज्येष्ठ नेते तर आहेतच, परंतु आंध्र प्रदेशातील विजयनगरम्‌‍च्या राजघराण्याचेही ते एक वारस आहेत. त्यांची राजकीय कारकीर्दही प्रदीर्घ राहिली आहे. आंध्र प्रदेश विधानसभेचे ते जवळजवळ पंचवीस वर्षे सदस्य होते. आंध्र प्रदेश राज्य सरकारमध्ये तेरा वर्षे मंत्री होते. अर्थ खात्यापासून विधिमंडळ कामकाजापर्यंतची महत्त्वाची कॅबिनेट मंत्रिपदे त्यांनी भूषविलेली आहेत. केंद्रातही त्यांनी मंत्रिपद भूषविले आहे. त्यामुळे त्यांच्या त्या प्रशासकीय अनुभवामुळे गोव्याला, गोव्याच्या सरकारला त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन होईल अशी अपेक्षा आहे. त्यांची मागील राजकीय कारकीर्द पाहिली, तर 1983 पासून त्यांच्या विजयनगरम्‌‍ मतदारसंघातून ते सातत्याने आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून येत होते. 2014 मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले आणि मोदी सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री बनले. त्यांची राजकीय कारकीर्द स्वच्छ राहिली आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे प्रचंड काम आहे. ते विजयनगरम्‌‍च्या शाही परिवाराचे वारस आहेत. म्हणजे त्या संस्थानचे शेवटचे महाराजा महाराजा अलकनारायण यांचे ते धाकटे चिरंजीव. त्यांच्या वडिलांच्या नावाने असलेल्या महाराजा अलकनारायण सोसायटी ऑफ आर्टस्‌‍ अँड सायन्सचे ते अध्यक्ष आहेत. ह्या संस्थेच्या केजी टू पीजी बारा मोठ्या शाळा आहेत. आंध्रमधील जवळजवळ एकशे आठ मंदिरांचे व्यवस्थापन त्यांच्या ह्या ट्रस्टद्वारे सांभाळले जाते. आंध्रमध्ये आणि चेन्नईतही त्यांच्या पिढीजात मालकीची प्रचंड जमीन आहे. परंतु ह्या सगळ्या ऐश्वर्यापेक्षाही सामाजिक कार्याच्या प्रेरणेने अशोक गजपती राजू राजकारणात उतरले आणि बिगर काँग्रेसी पक्षांमधून त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. प्रारंभी ते जनता पक्षाचे सदस्य होते. तेलगू देसमच्या स्थापनेनंतर त्यांनी त्या पक्षाशी एकनिष्ठ राहून योगदान दिले आहे. आंध्र प्रदेशमध्ये जेव्हा विरोधी पक्षाचे सरकार आले, तेव्हा त्यांना त्यांच्या संस्थेवरून हटविण्याचा आटोकाट प्रयत्न झाला होता, परंतु उच्च न्यायालयात जाऊन लढा देऊन त्यांना आपला हक्क प्रस्थापित करावा लागला होता. अशा लढवय्या वृत्तीचे अशोक गजपती राजू गोव्यामध्ये आपल्या राज्यपालपदाच्या कारकिर्दीची चांगली छाप उमटवतील अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करायला हरकत नसावी.
मावळते राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोव्याच्या राजभवनाला लोकाभिमुख करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. गोव्याच्या गावोगावी त्यांनी त्यासाठी भटकंती केली. विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या ते नित्य संपर्कात राहिले. स्वतः सिद्धहस्त साहित्यिक असल्याने त्यांनी त्याचा लाभ गोव्यालाही मिळवून दिला. नवोदित लेखकांच्या साहित्यकृतींना आर्थिक सहाय्य देणारी एक योजनाही त्यांनी गोव्यातील कोकणी आणि मराठी साहित्यिकांसाठी राबवण्याचा प्रयत्न केला होता. गोव्यात राज्यपालपदी असतानाही त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आणि प्रकाशित केली. यापैकी काही पुस्तके निश्चितच संदर्भमूल्य असलेली आणि महत्त्वाची आहेत. गोवा हे काही राज्यपालपदी येणाऱ्या व्यक्तींसाठी तसे आव्हानात्मक राज्य नव्हे. साधारणपणे सुटीचा काळ घालवायला आल्यासारखेच राज्यपालांचे येथील स्थान असते. परंतु तरीही केवळ आपल्याच विश्वात दंग न राहता आजवरच्या अनेक राज्यपालांनी येथील आपल्या वास्तव्यात लोकाभिमुखतेचे दर्शन घडविले. गोव्याच्या आतापर्यंतच्या राज्यपालांपैकी एस. सी. जमीर आणि भगतसिंग कोश्यारींसारखे वादग्रस्त राज्यपाल सोडले तर, तर दुसरीकडे जे. एफ. आर. जेकब, केदारनाथ साहनी, भरतवीर वांच्छू, मृदुला सिन्हा, डॉ. सत्यपाल मलिक, पी. एस. श्रीधरन पिल्लई अशा अनेकांची कारकीर्द त्यांच्या सचोटी आणि लोकाभिमुखतेमुळेच स्मरणात राहिली आहे. डॉ. सत्यपाल मलिक यांनी तर आधुनिक रामशास्त्र्याचेच दर्शन गोमंतकीयांना घडवले होते. त्यांच्या तुलनेत पिल्लई आखून घेतलेल्या चौकटीतच वावरले खरे, परंतु त्यांच्या वागण्याला पक्षपातीपणाचे स्वरूप त्यांनी येऊ दिले नाही. ते तर गोव्याची आपली कारकीर्द विसरणार नाहीतच, परंतु गोवाही त्यांना विसरणार नाही.