- बबन भगत
56 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच राजधानी पणजी शहरात थाटात संपन्न झाला. यंदाही काही नव्या उपक्रमांसह संपन्न झालेल्या ‘इफ्फी’ने आपल्या प्रतिनिधींसह देश-विदेशांतून आलेल्या चित्रपटकर्मीचीही मने जिंकली. यंदा ‘इफ्फी’चे उद्घाटन खुल्या वातावरणात झाले. यावेळी गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या चित्ररथांसह चित्रपटनिर्मिती कंपन्यांच्या चित्ररथांची राजधानी पणजी शहरातून काढण्यात आलेली मिरवणूक नेत्रदीपक ठरली. या मिरवणुकीमुळे पणजी शहराबरोबरच इफ्फीस्थळी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे सर्वांसाठी तो एक आगळावेगळा असा आनंदसोहळाच ठरला.
56 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 नोव्हेंबर रोजी पणजीत सुरू झाला आणि 28 नोव्हेंबर रोजी या महोत्सवाचा समारोप झाला. दरवर्षी तो 20 नोव्हेंबर रोजी सुरू होतो आणि 28 नोव्हेंबर रोजी त्याचा समारोप होतो. गोव्यासाठी आणि विशेषकरून राजधानी पणजी शहरासाठी हे दिवस खास असे असतात. कारण या प्रतिष्ठेच्या अशा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी जगभरातील चित्रपटकर्मी गोव्यात येत असतात. राजधानी पणजी तर त्यांच्या स्वागतासाठी नववधूप्रमाणे सजत असते, श्रृंगार करीत असते. पणजी शहराचे रूपच ‘इफ्फी’च्या काळात बदलून जात असते. या काळातील पणजी शहराचा झगमगाट बघण्यासारखा असतो. एका बाजूने संथ वाहणारी मांडवी नदी व दुसऱ्या बाजूने असलेल्या आयनॉक्स प्रांगणात ‘इफ्फी’चा थरार असे हे दृश्य असते. एकामागोमाग एक असे येणारे जगभरातील चित्रपटकर्मी, सिलेब्रिटी, रसिक प्रेक्षकांचे आवडते कलाकार हे रेड कार्पेटवरून चालत असतात. आणि थिएटर्समध्ये जगभरातील लोकांच्या कथा-व्यथा मांडणारे चित्रपट रुपेरी पडद्यावर साक्षात अवतरू लागतात. त्यातून जगभरातील मानवजातीची सुख-दुःखे, समस्या, प्रश्न, व्यथा यांचे दर्शन प्रेक्षकांना होऊ लागते. सारे जगच जणू यावेळी रुपेरी पडद्यावर अवतरते. पडद्यावरील ते जग, ती सुंदर कला व त्या कलेचा संगम पाहून प्रेक्षक स्वतःला विसरून जातात आणि पडद्यावरील त्या कथेशी एकरूप होऊन जातात. ‘इफ्फी’साठी निवडण्यात आलेल्या 80 देशांतील 270 चित्रपट यावेळी ‘इफ्फी’त दाखविण्यात आले.
ओपनिंग फिल्म (शुभारंभी चित्रपट)
यंदाच्या ‘इफ्फी’ची सुरुवात ‘द ब्ल्यू ट्रेल’ या ब्राझिलच्या चित्रपटाने झाली. गाब्रिएल मास्कारो यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटाची कथा एका 77 वर्षीय महिलेची आहे. या चित्रपटाचा सगळा भर हा तिने वृद्धापकालात केलेल्या एका धाडसी मोहिमेवर आहे. शुभारंभी चित्रपट असल्याने 20 नोव्हेंबर रोजी या चित्रपटाचे तब्बल 13 खेळ झाले आणि देश-विदेशांतून आलेल्या चित्रपटकर्मी व ‘इफ्फी’ प्रतिनिधींनी गर्दी करून हा चित्रपट पाहिला आणि तोंड भरून या चित्रपटाची स्तुती केली.
‘एनएफडीसी’ आणि अयोजनातील नेटकेपणा
2022 सालापासून ‘इफ्फी’च्या आयोजनाची जबाबदारी ‘एनएफडीसी’ म्हणजेच राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडे सोपविण्यात आली आहे. भारतीय चित्रपट विभाग (फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडिया) हा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळामध्ये विलीन करण्यात आल्यानंतर, म्हणजेच 2022 सालापासून ‘इफ्फी’च्या आयोजनाची सगळी जबाबदारी सरकारने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडे सोपवली आहे. ‘इफ्फी’साठीचे सगळे नियोजन, आयोजन, महोत्सवासाठीचे सगळे प्रोमोशन (महोत्सवाविषयीची सगळी माहिती जगभरात पोचवणे) हे सगळे काम आता ‘एनएफडीसी’ करीत असते. ‘इफ्फी’ची सगळी जबाबदारी ‘एनएफडीसी’वर आल्यापासून तिने ‘इफ्फी’चे शिवधनुष्य उचलताना महोत्सवाच्या आयोजनात आणि नियोजनात आमूलाग्र असे बदल घडवून आणले आहेत. ‘इफ्फी’मधील वेगवेगळे विभागही आता वाढले असून नियोजन आणि आयोजन याबरोबरच नवकल्पनांनाही मूर्तरूप देण्यात ‘एनएफडीसी’ला यश आले आहे. काही वर्षांपूर्वी ‘इफ्फी’ प्रतिनिधींकडून महोत्सवाच्या ढिसाळ अशा आयोजनावर भरपूर टीका होत असे. पण आता आयोजनात इतका नेटकेपणा आणि सुसूत्रता आलेली आहे की टीका करण्यासाठी काही वावच राहिलेला नाही. त्यामुळे टीकाकारांची तोंडे पूर्णपणे बंद झाली आहेत.
‘इफ्फी’ची सूत्रे हाती घेतल्यापासून ‘एनएफडीसी’ने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये नव्या गोष्टी तर आणल्याच, शिवाय ज्या पूर्वी होत्या त्यांत आमूलाग्र असे बदल व सुधारणा घडवून आणल्या. परिणामी ‘इफ्फी’चा दर्जा वाढण्यास त्याची मदत झाली.
यंदा पहिल्यांदाच एआय फिल्म फेस्टिव्हल
आणि सिनेमा एआय हेकाथॉन
‘एनएफडीसी’ने यंदा कला आणि तंत्रज्ञान याचा संगम असलेले एआय फिल्म फेस्टिव्हल आणि सिनेमा एआय हॅकाथॉन यंदा ‘इफ्फी’मध्ये आणले. त्याद्वारे नव्या चित्रकर्मींना एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शॉर्ट फिल्म तयार करण्याची संधी प्राप्त करून देण्यात आली. त्याशिवाय एआय आणि फिल्ममेकिंग यावरील मास्टर क्लासेसचे आयोजन करण्यात आले.
फिल्म बझारचा विस्तार
‘एनएफडीसी’ने फिल्म बझारचा चेहरामोरहा बदलून टाकतानाच फिल्म बझारचे नामकरण ‘वेव्ह्स फिल्म बझार’ असे केले. सहनिर्मितीला जास्त वाव मिळेल याकडे लक्ष केंद्रित केले. स्क्रीन रायटर्स लॅबमध्ये जिवंतपणा आणून त्यात सहभागी होणाऱ्यांना खऱ्या अर्थाने त्याचा फायदा होईल याकडे लक्ष पुरवले. तसेच व्हीएफएक्स, ॲनिमेशन, गेमिंग आणि एक्सआर (एक्सटेंडेड रिएलिटी) साठीची टेक्नोलॉजी पव्हेलिएशन्सवर भर दिला.
क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टुमारो
‘क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टुमारो’मधील स्पर्धकांमध्ये वाढ घडवून आणण्याचे कामही ‘एनएफडीसी’ने केले. आता 75 ऐवजी 124 स्पर्धकांना त्यात भाग घेता येतो. उभरत्या कलाकारांना 48 तासांत चित्रपट तयार करण्यासाठीची ही स्पर्धा आहे.
एकेकाळी गाजलेले व अत्यंत महत्त्वाचे असे जुने चित्रपट ज्यांच्या प्रिंट्स आता खराब झालेल्या आहेत, त्या दुरुस्त करून हे चित्रपट डिजिटाइज्ड केले जात आहे. असे हे अभिजात चित्रपट ‘इफ्फी’त दाखवण्यासाठी आता ‘एनएफडीसी’ने सुरुवात केली आहे. यंदा ‘रिस्टोर्ड’ केलेले 18 चित्रपट ‘इफ्फी’तील इंडियन पॅनोरमा विभागात स्पेशल पॅकेजखाली दाखवण्यात आले. त्यांत हिंदी, मराठी, बंगाली, तेलगू व मल्याळम या भाषांतील चित्रपटांचा समावेश होता. त्यात ‘सुबर्णरेखा’, ‘उमराव जान’, ‘रुदाली’, ‘मल्लेसवरी’, ‘सीआयडी’, ‘प्यासा’, ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’, त्याशिवाय मणिरत्नम यांचा ‘गीतांजली’ व रमेश सैलग यांचा 1949 चा ‘शहीद’ आदी चित्रपटांचा समावेश होता.
मूकपटाचा अनुभव
भारतात 1931 साली पहिल्या बोलपटाची निर्मिती झाली. त्यापूर्वी भारतात असंख्य मूकपटांची निर्मिती करण्यात आली होती. असाच एक मूकपट म्हणजे ‘मुरलीवाला.’ दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांनी 1927 साली या 45 मिनिटांच्या मूकपटाची निर्मिती केली होती. 98 वर्षांपूर्वीचा हा मूकपट यंदाच्या ‘इफ्फी’त पाहण्याचे भाग्य काहीजणांना लाभले. पूर्वी मूकपट पडद्यावर दाखवताना संगीतकार थिएटरमध्ये बसून चित्रपटाला साजेशे संगीत सादर करायचे. ‘इफ्फी’त हा चित्रपट दाखवताना अशाच प्रकारे थिएटरमध्ये बसून संगीतकारांनी संगीत सादर केले. हा चित्रपट पाहण्यास आलेल्यांसाठी तो एक अत्यंत आगळावेगळा असा अनुभव होता. ‘मुरलीवाला’ हा कृष्ण व राधा यांच्यावरील मूकपट आहे.
खुल्या जागेत उद्घाटन सोहळा
या वर्षी ‘इफ्फी’चा उद्घाटन सोहळा हा पणजी शहरात झाला, तोही खुल्या जागेत. जुन्या गोमेकॉ इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर या सोहळ्यासाठीचा मंच उभारण्यात आला होता, तर त्यापुढच्या जागेत सोहळ्यासाठी आलेल्या लोकांकरिता बसण्याची सोय करण्यात आली होती. त्यासाठी पणजी-मिरामार रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. खुले वातावरण व साधा मंच यामुळे यावेळी उद्घाटन सोहळ्यात नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांना फाटा देण्यात आला. पण ती कसर भरून काढण्यासाठी यंदा उद्घाटन सोहळ्यानंतर भारतीय चित्रपटांवर आधारित असलेले चित्ररथ व गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ अशा चित्ररथांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली, आणि ‘इफ्फी’साठी देश-विदेशांतून आलेल्यांसाठी ही मिरवणूक हे एक खास आकर्षण ठरले. पणजीत मोठ्या जल्लोषात या चित्ररथ मिरवणुकीचे स्वागत झाले. यावेळी पणजी शहराला जत्रेचे रूप प्राप्त झाले होते. दाक्षिणात्य चित्रपटांवरील चित्ररथांनी यावेळी विशेष लक्ष वेधून घेतले.
गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्या हस्ते मंचावर तुळशीच्या रोपट्याला पाणी घालून ‘इफ्फी’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, ‘इफ्फी’चे संचालक शेखर कपूर, अभिनेता एन. बालकृष्ण व अनुपम खेर आदी मंडळी हजर होती. तेलगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार एन. बालकृष्ण (एन. टी. रामाराव यांचे सुपुत्र) यांनी अभिनेते म्हणून 50 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल त्यांचा यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला.
यंदाच्या ‘इफ्फी’तील दिग्गज कलाकार
यंदा ‘इफ्फी’ला हजेरी लावलेल्या दिग्गज कलाकारांमध्ये आमिर खान, कमल हसन, रजनीकांत, एन. बालकृष्ण, अनुपम खेर, मनोज वाजपेयी, जॅकी श्रॉफ, रणवीर सिंग, खुशबू सुंदर, साई पल्लवी, ऋषभ शेट्टी, सुहासिनी मणिरत्नम, रमेश सिप्पी, त्याशिवाय अन्य कित्येक देशी व विदेशी कलाकारांचा समावेश होता. प्रादेशिक भारतीय चित्रपटांत काम करणारे असंख्य चित्रपट कलाकारही यावेळी हजर होते. त्यात मराठी, बंगाली, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, उडिया आदी चित्रपट कलाकारांचा समावेश होता.
दिग्गजांना श्रद्धांजली
यंदा ‘इफ्फी’त जन्मशताब्दी वर्षानिमित्त ख्यातनाम अभिनेते व दिग्दर्शक गुरुदत्त, संगीत दिग्दर्शक सलील चौधरी, दिग्दर्शक ऋत्विक घटक, अभिनेते पी. भानुमती, भारतरत्नप्राप्त संगीतकार भूपेन हजारिका, दिग्दर्शक राज खोसला यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानिमित्त त्यांचे चित्रपट ‘इफ्फी’त दाखवण्यात आले.
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीला मोठे योगदान दिलेले दिग्दर्शक व नट व्ही. शांताराम यांचा जन्म झाला त्याला या वर्षी 125 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त यंदा ‘इफ्फी’त त्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानिमित्त त्यांचा चित्रपट तर दाखवण्यात आलाच, शिवाय त्यांचे सुपुत्र किरण शांताराम यांचा त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ सन्मान करण्यात आला. हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिलेले गोमंतकीय चित्रपट छायाचित्रकार के. वैकुंठ यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे; मात्र ‘इफ्फी’ आयोजकांना त्यांचा विसर पडल्याने काही लोकांनी त्यांनाही ‘इफ्फी’तून श्रद्धांजली दिली जावी अशी मागणी केल्यानंतर ‘इफ्फी’त ‘गोवा मार्चीस ऑन’ ही त्यांनी 1977 साली गोव्याच्या विकासावर तयार केलेली 27 मिनिटांची डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. तसेच टपाल खात्याने के. वैकुंठ यांच्यावर काढलेल्या टपाल तिकिटाचेही यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
‘इफ्फी’मध्ये सिमेमाविषयीच्या चर्चेसंबंधीचे कित्येक कार्यक्रम होत असतात. त्यात मास्टर क्लासेस, इन कनव्हर्सेशन, इंटरव्यूह सेशन, इन कनव्हर्सेशनल वर्कशॉप, वर्कशॉप, इंटरएक्टिव्ह सेशन, फायर साईड चॅट, पॅनल डिस्कशन्स, रिट्रोस्पेक्टिव्ह, राऊंड टेबल आदींचा समावेश आहे.
यंदा मास्टर क्लासमध्ये अभिनेते अनुपम खेर यांनी ‘गिव्हिंग अप इज नॉट ए चॉईस’, तर थिएटर गुरू विनयकुमार आदिशक्ती यांनी ‘ब्रेथ ॲण्ड इमोशन ः अ मास्टरक्लास ऑन पर्फॉर्मन्स’ यावर विचार मांडले. इन कनव्हर्सेशनमध्ये विधू विनोद चोप्रा यांनी ‘द आर्ट ॲण्ड इमोशन ऑफ फिल्ममेकिंग’, ‘शोले’ चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी ‘50 इयर्स ऑफ शोले’, मुजफ्फर अली यांनी ‘सिनेमा ॲण्ड कल्चर, तर इफ्फीचे संचालक शेखर कपूर व बर्लिन फिल्म फेस्टिव्हलच्या संचालक ट्रिसिया टुटल यांनी ‘डू वुई नीड टू रिडिफाइन सिनेमा इन द वर्ल्ड ऑफ एआय?’ या विषयावर विचार मांडले.
वर्कशॉप्समध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक राजू हिरानी यांनी ‘फिल्म इज मेड ऑन टू टेबल्स ः रायटिंग ॲण्ड एडिटिंग’ याविषयी मार्गदर्शन केले. रिट्रोस्पेक्टिव्हमध्ये फौझिया दास्तांगो यांनी दास्तान-ए-गुरुदत्त या कार्यक्रमातून गुरुदत्त यांची चित्रपट कारकीर्द व त्यांचे खाजगी जीवन याचा काव्यमयरीत्या आढावा घेताना त्यांना सुंदररीत्या श्रद्धांजली वाहिली. यावेळी गुरुदत्त यांच्या चित्रपटांतील संगीतही सादर करण्यात आले. फायर साईड चॅटमध्ये आमिर खान यांनी ‘द नेरेटिव्ह आर्किटेक्ट ऑफ द सोशल ट्रान्सफॉर्मेशन ॲण्ड इन्ल्युसिव्हिटी’ यावर विचार मांडले.
याशिवाय अन्य विविध विषयांवरही विविध सत्रांतून सांगोपांग अशी चर्चा झाली. ‘इफ्फी’तील ही सत्रे आता ‘इफ्फी’च्या प्रतिनिधींमध्ये लोकप्रिय होऊ लागलेली असून चित्रपटांच्या खेळांना जशी गर्दी होत असते तशीच गर्दी या सत्रांनाही आता होऊ लागली आहे. या वर्षीही ही सगळी सत्रे यशस्वी झाली. ही सत्रे कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात संपन्न झाली आणि बहुतेक सत्रांच्या वेळी सभागृहात गर्दी झाल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले.
इनफ्लेटेबल थिएटर
यंदाच्या इफ्फीत इनफ्लेटेबल थिएटर हे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. कुठल्याही मोकळ्या जागेत हे तात्पुरते थिएटर उभे केले जाऊ शकते. फुग्यात हवा भरून तो जसा फुगवला जातो, तसे हवा भरून हे थिएटर फुगवून उभे केले जाते. त्यात चित्रपट दाखवण्यासाठीच्या सगळ्या सोयी-सुविधा असतात. असे इनफ्लेटेबल थिएटर इफ्फीनिमित्त यंदा कला अकादमीच्या आवारात उभे करण्यात आले होते. इनफ्लेटेबल थिएटर उभारण्यासाठी एनएफडीसी व गोवा मनोरंजन सोसायटीने पिक्चर टाइम डिजिप्लेक्सकडे पार्टनरशीप केली होती. या थिएटरमध्ये यंदा इफ्फीनिमित्त शाहरूख खान यांचे ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’, ‘चक दे इंडिया’ व ‘डर’ तसेच ‘मंजुमल बाईस’ व काही बाल चित्रपट दाखवण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थी, गोव्यातील स्थानिक लोक, इफ्फीतील प्रतिनिधी व अन्य चित्रपटप्रेमींनी या इनफ्लेटेबल थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद लुटला. इफ्फीच्या प्रमुख स्थळापासून दूर इफ्फीतील प्रतिनिधींबरोबरच अन्य लोकांना इफ्फीनिमित्त चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देऊन इफ्फी सर्वसमावेशक बनवणे हा या इनफ्लेटेबल थिएटरचा उद्देश होता, असे ‘एनएफडीसी’ने स्पष्ट केले आहे.
‘इफ्फी’साठी दर्जेदार चित्रपटांची निवड
‘इफ्फी’त दरवर्षी 260 ते 270 वर चित्रपट वेगवेगळ्या विभागांत दाखवण्यात येत असतात. देश-विदेशांत तयार केलेले हे एवढे चित्रपट ‘इफ्फी’साठी निवडणे हे सोपे काम नसते. हे चित्रपट निवडण्याचे काम हे कित्येक महिने चालू असते, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय व ‘एनएफडीसी’च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘इफ्फी’ दरवर्षी भारतीय चित्रपट व जागतिक चित्रपट यांना एकत्र आणण्याचे काम करीत असतो. इंडियन पॅनोरमा विभागासाठी निवडण्यात येत असलेल्या चित्रपटांतून देशाच्या विविध भागांतील संस्कृती, लोकजीवन व विविध भाषा यांचे दर्शन चित्रपट रसिक, चित्रपट अभ्यासक व चित्रपटकर्मी यांना होत असते. तर ‘इफ्फी’तील आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागासाठी निवडण्यात येत असलेल्या चित्रपटांतून जागतिक सिनेमाचे दर्शन घडते. त्याद्वारे जागतिक स्तरावर सिनेमाच्या क्षेत्रात होत असलेले बदल, त्या चित्रपटांचा दर्जा, त्यांची कथा सादर करण्याची विलक्षण व नावीन्यपूर्ण अशी पद्धत आदींचे सर्वांनाच दर्शन घडते, असे केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी ‘इफ्फी’तून बोलताना स्पष्ट केले.
‘इफ्फी’तून दाखवण्यात येत असलेले चित्रपट निवडताना कोणतीही तडजोड केली जात नाही. चांगले व दर्जेदार चित्रपट याच निकषावर निवड केली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘कान’ चित्रपट महोत्सव या जगातील आघाडीच्या चित्रपट महोत्सवात ज्याप्रकारे चित्रपटांची निवड केली जाते, तशीच ‘इफ्फी’साठीच्या चित्रपटांची निवड केली जात असल्याचेही मुरुगन यांनी यंदाच्या ‘इफ्फी’तून बोलताना स्पष्ट केले. अशाच काहीशा भावना ‘इफ्फी’चे संचालक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांनीही ‘इफ्फी’तून बोलताना व्यक्त केल्या.
सुवर्ण मयूर
यंदाच्या ‘इफ्फी’त एका तृतीयपंथयांची कथा आणि व्यथा मांडणाऱ्या ‘स्कीन ऑफ यूथ’ या व्हिएतनामी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्ण मयूर हा पुरस्कार प्राप्त झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक ॲश मेफेअर यांनी केले आहे. तर रौप्य मयूर पुरस्कारावर ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाने आपले नाव कोरले. या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष दावखर यांनी केले असून मध्यरात्री विधिपूर्वकपणे केल्या जाणाऱ्या ‘गोंधळ’ या लोकनृत्याच्या पार्श्वभूमीवर गुंफलेली ही एक प्रेमकथा आहे.