30.7 C
Panjim
Friday, February 26, 2021

नव्या नेतृत्वाखाली भाजप

भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत्प्रकाश नड्डा यांनी काल अमित शहा यांचा पदभार स्वीकारला. अमित शहांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पक्षाला मिळवून दिलेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर नड्डा यांच्यासाठी आपल्या मापापेक्षा मोठ्या आकाराच्या बुटात पाय घालण्यासारखीच स्थिती आज आहे यात शंका नाही. अमित शहा आणि नरेंद्र मोदी ही जोडगोळी भारतीय जनता पक्षासाठी प्रचंड लाभदायक ठरली. केवळ निवडणुकांच्याच दृष्टीने नव्हे, तर पक्षाला देशात सर्वदूर पोहोचवण्यापासून व्यापक सदस्यता मोहिमेद्वारे जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष म्हणून स्थान मिळवून देण्यापर्यंत अनेक बाबतींत अमित शहांची अध्यक्षपदाची कारकीर्द भाजपासाठी भाग्ययोग ठरली. त्यामुळे त्यांची जागा घेणे हे नड्डा यांच्यासाठी मोदी – शहांचे त्यांना पूर्ण पाठबळ राहणार असले तरीही आव्हानात्मक राहणार आहे. अमित शहा पक्षाध्यक्षपदी असतानाच नड्डा यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली होती, त्यामुळे शहांनी घालून दिलेल्या पक्षातील नव्या कार्यशैलीशी ते पूर्णतः परिचित आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस उत्तर प्रदेशसारख्या सर्वांत महत्त्वपूर्ण राज्याची संघटनात्मक धुराही नड्डा यांनी यशस्वीरीत्या सांभाळली होती. सपा – बसपा एकत्र आलेले असूनही त्या राज्यातील ऐंशीपैकी ६२ जागा भाजपा जिंकू शकला आणि मोदींचा विजय अधिक सुकर झाला. रा. स्व. संघ, अभाविपपासून भाजपपर्यंतचा नड्डा यांचा आजवरचा प्रवास राहिलेला असल्यामुळे संघटनात्मक कामांचा त्यांना गाढा अनुभव आहेच. पक्षकार्यासाठी केंद्रातील मंत्रिपद सोडून देण्याइतपत पक्षनिष्ठा त्यांच्यापाशी आहे, त्याचेच आज चीज झाले आहे. आपली स्वच्छ प्रतिमा, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा स्वभाव यामुळे नड्डा यांची अध्यक्षपदाची कारकीर्द पक्षासाठी सुकर ठरेल यात शंका नाही. मात्र, या आणि पुढील वर्षात होणार्‍या विधानसभांच्या निवडणुका, पक्षाची गेल्या काही विधानसभा निवडणुकांत सातत्याने झालेली घसरण, पक्षातील इनकमिंगमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांत निर्माण झालेली, परंतु शहांच्या इतराजीच्या भीतीपोटी आजवर दबून राहिलेली नाराजी, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांच्या आक्रमक राजकारणाचे पक्षाच्या आगामी कामगिरीवर होऊ शकणारे परिणाम या सगळ्याचा विचार करून नड्डा यांना पावले टाकावी लागणार आहेत. दिल्ली विधानसभेची निवडणूक तर अगदी उंबरठ्यावर आहे. आम आदमी पक्षाने तेथे सामान्य जनतेसाठी केलेल्या कामगिरीमुळे अरविंद केजरीवाल जोशात आहेत. त्यांच्याकडून राजधानीची सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजपला शर्थ करावी लागणार आहे. आम आदमी पक्षाच्या हातून दिल्ली ताब्यात घेण्याचे पहिले आव्हान नड्डा यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांच्यापुढे आताच उभे आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीत सत्तरपैकी सदुसष्ट जागांवर भाजपचा सफाया झाला होता हे विसरून चालणार नाही. दिल्लीनंतर बिहारची महत्त्वपूर्ण विधानसभा निवडणूक यायची आहे. राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी करून सत्तारूढ झालेल्या, परंतु नंतर पुन्हा भाजपाच्या साथीत आलेल्या नितीशकुमारांच्या सोईस्कर राजकारणाचा सामना करीत पक्षाला त्यांच्यासमवेत बिहारमध्ये पुन्हा सत्तारूढ करायचे आव्हान नड्डांपुढे असेल. पुढील वर्षी तर पश्‍चिम बंगालच्या निवडणुकाही व्हायच्या आहेत. ममता बॅनर्जींच्या या गडामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील २९४ पैकी अवघ्या तीन जागा भाजपला जिंकता आल्या होत्या, तरीही लोकसभा निवडणुकीत पश्‍चिम बंगालमध्ये पक्षाने ४२ पैकी १८ जागा जिंकून इतिहास घडवला आहे. यशाची ही कमान अशीच चढती ठेवण्यासाठी नड्डा यांना पक्षाला सज्ज करावे लागणार आहे. भाजप जसजसा मजबूत होत चालला आहे, तसतसा एकेक मित्रपक्ष साथ सोडून चालला आहे ही पक्षासाठी मोठी डोकेदुखी आहे. मध्यंतरी तेलगू देसमने साथ सोडली, शिवसेनेसारख्या सर्वांत जुन्या मित्रपक्षाने हातावर तुरी दिली. बाजूला होत चाललेल्या मित्रपक्षांना पुन्हा एकवार एनडीएच्या छत्राखाली घेण्यासाठी नड्डांना प्रयत्न करावे लागतील. भाजपचे उत्पन्न इतर सर्व पक्षांपेक्षा दुप्पटीहून अधिक २४.१० अब्ज रू. असल्याची माहिती नुकतीच उघड झाली आहे. केंद्रात मजबूत सत्ता असल्याने निधीची उणीव पक्षापाशी नाही. अमित शहांनी बांधलेल्या बुथ पातळीवरील अत्यंत बळकट संघटनात्मक शक्तीचीही साथ आहे. मात्र, पंतप्रधान आणि गृहमंत्री एकापाठोपाठ एक घेत असलेल्या आक्रमक निर्णयांतून देशामध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेचा पक्षाच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होऊ नये हे नड्डा यांच्या कार्यकाळात त्यांना पाहावे लागणार आहे. अमित शहांच्या पक्षाध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी घालून दिलेल्या मळवाटेवरूनच नड्डा यांचा प्रवास असेल असे दिसते. ते स्वतंत्र प्रज्ञेने फार काही वेगळी छाप पक्षावर उमटवू शकतील असे वाटत नाही, परंतु जे प्रचंड यश शहांनी पक्षाला मिळवून दिले, त्याची कमान नड्डा कशी चढती ठेवतात ते महत्त्वाचे असेल!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

सर्वथा अनुचित

पालिका प्रभाग आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयापुढे झालेल्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांचा मनमानी कारभार उघडा पडला आहे. पालिका आरक्षणासंदर्भात ज्या...

६० वर्षांवरील व्यक्तींना मार्चपासून कोविड लस

>> केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती, ४५ वर्षांवरील व्यक्तींनाही गरजेनुसार लस देणार देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने...

नगरपालिका आरक्षण निवाडा राखीव

>> मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी पूर्ण गोवा नगरपालिका निवडणुकांसाठी गोवा सरकारने अधिसूचित केलेले प्रभाग आरक्षण व प्रभागांची...

गोमंतकीय दुसर्‍या लाटेचाही सामना करतील ः डॉ. बांदेकर

राज्यातील आरोग्य सेवकांना कोविडची लस देण्यात आलेली असल्याने आता राज्यात कोविडची दुसरी लाट आली तरी गोवा त्या लाटेचा चांगल्या प्रकारे सामना करू...

श्रीपाद नाईक यांना गोमेकॉतून डिस्चार्ज

मागील एक महिना आणि तेरा दिवस गोमेकॉत उपचार घेणारे उत्तर गोव्याचे खासदार व केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र कार्यभार) व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद...

ALSO IN THIS SECTION

सर्वथा अनुचित

पालिका प्रभाग आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयापुढे झालेल्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांचा मनमानी कारभार उघडा पडला आहे. पालिका आरक्षणासंदर्भात ज्या...

दुसर्‍या लाटेच्या दिशेने

देशामध्ये पुन्हा एकवार कोरोनाची लाट येऊ घातली आहे की काय असे वाटायला लावणारी आकडेवारी सातत्याने समोर येऊ लागली आहे. गोव्यामध्ये जरी सरकारी...

पालिकांचे पडघम

राज्यातील अकरा नगरपालिका आणि पणजी महानगरपालिका यांच्या निवडणुका अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. खरे तर ह्या निवडणुका गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये...

मेळावली ते मोपा

मोपा विमानतळ ते धारगळ जोडरस्त्यासाठीच्या भूसंपादनाला विरोध करणार्‍या शेतकर्‍यांविरुद्ध सरकारने जो बळाचा वापर केला, तो सर्वस्वी गैर आहे. ४५ महिलांसह ६७ आंदोलकांना...

सावध व्हा

गोव्यातील कोरोना पूर्ण नियंत्रणाखाली आला असल्याचे चित्र जरी सरकारी आकडेवारीवरून भासत असले, तरी शेजारच्याच महाराष्ट्रामध्ये सध्या देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत आणि...