सदस्य, कार्यालय पडताळणीविषयी निश्चित कालमर्यादा आज सादर करण्याचे गोवा खंडपीठाचे निर्देश
‘गोवा काँग्रेस पार्टी’ या प्रस्तावित नवीन राजकीय पक्षाच्या नोंदणी अर्जावर निर्णय घेण्यास होत असलेल्या विलंबाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने भारतीय निवडणूक आयोगाला फटकारले असून, प्रस्तावित पक्षाचे सदस्य आणि कार्यालयाच्या जागेची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण करण्यासाठी दि. 29 सप्टेंबरला निश्चित कालमर्यादा सादर करण्याचे निर्देश आयोगाला काल दिले.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोवा खंडपीठात गोवा काँग्रेस पार्टीच्या नोंदणी प्रश्नी एक याचिका दाखल केली आहे. नोंदणी अर्जावर निर्णय घेण्यापूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने उपस्थित केलेल्या आक्षेपांचा विचार करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावे, अशी मागणी याचिकेत केली आहे.
प्रस्तावित पक्षाने 2 जुलै रोजी नोंदणी करण्याबाबतची आपली इच्छा जाहीर केली होती, ज्यामुळे 30 दिवसांचा अनिवार्य कालावधी सुरू झाला होता. हा कालावधी 2 ऑगस्ट रोजी संपला. त्यानंतर काँग्रेसने जुलै आणि ऑगस्टमध्ये अधिकृत आक्षेप दाखल केले.
लोकप्रतिनिधी कायदाच्या कलम 29-ए अंतर्गत असलेल्या नियमांनुसार, अर्जदाराला 100 सदस्यांची शपथपत्रे, तसेच त्यांचे प्राप्तिकर विवरणपत्र, पॅन तपशील आणि पत्त्याचा पुरावा सादर करणे आवश्यक होते. ही कागदपत्रे गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहेत. सीईओ कार्यालयाकडून त्या पत्राचे सदस्य आणि प्रस्तावित पक्षाच्या कार्यालयाची प्रत्यक्ष पडताळणी करत आहेत. पडताळणीनंतर, अर्जदार पक्ष आणि आक्षेप घेणारे पक्ष या दोघांचेही म्हणणे ऐकून घेण्यासाठी आयोगाकडून संधी दिली जाणार आहे.
गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना त्या 100 शपथपत्रांची पडताळणी आणि प्रत्यक्ष तपासणी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.
आक्षेपांचा विचार होईल : आयोग
सध्या गोवा काँग्रेस पार्टी या नावाने कोणताही राजकीय पक्ष नोंदणीकृत नाही. मात्र, नोंदणीसाठीचा अर्ज छाननीच्या प्रक्रियेत आहे आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काँग्रेसने दाखल केलेल्या आक्षेपांचा विचार केला जाईल, असे निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

