राज्यातील रस्त्यांवरील वाहनांचा वाढता आकडा आणि वाढते अपघात याची गंभीर दखल घेत राज्य सरकारने गोवा रस्ता सुरक्षा धोरण 2025 अधिसूचित केले आहे. राज्यातील रस्त्यांवरील वाहतूक ही सुरक्षित व्हावी, त्यात शिस्त यावी, तसेच त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर व्हावा हा या नव्या धोरणाचा उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. नव्या धोरणानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व डेटा ॲनालिटिक्सचा वापर वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी करण्यात येणार आहे.
सप्टेंबर 2024 पर्यंत राज्यातील नोंदणीकृत वाहनांचा आकडा हा तब्बल 13.23 लाख एवढा होता. त्यात 8.69 लाख दुचाकी वाहने होती. राज्यात नोंदणीकृत दुचाकी वाहनांची संख्या ही दरवर्षी 17 टक्क्यांनी वाढत आहे, असे वाहतूक खात्याने स्पष्ट केले आहे.
2023-24 ह्या एका वर्षात राज्यात 2682 रस्ता अपघात झाले आणि त्यात 286 जणांचा मृत्यू झाला होता. वाहतूक खात्याने 2030 सालापर्यंत रस्ता अपघातांतील मृतांचे प्रमाण निम्म्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच एआय आधारित वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा पीपीपी तत्त्वावर उभारण्याचा निर्णयही घेतला आहे. अपघातप्रवण रस्त्यांवर ही यंत्रणा प्राधान्याने बसवण्यात येणार आहे.

