26.1 C
Panjim
Friday, June 25, 2021

नवी उभारी

कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी पदभार स्वीकारताना सुरूवात तर मोठी दणक्यात केली. नुकतीच हकालपट्टी झालेले माजी प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांच्या मनमानीमुळे दुखावलेेले आणि पक्षापासून दूर राहिलेले सगळे रथी – महारथी लुईझिन यांच्या स्वागतासाठी जातीने हजर राहिले होते. त्यातून गोव्यातील कॉंग्रेस पक्ष एकसंध आहे असे चित्र जरी निर्माण झाले असले, तरी ही एकजूट कितपत खरी आणि कितपत खोटी हे स्पष्ट होण्यासाठी आणखी थोडा काळ जावा लागेल. जॉन फर्नांडिस यांनी हाती प्रदेशाध्यक्षपदाची तलवार येताच येत्या जात्यावर ती सपासप चालवायला सुरूवात केली होती. पक्षाच्या स्वच्छतेचा ठेका आपल्याला दिला आहे असे सांगत त्यांनी आपले वैयक्तिक रागलोभ या तथाकथित पक्ष स्वच्छतेच्या बेफाम मोहिमेत मिसळले आणि कारवाईचा सपाटाच लावला. त्यातून पक्षाचे ज्येष्ठ नेते दुखावले आणि दूर गेले. त्यातून अपरिहार्यपणे जॉन यांची गच्छंती झाली. जॉन यांच्या या गच्छंतीत व लुईझिन यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद येण्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे आणि आताचा एकंदर रागरंग पाहिला, तर विधिमंडळ गटात राणे आणि पक्ष संघटनेत लुईझिन हे पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेते म्हणून पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी हातात हात घालून काम करणार आहेत असे एकंदर चित्र फालेरोंच्या पदग्रहणानंतर निर्माण झाले आहे. लुईझिन यांनी पदभार स्वीकारत असतानाच गोव्याला मोपा विमानतळाची गरज नाही असे सांगून टाकले. लुईझिन यांची ही भूमिका कॉंग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे का? विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांना ती मान्य आहे का? असे प्रश्न त्यामुळे अर्थातच उपस्थित झाले आहेत आणि लुईझिन यांची वैयक्तिक भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका म्हणून निमूटपणे मान्य केली जाणार का हाही सवाल निश्‍चितपणे विचारला जाणार आहे. जॉन यांनी जी चूक केली ती लुईझिन करणार नाहीत अशी अपेक्षा आहे. केवळ स्वतःच्या मतानुसार नव्हे, तर सर्वांची मते समजून घेऊन व सर्वांना सोबत घेऊन त्यांना पुढे जावे लागणार आहे. गेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर कॉंग्रेस पक्षाचे मनोबल पूर्णपणे खच्ची झाले आहे. जॉन यांच्या कारकिर्दीत त्यात भरच पडली. हे मनोबल उंचावून पक्षाची संघटनात्मक बांधणी करणे हे लुईझिन यांच्यापुढील पहिले मोठे आव्हान आहे. २०१७ च्या निवडणुकीसाठी पक्षाला उभारी देण्यासाठी त्यांच्यापाशी अडीच वर्षांचा काळ आहे. जॉन यांनी घेतलेल्या निर्णयांच्या फेरआढाव्यापासून बुथ समित्यांच्या फेररचनेपर्यंत खूप काही त्यांना करावे लागेल. त्यांच्या पदग्रहणास सर्वांची उपस्थिती असली, तरी पक्षाच्या नेतृत्वामध्ये मुळीच एकवाक्यता नाही. हे हेवेदावे निवडणुकीचे रागरंग दिसू लागले की उफाळून येतील. त्यालाही भविष्यात त्यांना सामोरे जावे लागणार आहे. आपण स्वतः कुठल्याही स्पर्धेत नाही असे सांगून त्यांनी आपल्याला राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्याचे जाहीर केले आहे, परंतु त्यांची ही भूमिका खरोखरची आहे की आपल्याबाबत साशंक असलेल्या नेत्यांना चुचकारण्याचा हा प्रयत्न आहे ते भविष्यात दिसेलच. कर्नाटक आणि ईशान्य राज्यांतील कॉंग्रेसच्या यशाचे श्रेय जाता जाता स्वतःकडे घ्यायलाही ते विसरलेले नाहीत. पक्ष कार्यकर्त्यांना गार्‍हाणी आपल्याकडे मांडण्याचा व प्रसारमाध्यमांकडे न जाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. ‘कमी बोला आणि जास्त काम करा’ हा कानमंत्रही त्यांनी दिला आहे. विधिमंडळ गट आणि पक्षसंघटना यामध्ये सौहार्द आणि सलोखा निर्माण करण्याचे आव्हानही फालेरो यांच्यापुढे आहे. राणे, रवी, सार्दिन हे सगळे ज्येष्ठ नेते परवा एकत्र दिसले तरी त्यांचे रागलोभ सांभाळण्याची कसरतही फालेरोंना करावी लागेल. प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारताना राज्याच्या आर्थिक प्रश्नांना स्पर्श करून त्यांनी योग्य दिशा पकडली आहे असे म्हणावे लागेल. खास राज्याच्या मागणीचे त्यांनी समर्थन केले खरे, मात्र त्याला आर्थिक कारणांची जोड दिली आहे. केंद्राच्या अनुदाननीतीबाबत त्यांची तक्रार असली, तरी त्यांच्याच पक्षाच्या सरकारने याआधी ती घालून दिलेली आहे. फालेरो यांना सक्रिय राजकारणाचा गाढा अनुभव आहे. त्यामुळे पक्षावर पकड ठेवण्यात ते जॉन यांच्यासारखे कमी पडणार नाहीत. पण पक्षाला नवी उभारी देऊ शकतील का एवढाच प्रश्न आहे.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

सुस्तावाल तर पस्तावाल!

कोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...

आता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका

>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...

लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो

गोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...

सीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच

>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...

राज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार

>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...

ALSO IN THIS SECTION

सुस्तावाल तर पस्तावाल!

कोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...

विरोधक एकत्र येणार?

‘जो मै बोलता हूँ, वो मै करता हूँ, जो मै नही बोलता वो तो डेफिनेटली करता हूँ’ हा हिंदी चित्रपटातील संवाद ज्यांना...

स्वातंत्र्याचा हुंकार!

बरोबर ७५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी संध्याकाळी ठीक चार वाजता ह्या गोमंतकामध्ये एक चमत्कार घडला. एक अशी गोष्ट घडली जी कोणी कधी पाहिली...

कॉंग्रेसी सुंदोपसुंदी

कॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव आज गोवा दौर्‍यावर येत आहेत. राज्य विधानसभेची निवडणूक आता आठ महिन्यांवर आली असल्याने कॉंग्रेस पक्षाला त्यासाठी...

विझलेला चिराग

राजकारण हे कोणत्या थराला जाऊ शकते आणि रक्ताच्या नात्यावरही कसे मात करू शकते त्याचा दाहक प्रत्यय सध्या स्व. रामविलास पास्वान यांचे चिरंजीव...