केंद्रीय राज्यमंत्री अजय टमटा यांची माहिती
फोंडा तालुक्यातील झुवारी नदीवरील नवीन बोरी पूल, मोले ते खांडेपार महामार्ग चौपदरीकरण, मडगावचा वेस्टन बगलमार्ग या नवीन कामांचा तत्त्वतः मान्यता देण्यात आली असून मंत्रालयाच्या वार्षिक आराखड्यात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, झुवारी पुलावरील सेल्फ़ी पॉइंटचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री अजय टमटा यांनी काल ‘इंडियन रोड्स काँग्रेस’च्या 237 वी मध्य-सत्र परिषदेत सहभाग घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दोनापावल येथे काल दिली.
बोरेी येथील नवीन पुलाच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली आहे. मडगाव भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी बगल मार्गाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली आहे, असेही केंद्रीय मंत्री अजय टमटा यांनी सांगितले.
‘अटल सेतू’ पुलाच्या बांधकाम प्रकल्पामागील अभियांत्रिकी कौशल्याचे केंद्रीय मंत्री टमटा यांनी कौतुक केले. हा नवीन पूल आधीपासून अस्तित्वात असलेल्या दोन पुलांच्या मधल्या जागेत खांब उभारून बांधण्यात आला आहे. परिषद ही एक व्यासपीठ असून देशभरातील अभियंते आणि तज्ज्ञांना एकत्र आणते. ही परिषद रस्ते अभियांत्रिकी, संशोधन, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत तांत्रिक चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे, असेही केंद्रीय मंत्री टमटा यांनी सांगितले.
राज्यातील सुमारे 1900 कोटी रूपये खर्चाच्या फोंडा तालुक्यातील झुआरी नदीवरील महत्त्वपूर्ण मानला जाणारा बोरी पूल व इतर प्रकल्पांचे काम जलदगतीने मार्गी लावण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. मोले-खांडेपार चौपदरीकरण प्रकल्प, तसेच मडगाव वेस्टर्न बायपास आणि सांखळी बायपास रस्ते जोडणी व सुरक्षा प्रकल्पांसाठीही सहकार्य करावे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.
गोव्यातील 280 किमीच्या राष्ट्रीय महामार्ग जाळ्यापैकी 126 किमी मार्गाचे श्रेणीसुधार करण्यात आले आहे, तर आणखी 70 किमी मार्गाचे काम सुरू आहे किंवा निविदा प्रक्रियेत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. 2014 पासून केंद्राने 15,860 कोटी रुपये खर्चाचे 124 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि 378 कोटी रुपये खर्चाचे 19 रस्ते सुरक्षा प्रकल्प मंजूर केले आहेत. रस्ते पायाभूत सुविधांसाठी 16,440 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला असून, त्यापैकी 7,240 कोटी रुपयांहून अधिक रक्कम आधीच खर्च केली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्राच्या पाठिंब्यामुळे रस्ते पायाभूत सुविधांमध्ये उल्लेखनीय बदल झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग, पूल, बायपास आणि रस्ते सुरक्षा प्रकल्पांमधील गुंतवणुकीमुळे संपर्क व्यवस्था बळकट झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पर्वरी येथील उड्डाण पूल
चतुर्थीपूर्वी खुला ः कामत
पर्वरेी येथील उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून येत्या श्रीगणेश चतुर्थीपूर्वी हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी दिली.

