नवीन पीडीए नकोत

0
66

>> कॉंग्रेस : लवकरच कृती निश्‍चिती

राज्यात दोन नवीन पीडीए स्थापन करण्याच्या निर्णयाला कॉँग्रेस व शिवसेनेेने विरोध दर्शविला आहे.
गुरूवारी घेण्यात आलेल्या टीसीपी मंडळाच्या बैठकीत ग्रेटर पणजी आणि मोपा या दोन नवीन पीडीए स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया व्यक्त करताना कॉँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सांगितले की, कॉँग्रेस पक्षाने नवीन पीडीए निर्मितीला यापूर्वीच विरोध केलेला आहे. नवीन पीडीए निर्मितीच्या विरोधातील पुढील कृती लवकरच निश्‍चित केली जाणार आहे, असे आमदार रेजिनाल्ड यांनी सांगितले.

भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने मागील सहा वर्षे प्रादेशिक आराखडा प्रलंबित ठेवला आहे. केवळ हितसंबधितांच्या सोयीसाठी नवीन पीडीएची निर्मिती केली जात आहे. नवीन पीडीए स्थापन करण्याचा निर्णय गोंयकारपणाच्या विरोधात आहे. पीडीएच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे, असे आमदार रेजिनाल्ड यांनी सांगितले. कॉँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी नवीन पीडीएला विरोध करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केलेला आहे, असे कॉँग्रेसच्या कायदा विभागाचे अध्यक्ष यतीश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, शिवसेनेने नवीन पीडीएला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री बाबुश मोन्सेरात यांचे राजकीय पुर्नवसन करण्यासाठी ग्रेटर पणजी पीडीएची स्थापना करण्यात येत आहे, असा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या राखी नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला.