नवीन आंबा लागवड पद्धतीतून उत्पादन वाढणार

0
123
कमी घनतेत आंब्याच्या वृक्षांची लागवड करण्याची पद्धत विकसित करण्यासाठी जागृती करणार असल्याचे कृषी खात्याच्या संचालकांनी सांगितले. दि. १३ मे पासून येथील गोवा कला अकादमी संकुलात कृषी खात्याने तीन दिवसांचा आंबा महोत्सव आयोजित केला आहे. त्यासंबंधी ते बोलत होते.

वरील योजना लोकप्रिय व्हावी व शेतकर्‍यांना त्याचा लाभ व्हावा व त्यासंबंधीचे ज्ञान मिळावे यासाठी महोत्सवस्थळी प्रात्यक्षिक विभागच स्थापन करण्याचे ठरविले आहे. गोव्यात कमी घनतेत आंब्याच्या वृक्षांची लागवड करण्याची पद्धत नाही. राज्याच्या वेगवेगळ्या भागात आंब्यांची अनेक मोठी झाडे आहेत. अधिक घनता ठेवून या झाडांची लागवड केली आहे. सध्याच्या परिस्थितीत आंबे काढण्यासाठी मजूर मिळणे कठीण होते. कमी घनतेत आंब्याची लागवड केल्यानंतर आंबे काढण्याच्या बाबतीत शेतकर्‍यांना सोपे होईल व उत्पादनाचे प्रमाणही वाढेल, असे संचालक तुफानी यांनी सांगितले.
आधुनिक पद्धतीने जलसिंचन करण्याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी कृषी अधिकार्‍यांनी जोरदार तयारी सुरू केली असून गोव्यात सुमारे ४५ जातीच्या आंब्यांची लावगड केली जाते. या महोत्सवात सर्व जातीच्या आंब्याचे दर्शन होऊ शकेल. बाराही तालुक्यातून मिळून किमान एक हजार प्रवेशिका मिळविण्यासाठी कृषी खात्याचा प्रयत्न आहे, असे तुफानी यांनी सांगितले.
आंबा लागवडीसाठी कृषी खाते प्रोत्साहन देत असून प्रती हेक्टरसाठी ३० हजार रुपये अनुदान देण्याची खात्याची योजना असून अनेक बागायतदारांनी योजनेचा लाभ घेतल्याचे कृषी संचालकांनी सांगितले.