नवा विधिमंडळ गटनेता लवकरच निवडणार

0
23

>> भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची निकालानंतर माहिती

मगो आणि अपक्षांच्या सहकार्याने भाजप सरकार स्थापन करणार आहे. मगोने सरकार स्थापनेसाठी पाठिंब्याचे पत्र दिले आहे. भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक घेऊन नेता निवडण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीकडून गोव्यात निरीक्षक पाठविण्यात येणार आहे. केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेऊन नेत्याची निवड केली जाणार आहे. त्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
भाजपचे २० आमदार, मगोचे २ आमदार आणि ३ अपक्ष यांचे नवीन सरकार स्थापन केले जाणार आहे. आणखी काही जण सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात, असेही फडणवीस यांनी सांगितले.

भाजपने मागील १० वर्षात गोव्याच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. भाजप सरकार आणि भाजप संघटनेने योग्य समन्वय साधून केलेल्या कामाचे फळ मिळाले आहे. गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी मतदारांनी आणखी एक संधी दिली आहे. गोव्यातील पुढील पाच वर्षे समृद्धीची असतील, असेही फडणवीस यांनी सांगितले. आम्हाला कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांची गरज नाही. कॉंग्रेस आमदारांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा संधी दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले.
यावेळी भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सहप्रभारी किशनजी रेड्डी, विश्‍वजित राणे, रवी नाईक यांची उपस्थिती होती.