नवा ‘गोवा काँग्रेस पक्ष’फक्त मतविभाजनासाठीच

0
13

काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांचा आरोप

काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही; पक्ष अजूनही एकसंध

राज्यातील काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. पक्ष अजूनही एकसंध आहे, असा दावा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला. गोव्यात नव्याने स्थापन झालेल्या ‘गोवा काँग्रेस पक्षा’चा एकमेव उद्देश हा विरोधी पक्षांची मते विभागणे आणि अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा करून देणे हा आहे, असा आरोप देखील माणिकराव ठाकरे यांनी केला.
काँग्रेसचा कोणताही नेता या नवीन ‘गोवा काँग्रेस पक्षा’शी जोडलेला नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्ष संघटन बळकट करण्यास आणि भाजपला विरोध करण्यास मनापासून इच्छुक असलेल्या कोणाचेही स्वागत करण्यास काँग्रेस तयार आहे, असेही ते म्हणाले.

राज्यातील धर्मनिरपेक्ष मतदारांची दिशाभूल करण्यासाठी गोवा काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आता, भाजपला काँग्रेसच्या झेंड्याचीही भीती वाटू लागली आहे. आमचे झेंडे काढून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न केवळ एकच गोष्ट सिद्ध करतो, तो म्हणजे काँग्रेसची वाढती ताकद, एकता आणि बुलंद आवाज यांची त्यांना वाटणारी भीती, असे काँग्रेसच्या गोवा प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी शहरात राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या दौऱ्यानिमित्त लावलेले झेंडे हटविण्याच्या प्रकारावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

झेंडा म्हणजे केवळ कापडाचा तुकडा नव्हे, तर तो आमच्या विचारसरणीचे, लोकशाहीप्रति असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे आणि जनतेसाठी लढण्याच्या आमच्या अटळ निर्धाराचे प्रतीक आहे. कोणतीही धमकी आमचा उत्साह कमी करू शकत नाही. दडपशाहीची कोणतीही कृती आमच्या चळवळीचा आवाज दाबू शकत नाही, असेही डॉ. निंबाळकर यांनी म्हटले आहे.

नागरिकांत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न
राज्यातील नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण करण्यासाठी नवीन ‘गोवा काँग्रेस पक्ष’ या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्ष एकसंध असून, भाजपला पराभूत करण्याचे एकमेव ध्येय घेऊन पुढे जात आहे, असेही आलेमाव यांनी म्हटले आहे.