28 C
Panjim
Tuesday, September 22, 2020

नवसंकल्प

‘शिवधनुष्य पेलताना’ या शीर्षकाखाली अग्रलेख लिहून नवप्रभेच्या संपादकपदाची सूत्रे स्वीकारली होती, त्याला आज गुढीपाडव्याला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने गेल्या आठ वर्षांतील संपादकीय वाटचालीचे थोडेसे सिंहावलोकन करायला आणि भविष्याचा वेध घ्यायला हरकत नसावी. या आठ वर्षांत नवप्रभेचे अंतरंग आणि बाह्यांग कसकसे बदलले त्याचे आपण सगळे साक्षीदार आहातच. बदललेली मांडणी, वाढलेली पाने, ‘अंगण’, ‘आयुष’, ‘कुटुंब’सारख्या अत्यंत यशस्वी ठरलेल्या पुरवण्या, स्वतःचे संकेतस्थळ, ई-पेपर, सोशल मीडियावरील उपस्थिती, वार्षिक दिनदर्शिका, दिवाळी अंक, विशेष प्रसंगीचे समग्र वार्तांकन, विशेषांक अशा नाना माध्यमांतून वाचकांना अभिजात वृत्तपत्र वाचनाचा आनंद देण्याची धडपड आम्ही करीत आलो आहोत. अर्थात, हे स्वरूप परिपूर्ण नाही याचीही आम्हाला नम्र जाणीव आहे, परंतु आणखी चारच वर्षांनी नवप्रभा आपला सुवर्णमहोत्सव साजरा करणार असल्याने त्या दिशेने अनेक चांगले बदल येणार्‍या काळात होऊ घातले आहेत याचे सूतोवाच आम्ही या शुभदिनी करू इच्छितो. १९७० साली पंधरा ऑगस्टला जेव्हा या छोट्याशा दैनिकाची मुहूर्तमेढ पत्रमहर्षी स्व. द्वा. भ. कर्णिक यांच्यासारख्या जाणत्या संपादकांनी रोवली, तेव्हा ‘अभिवादन आणि आवाहन’ या शुभारंभी अग्रलेखामध्ये त्यांनी या दैनिकाची भावी दिशा स्पष्ट करणारी संपादकीय भूमिका मांडली होती. नवहिंद टाइम्सचे भावंड या नात्याने ‘‘तेच उदारमतवादी धोरण, तीच पक्षनिरपेक्ष वृत्ती, वृत्तदिग्दर्शनातील सत्यनिष्ठा आणि विचार प्रदर्शनातील तीच ऋजुता कायम ठेवण्याला आम्ही बांधलेले राहू हे आमच्या वाचकांनी नितांत विश्वासाने गृहित धरायला हरकत नाही’’ अशी ग्वाही त्यात दिली गेली होती. आज ४६ वर्षांनंतरही याच संपादकीय भूमिकेतून नवप्रभेची वाटचाल शांतपणे सुरू आहे. अनेक दिवे या काळात आले, भगभगले आणि मालवूही लागले, परंतु नवप्रभेचा नंदादीप शांतपणे, संयतपणे तेवत राहिला आहे तो आपल्यासारख्या निष्ठावान वाचकांच्या भरघोस पाठबळावर. पत्रलेखकांना अत्यंत सन्मानाचे स्थान आम्ही देतो ती याच नात्याची निशाणी आहे. गोव्यातील पत्रलेखकांची संघटना बांधण्यासही आम्ही पाठबळ दिले होते. दुर्दैवाने त्या कल्पनेचा बोजवारा उडालेला दिसतो आहे. मराठी आणि कोकणीतील प्रतिभावंत लेखकांचे योगदान नवप्रभेला नेहमीच लाभत आले आहे आणि यापुढेही लाभेल असा विश्वास आहे. या सर्वांच्या बळावर नवप्रभेचा खप वाढू लागला आहे ही सुवार्ताही या शुभदिनी आपल्यासारख्या सुह्रदांना द्यायला हरकत नसावी. आजची वृत्तपत्रे भूमिका घेत नाहीत अशी तक्रार आजूबाजूला सर्रास ऐकू येते. परंतु ‘भूमिका घेणे’ म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे. शांतपणे आणि सभ्य, सुसंस्कृत भाषेतूनही योग्य तो संदेश पोहोचवला जाऊ शकतो यावर आमचा ठाम विश्वास आहे. एकांगी, प्रचारकी आक्रमकतेपेक्षा तटस्थता, स्पष्टता आणि निरपेक्षता या त्रिसूत्रीच्या आधारे मांडलेल्या विचारांना जे नैतिक बळ असते, त्याचे मोल खूप मोठे असते. आजचा वाचक सुजाण आहे, चाणाक्षही आहे. त्यामुळे तो हे निश्‍चितच जाणतो. अलीकडेच निधन झालेले ज्येष्ठ विचारवंत संपादक अरूण टिकेकर यांनी एका मुलाखतीत ‘‘समाजातील घटकांच्या स्नेहार्दतेत न अडकता, या घटकांपासून दूर राहून आपली टीकाटिप्पणी अग्रलेखात करण्याने आवश्यक ती निःपक्षपाती म्हणजे पक्षरहित आणि निर्भीड मते मांडता येऊ शकतात’’ असे मतप्रकटन केले होते. सततचा जनसंपर्क राखून, परंतु या तटस्थतेला बाधा येऊ न देता नवप्रभेची संपादकीय वाटचाल सुरू आहे याची खात्री बाळगावी. आज प्रसारमाध्यमांचे वैचारिक गांभीर्य हरवत चाललेले आहे. लोकानुनय आणि लोकानुरंजन करण्याकडे कल वाढू लागला आहे. परंतु वृत्तपत्राचे वृत्तिगांभीर्य कायम ठेवूनही बाह्यांग आणि अंतरंगामध्ये आकर्षकता आणता येते याचा वस्तुपाठ गेल्या काही वर्षांतील वाटचालीत नवप्रभेने घालून दिलेला आहे याची विनम्रपणे नोंद करीत आहोत. गुढीपाडवा हा नव्या संकल्पांचा दिवस. येणारी वर्षे ही सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने नेणारी आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने येणार्‍या काळामध्ये आपली नवप्रभा अधिक सशक्त, अधिक चैतन्यमय आणि अधिक लोकाभिमुख करण्याचा संकल्प आज आपल्या सर्वांच्या साक्षीने सोडीत आहोत. आपली साथ आजवर लाभली. यापुढेही नक्कीच लाभेल. अशीच उत्तरोत्तर ही सक्रिय साथ लाभावी ही अपेक्षा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अल्झायमरला दूर ठेवण्यासाठी….

डॉ. गजानन पाणंदीकर(न्युरॉलॉजिस्ट- हेल्थवे हॉस्पिटल) २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर या रोगाचा...

कोरोना विरोधात रसायन द्रव्ये

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) २०२० वर्ष फक्त जगायचे, आरोग्य सांभाळायचे. बस्स..! कोणतीच चिंता नको, कसे होईल ही...

भाजणे : लक्षणे, कारणे, उपचार भाग – २

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर(श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) कित्येक लोकांचा असा गैरसमज असतो की भाजलेल्या जखमेवर टूथपेस्ट, क्रीम, बटर इत्यादी...

गायीचे दूध आणि त्याचे स्वरूप भाग – ३

वैद्य स्वाती हे. अणवेकरम्हापसा आपल्या देशी गाईंचे संगोपन अगदी कमी खर्चात होते. म्हणून त्यांना बेवारशासारख्या रस्त्यावर न सोडता...

हडेलहप्पी नको

संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...

ALSO IN THIS SECTION

हडेलहप्पी नको

संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...

मेहेरबानी का?

गोव्यातील खासगी इस्पितळांवर राज्य सरकार आणि विशेषतः आरोग्य खाते फारच मेहेरबान दिसते. देशातील बहुतेक सर्व राज्यांनी खासगी इस्पितळांतील कोरोना रुग्णांवरील उपचाराचे दर...

असंतोषाचे ‘बादल’

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सत्तराव्या वाढदिनीच त्यांच्या मंत्रिमंडळातील विश्‍वासू मित्रपक्ष शिरोमणी अकाली दलाच्या एकुलत्या एक मंत्री हरसिम्रतकौर बादल यांनी सरकारच्या ‘शेतकरीविरोधी...

चौकशी करा

राज्यातील बांधकाम मजूर घोटाळाप्रकरणी निवृत्तीच्या उंबरठ्यावरून लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी दिलेला निवाडा सरकारची अब्रू वेशीवर टांगणारा आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये बांधकाम...

दिलासा आणि भरवसा

कोरोनाने मानवाची सर्वश्रेष्ठत्वाची अहंता उद्ध्वस्त केली. डोळ्यांना न दिसणारा, संवेदनांना न जाणवणारा एखादा अतिसूक्ष्म विषाणू देखील ह्या अब्जावधी माणसांना एवढे हतबल करू...