नवरात्रीतील उपासना

0
7
  • डॉ. मनाली महेश पवार

या काळात पचनाचे विकार, रक्ताचे विकार, पित्ताचे विकार, त्वचा विकार, मूळव्याधसारखे शारीरिक विकार तसेच चिडचिड, संताप, ताणतणाव, निद्रानाश, उन्माद, अपस्मारसारखे मानसिक आजार उफाळून येतात. पित्त ज्याप्रमाणे विविध व्याधी उत्पन्न करते, त्याचप्रमाणे योग्य प्राकृत पित्त उत्साहही निर्माण करते. निसर्गातील या बदलाला सहकार्य मिळावे यासाठी नवरात्रामध्ये शक्तीची उपासना केली जाते.

गुणसूत्रातील दोष, आपल्या पूर्वजांच्या प्रकृतीमुळे येणारे दोष, ज्या वातावरणात आपण वाढलो त्या वातावरणाचे दोष हे सर्व पितृपक्षाच्या पंधरा दिवसांच्या उपासनेतून दूर केले जातात. या सर्व उपासनेमुळे शुद्ध झालेले शरीर-मन आणि त्याचबरोबर वातावरण यांना शक्ती मिळते. नवरात्रीतील शक्तिमहोत्सव म्हणजे नवरात्र महोत्सव.


या काळात पावसाळा संपत आलेला असतो. शरद ऋतूची सुरुवात होत असते. पावसाळ्यात येणारी मरगळ हळूहळू दूर होऊन उत्साह वाढायला लागतो. त्याचप्रमाणे शरीरस्थ व निसर्गस्थित पित्तगुणाची वृद्धी होऊ लागते. पित्ताचे शारीरिक व मानसिक विकारही वृद्धिंगत होऊ लागतात. पचनाचे विकार, रक्ताचे विकार, पित्ताचे विकार, त्वचा विकार, मूळव्याधसारखे शारीरिक विकार तसेच चिडचिड, संताप, ताणतणाव, निद्रानाश, उन्माद, अपस्मारसारखे मानसिक आजारही उफाळून येतात. पित्त ज्याप्रमाणे विविध व्याधी उत्पन्न करते, त्याचप्रमाणे योग्य प्राकृत पित्त उत्साहही निर्माण करते. निसर्गातील या बदलाला सहकार्य मिळावे यासाठी नवरात्रामध्ये शक्तीची उपासना केली जाते.


नवरात्र हा भारतातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे आणि त्याला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. या वर्षी नवरात्री 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 12 ऑक्टोबरपर्यंत भक्ती, उपवास आणि उत्सव असे नऊ दिवस चालेल. हा क्षण देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांच्या उपासनेला समर्पित आहे. नवरात्रीमध्ये विशिष्ट अन्ननिर्बंधाचे पालन करतात व हे प्रदेशानुसार बदलते. काही लोक पूर्ण नऊ दिवस काहीही न खाता फक्त पाण्यावरच राहतात. काहीजण शिजवलेले न खाता उपवास करतात. काही एकभुक्त राहतात.


नवरात्रीच्या उपवासाचे आध्यात्मिक आणि शारीरिक फायदे आहेत. मुख्य उद्देश शरीर आणि मन स्वच्छ करणे आहे, जेणेकरून आपण परमात्म्याशी जोडले जातो. उपवास हा आत्मनियंत्रणाचा एक प्रकार आहे. म्हणून आपण आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवून साधे सात्त्विक अन्न खाऊन दुर्गादेवीची भक्ती करतो. शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर खरंच या दिवसांत आपले आरोग्य टिकवण्यासाठी लंघन अपेक्षित असते. कारण सूर्यसंताप वाढल्याने वर्षाऋतूत संचित झालेल्या पित्ताची वृद्धी होते व अहितकर आहार-विहार चालू राहिल्यास पित्ताचा प्रकोप होतो. पित्त दूषित होते व अनेक पित्तज विकार उद्भवू लागतात. म्हणूनच या काळात लंघन महत्त्वाचे आहे. त्यामुळेच पचायला हलका असा आहार सेवन करावा.


उपवासामध्ये अन्य खाद्यपदार्थांपेक्षा फळांना जास्त महत्त्व आहे. फळे पचायला हलकी व पौष्टिक असल्याने या काळात विशेष सेवन करावीत. फळे दिवसभर उत्साही ठेवण्यासाठी नैसर्गिक शर्करा आणि आवश्यक जीवनसत्त्वे देतात. केळी, सफरचंद, पपई, डाळिंब, संत्री, मोसंबीसारख्या फळांना प्राधान्य द्यावे. कारण ही फळे हायड्रेट ठेवतात आणि पौष्टिक असतात. केळ्यांमधील पोटॅशियम, सफरचंदातील फायबर, संत्री-मोसंबीतील व्हिटामिन-सी, डाळिंबातील अँटिऑक्सिडंट गुण शरीराला थकवा आणण्यापासून वाचवतात. त्याचप्रमाणे मलावरोध होऊ देत नाहीत. विविध फळांच्या सेवनाने आहार संतुलित राहतो. जेवणात गोडवा राहिल्याने उपवास आनंददायी होतो.


नवरात्रीच्या काळात दूध व दुग्धजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कॅल्शियम, प्रथिने याने समृद्ध असलेले हे पदार्थ उपवासादरम्यान महत्त्वाचे आहेत. शरीरशक्ती टिकवण्यासाठी दूध, तूप, दही, ताक, लोणी यांसारख्या दुधाच्या पदार्थांचा भरपूर उपयोग करावा. रोज सकाळी पंचामृत सेवन करावे.
नवरात्रामध्ये मधुर, आम्ल, कडू अशा चवीच्या पदार्थांचे सेवन करावे म्हणजे शरीरात हलकेपणा येतो. पचन सुधारते. अग्निसंधुक्षण होते व शरीरबल सुधारते. म्हणूनच नवरात्रामध्ये देवीला नैवेद्य म्हणून तूप, साखर, दूध, मध, गूळ, खोबरं इत्यादी मधुर रसात्मक पदार्थ दाखवले जातात.


फळांनी, फळरसांनी शरीराचे प्रीणन होते व शरीर-मनामध्ये लाघवता उत्पन्न होते. शरीर-मन उत्साही बनते. नवरात्रीच्या काळात गहू, तांदूळ, नाचणी इत्यादी पारंपरिक धान्यांच्या जागी वरीचा तांदूळ, राजगिऱ्याचे पीठ, सिंघाड्याचे पीठ सेवन केले जाते. ही धान्ये पचायला हलकी व पोषक तत्त्वांनी भरलेली असतात. या पीठांचा वापर चपात्या, पुऱ्या, पकोडे बनवण्यासाठी केला जातो, जेणेकरून उपवासाच्या वेळी पोटभर पर्याय बनतो. या काळात वरीचा भात, राजगिऱ्याचा उपमा, सिंगाड्याच्या पिठाचे थालीपीठ, वरईचा डोसा, इडली, राजगिऱ्याचे लाडू, चिक्की, राजगिऱ्याची भाजी, भोपळ्याची भाजी, सूप असे अन्नपदार्थ सेवन केले जातात.


नवरात्रीचा उपवास म्हणजे सात्त्विक आहार आणि भाज्यांचा त्यात मोठा वाटा असतो. बटाटे, रताळे, भोपळा, राजगिरे यांसारख्या भाज्यांचे या काळात सेवन केले जाते. या भाज्या भरपूर फायबरयुक्त, जीवनसत्त्वे असलेली, कार्बोहायड्रेट्स आणि ॲन्टी-ऑक्सिडन्ड असलेली असतात. यांच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते. शरीराला पाण्याचे योग्य प्रमाण लाभते. त्याचप्रमाणे हा आहार सात्त्विक स्वरूपाचा असल्याने कमीत कमी मसाल्यांनी शिजवला जातो.


बदाम, अक्रोड, शेंगदाणा, मखनासारखा सुका मेवा, बियादेखील उपवासात उर्जेची पातळी राखण्यासाठी उत्तम स्रोत आहेत. ते निरोगी चरबी (फॅट्स), प्रथिने आणि फायबरने समृद्ध असतात, म्हणून ते उपवासाच्या पदार्थांमध्ये उत्कृष्ट नाश्ता ठरतात. गूळ, शेंगदाणे, चिक्की स्वरूपात यांचे सेवन करता येते. बदाम, अंजीर, मनुका, खजूरसारखा सुकामेवा रात्री भिजत घालून दुधाबरोबर सेवन करावा. याने शरीरशक्ती टिकून राहते व मृदुविरेचनही होते.


नवरात्रीमध्ये नेहमीच्या मिठाच्या जागी रॉक मीठ किंवा सैंधव नमन वापरतात. हे प्रक्रिया न केलेले असते. त्यात कोणतेही पदार्थ नाहीत आणि सात्त्विक आहारानुसार अधिक नैसर्गिक आणि शुद्ध आहे. रॉक मिठामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करते; विशेषतः उपवासाच्या वेळी जेव्हा हायड्रेशन आणि खनिज संतुलन महत्त्वपूर्ण असते.


आहाराबरोबर या काळात शोधनोपक्रमालाही महत्त्व असते. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे पित्त प्रकोपामुळे या काळात विरेचन अपेक्षित आहे. शास्त्रशुद्ध वैद्याकडून विरेचन करून घ्यावे किंवा वैद्याच्या सल्ल्याने रोज मृदुविरेचन घ्यावे. यासाठी आरग्वध, मनुका, आमलकी, त्रिवृत्त, दुधासारखे मृदू विरेचन रोज घ्यावे.
दिनचर्येत सांगितल्याप्रमाणे रोज अभ्यंग करावे. अभ्यंगाने शरीरधातूंची शक्ती वाढते. शरीर कणखर बनते. डोळ्यांचे आरोग्य सुधारते. झोप शांत लागते.
शारीरिक शक्तीबरोबर मानसिक-आध्यात्मिक आवाहनाचा हा उत्सव. उपासनेने अग्नी प्रकट करण्याचा व सावकाश सावकाश वाढवत नेण्याचा हा मार्ग. म्हणूनच घटस्थापनेपासून या नवरात्राची सुरुवात होते.


सृजनाची आठवण राहावी म्हणून धान्य पेरले जाते. शक्तीचे स्वरूप सुचवण्यासाठी फुलांची माळ टांगली जाते. सूर्य ही प्रकाशाची देवता. प्रकाश म्हणजे अग्नी. या उपासना सुचवण्यासाठी नऊ दिवसांपर्यंत 24 तास नंदादीप तेवत ठेवला जातो.
होम, हवन, अन्नदान, मंत्रोच्चारण, स्तोत्रपठण इत्यादी गोष्टी केल्या जातात. गरबा, रिंगण नृत्य केले जातात व मध्यभागी दीप ठेवला जातो. यामुळे शरीरातील षड्रिपूंचा नाश होतो. चला तर मग सगळी मरगळ झटकून आपण ‘शक्ती’ची उपासना करू…