एनडीए सरकारने काही दिवसांपूर्वीच 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणारे व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदी राहण्याच्या कार्यकाळाला मागे टाकले आहे. भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविल्याबद्दल नरेंद्र मोदींचे काल केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदन करण्यात आले. तसेच एनडीएच्या बैठकीत 35 घटक पक्षांकडूनही त्यांचा गौरव करण्यात आला.
नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर 2024 साली सलग तिसऱ्यांदा ते या पदावर आरूढ झाले. नरेंद्र मोदी यांनी तब्बल 4,399 दिवस पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम केला आहे. भारताचे माजी पंतप्रधान नेहरू 4,398 दिवस पंतप्रधानपदावर होते.
‘भारत मंडपम’ येथे आयोजित एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान पदावर 4,399 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. एनडीए सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाच्या पूर्ततेनिमित्त ‘भारत मंडपम’ येथे आयोजित बैठकीत पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळाचे कौतुक करणारा अभिनंदन ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मांडला आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी त्याला अनुमोदन दिले.
या बैठकीला भाजप-एनडीएची सत्ता असलेल्या 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेते या बैठकीला उपस्थित होते. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या बैठकीला हजेरी लावली.
या बैठकीला संबोधित करताना मोदी म्हणाले, 12 वर्षांनंतर देशाला काँग्रेसच्या दुष्टचक्रातून मुक्ती मिळाली. या घातक संस्कृतीला ‘काँग्रेस ग्रोथ रेट’ (काँग्रेसचा विकास दर) म्हणून ओळखले जात असे. त्यात सुशासन, धोरण, योग्य हेतू आणि निर्णयक्षमतेचा अभाव होता. अपयश काँग्रेसचे होते, तरीही त्याचा डाग हिंदू लोकसंख्येवर लावला गेला. आमच्यासाठी पक्षापेक्षा राष्ट्र नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. आम्ही ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने काम करतो, असेही मोदी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित एनडीएच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सहभाग घेतला. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. तसेच या बैठकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगोप) अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल सहभाग घेतला.

