नम्र कर्मयोगी भक्त

0
30
 • – डॉ. सीताकांत घाणेकर

योगसाधना : ५५१, अंतरंगयोग : १३६

ही प्रार्थना आमच्यासारख्या सामान्यांना अत्यंत बोधदायक आहे. आश्‍वासन देणारी आहे. मुख्य मुद्दा म्हणजे, आपण रात्री अशी क्षमा मागतो, पण त्यात प्रामाणिकपणा हवा नाहींतर रात्री अशी प्रार्थना म्हटली व परत त्याच चुका, तेच अपराध केले तर कोणता देव क्षमा करील?

भारतीय संस्कृतीचे स्थान विश्‍वामध्ये उत्युच्च आहे. आपल्या ऋषी-महर्षींनी, संत-महापुरुषांनी विश्‍वाचा, जीवनाचा सखोल अभ्यास केला. त्यावर चिंतन-मंथन केले आणि तशा तर्‍हेने आपली ही संस्कृती घडत गेली. मानवाच्या विविध समस्यांमध्ये मार्गदर्शक ठरली.

आपल्या संस्कृतीमध्ये मानवी संस्कारांना फार महत्त्व आहे. आणि हे संस्कार आत्मा गर्भावस्थेत असताना सुरू करायचे असतात. म्हणून योगसाधनेमध्ये ‘गर्भसंस्कार’ गर्भवती महिलांसाठी एक वेगळा विषय आहे.
गर्भसंस्काराची उत्कृष्ट उदाहरणे म्हणजे-
१) भक्त प्रल्हाद ः हा उच्चकोटीचा विष्णुभक्त. त्याचे वडील राक्षस कुळातले हिरण्यकश्यपू व भगवान विष्णूचे शत्रू; तर त्याची आई कयादू फार मोठी विष्णुभक्त. तिचे गुरू महर्षी नारद- तेदेखील विष्णुभक्त. त्यामुळे गर्भावस्थेतच बाळ प्रल्हादावर तसे संस्कार झाले. तो विष्णूला आपले आराध्य मानू लागला.
२) अभिमन्यू ः चक्रव्यूहात कसे शिरायचे याचे ज्ञान म्हणे त्याला अर्जुन सुभद्रेला सांगताना मिळाले.
भारतीय संस्कृतीमध्ये जन्मानंतर विविध संस्कारविधी आहेत, तिथे हे सर्व संस्कार आपोआप मिळतात. विविध प्रार्थना, स्तोत्रे, महाकाव्ये… यांच्या रूपाने.

आपण करदर्शनावर विचार व चिंतन करीत आहोत. करदर्शनावरच्या छोट्याशा प्रार्थनेमध्ये आत्मगौरव आपोआपच रुजतो. त्याचबरोबर आद्य शंकराचार्यांचे ‘निर्वाणषट्‌क’ नियमित म्हटले की ‘मी चिद्ानन्दरूप शिव आहे’ हे पटते.
प. पू. पांडुरंगशास्त्री यांच्या वैश्‍विक स्वाध्याय परिवारामध्ये हे ‘षट्‌क’ प्रात:काली प्रात:प्रार्थना म्हणून म्हटले जाते. त्यामुळे प्रत्येक आत्म्याला प्रेरणा मिळते. तो सत्कर्मे करायला प्रवृत्त होतो.
तशीच त्यांची तिन्हीसांजी म्हणायची प्रार्थना आहे. तीदेखील मानवी जीवनाचा वेगळा पैलू समजावते.
अविनयमपनय विष्णो
दमय मन: शमय विषयमृगतृष्णाम्‌|
मूतदयां विस्तारय
तारय संसारसागरत:॥

 • ‘हे भगवान विष्णो! माझा उध्दटपणा नाहीसा कर, माझ्या उच्छृंखल मनाचे दमन कर.
  विषयांबद्दल असलेली तृष्णा शांत कर. प्राणीमात्रांबद्दल माझ्या मनातील दयाभाव वृद्धिंगत कर. या संसारसागरातून मला तारून ने.’
  खरेच, या चार ओवीत आपल्या जीवनाचे महान तत्त्वज्ञान आहे-
  १) आपण भगवान विष्णूंना शरण जातो.
  २) आपला उद्धटपणा नाहीसा कर असे मागतो. हे अत्यावश्यक आहे. कारण भक्तीमुळे अहंकार वाढतो आणि नराचा नराधम होऊ शकतो. शिवभक्ताचा रावण होऊ शकतो. हिरण्यकश्यपू होतो. ज्ञानाचादेखील अहंकार मनावाला मदोन्मत्त बनवतो. इथेदेखील वेदशास्त्रपारंगत रावणाचे उदाहरण घेता येते.
  ३) माणसाचे मन कसे उच्छृंखल बनून माकडासारखे स्वत:चे व इतरांचे नुकसान करू शकते, याची जाणीव इथे होते.
  ४) विषयांबद्दल तृष्णा असणे हा मानवी मनाचा सहज स्वभाव आहे. त्यामुळे ती तृष्णा शांत करण्यासाठी भगवंताची प्रार्थना हवी.
  ५) प्राणीमात्रांबद्दल मनातील दयाभाव वृद्धिंगत करणेदेखील अत्यावश्यक आहे. कारण आज सगळीकडे षट्‌रिपूंचेच भयानक दर्शन होते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर… सर्व तर्‍हेची हिंसा पुष्कळ वाढलेली आहे.
  ६) शेवटी म्हटले जाते- ‘या संसारसागरातून मला तारून ने.’ हेच तर मानवी जीवनाचे ध्येय आहे.
  या सुरुवातीच्या श्‍लोकानंतर सहा श्लोक (षट्‌पदी) घेतले जातात, जिथे लक्ष्मीपती भगवंताच्या चरणकमलांना नमस्कार आहे. तसेच विविध विष्णू अवतारांचे गुणगान आहे.
  अशी ही ‘षट्‌पदी’ तिन्हीसांजेला भावपूर्ण रीतीने अर्थ समजून म्हटली की मन शांत होते.
  त्यानंतर झोपण्याच्यावेळीदेखील चांगले श्लोक आहेत-
  त्वमेव माता च पिता त्वमेव
  त्वमेव बन्धुश्‍च सखा त्वमेव|
  त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
  त्वमेव सर्वं मम देवदेव॥
 • हे देवाधी देवा! तूच माझी आई, तूच माझा पिता, तूच माझा भाऊ, तूच मित्र, तूच विद्या, धन आणि तूच माझे सर्वस्व आहेस.
  येथेदेखील मोठे मार्गदर्शन तत्त्वज्ञान आहे-
  १. आपण म्हणतो की भगवंत माझी माता-पिता, भाऊ-सखा आहे. तसेच त्याला आपण करुणामयदेखील म्हणतो. कल्याणकारी म्हणतो. याचा अर्थ, हे सगळे चांगले गुण माझ्यातदेखील हवेत. तेच येथे अभिप्रेत आहे. म्हणून शब्दार्थांबरोबर भावार्थ, गर्भीतार्थ समजणे गरजेचे आहे.
  २. ‘तूच माझी विद्या, धन आणि सर्वस्व आहेस’ असे आपण सहज न समजता म्हणतो.
  आपल्या तत्त्ववेत्त्यांना हे माहीत आहे. आपल्याकडून चुका घडतच राहणार म्हणून आणखी एक श्‍लोक-
  करचरणकृतं वाक्‌कायजं कर्मजं वा
  श्रवणनयनजं वा मानसं वाऽपराधम्‌|
  विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व
  जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो॥
 • हात, पाय, वाणी, शरीर, कर्म, कान, नाक, डोळे, मन यांच्याद्वारे कळत-नकळत जे योग्य-अयोग्य अपराध मी केले असतील, त्या सर्व अपराधांची हे करुणासागरा महादेवा! तुम्ही मला क्षमा करा. तुमचा जयजयकार आहे.

ही प्रार्थना आमच्यासारख्या सामान्यांना अत्यंत बोधदायक आहे. आश्‍वासन देणारी आहे. मुख्य मुद्दा म्हणजे, आपण रात्री अशी क्षमा मागतो, पण त्यात प्रामाणिकपणा हवा नाहींतर रात्री अशी प्रार्थना म्हटली व परत त्याच चुका, तेच अपराध केले तर कोणता भगवान क्षमा करील? भगवंत त्रिकालदर्शी आहे. त्याला मानावाच्या मनातील भाव नक्की माहीत आहे. येथे आपण धूर्त बनण्याचा प्रयत्न केला तर नुकसान आपलेच होईल.
भारतीय साहित्यात छोटी-छोटी बोधवाक्येदेखील हृदयगम्य आहेत. उदा. पती परमेश्‍वर- दोनच शब्द, पण अत्यंत अर्थपूर्ण येथे हा उपदेश पती-पत्नी दोघांसाठी आहे. पतीने परमेश्‍वरासारखे वागायला हवे तरच पत्नी त्याचा मान राखील. पतीची जबाबदारी प्राथमिक व मुख्य आहे. ‘वैद्यो नारायणो हरि:’ – वैद्य देवासारखा, नारायण हरीसारखा आहे. म्हणून प्रत्येक वैद्याने म्हणजे डॉक्टराने त्याप्रमाणे परमेश्‍वराच्या दिव्य गुणांचे दर्शन द्यायला हवे.
ही अशी सर्व स्रोत्रे, बोधवाक्ये नियमित अर्थपूर्ण, भावपूर्ण रीतीने म्हटली तर मानवाच्या जीवनाला वेगळेच वळण मिळेल.
यासंदर्भात पूजनीय पांडुरंगशास्त्री सांगतात ः ‘आपली संस्कृती मानवजीवनात सुंदर समन्वय साधते. हा समन्वय जर न साधला तर कर्तृत्वहीन ‘भगत’ आणि क्रियाशील अहंकारी ‘राक्षस’ निर्माण होतील. भारतीय संस्कृतीने नम्र कर्मयोगी भक्त पैदा केले हेच तिचे वैशिष्ट्य आहे.’
शास्त्रकार म्हणूनच म्हणतात- ‘विद्या विनयेन शोभते|’ भगवान कृष्ण गीतेत सांगतात-
‘नहि ज्ञानेन संदृशं पवित्रमिह विद्युते|’ -ज्ञानासारखे आणखी काही पवित्र नाही. आपल्या योगसाधकांना हे सर्व ज्ञान आहेच, व त्याप्रमाणेच ते आचरण करत असतील.
(संदर्भ – प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले- ‘संस्कृती पूजन’)