नटवर्य प्रभाकर पणशीकरांमुळे नाट्य रंभूमी श्रीमंत

0
3

>> प्रसिद्ध नाट्यकर्मी डॉ. अजय वैद्य यांचे प्रतिपादन

>> पेडणे येथे पणशीकर स्मृती महोत्सवाचे उद्घाटन

रंगभूमीसाठी प्रभाकर पणशीकर यांचे योगदान मोठे होते. शेवटपर्यंत त्यांनी रंगभूमीची सेवा केली. त्यांनीच रंगभूमी श्रीमंत केल्याचे गौरवोद्गार प्रसिद्ध नाट्यकर्मी डॉ. अजय वैद्य यांनी पेडणे येथे काढले. नटवर्य प्रभाकर पणशीकर स्मृती महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
नटवर्य प्रभाकर पणशीकर स्मृती महोत्सव आयोजन समिती आणि गोवा मराठी अकादमीने श्री भगवती मंदिराच्या प्रांगणात या महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर पं. रघुनंदन पणशीकर, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रवीण कोटकर, गोवा मराठी अकादमी पुणे विभागाचे अध्यक्ष चंद्रकांत सांगळे, नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या सुकन्या जान्हवी पणशीकर, तरंगिणी खोत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. सामंत यांनी सांगितले, की एका तपानंतर नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या निधनानंतर हा नाट्यमहोत्सव या ठिकाणी आयोजित केला जात आहे. आयोजन समितीने पणशीकर कुटुंबीयांना एकाच व्यासपीठावर आणून नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. आता पणशीकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी प्रत्येक गोमंतकीय नाट्यकलाकारांनी दिवे लावून ही ज्योत कायमची टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरून त्यांचा आदर्श घेऊन गावागावांत नवीन कलाकार निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या सुकन्या तरंगिणी खोत यांनी सांगितले, की बाबांनी कधी आपल्या मुलांकडे लक्ष दिले नाही. परंतु अगोदर नाटक आणि नाट्य कला जोपासण्यावर भर दिला. आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या जन्मगावी हा महोत्सव होत असल्याने आणि कुटुंबीयांना आमंत्रित केले असल्याने अत्यानंद होत आहे. भविष्यात त्यांच्या स्मृती अजरामर व कायमस्वरूपी ठेवण्यासाठी पेडणे तालुक्यात एखादे स्मारक उभारण्याचा विचार झाल्यास पूर्ण योगदान दिले जाईल अशी त्यांनी ग्वाही दिली.

यावेळी नाट्यप्रवेश, नाट्यसंगीत, स्वगत, आठवणी आणि किस्से या माध्यमातून पणशीकरांच्या स्मृती जागवण्यात आल्या. अशोक जोशी, चारुदत्त आफळे, रघुनंदन पणशीकर, क्षमा वैद्य, सुचेता अवचट, प्रतिभा कुलकर्णी, चित्रा साठे, स्नेहा परांजपे, कल्याणी जोशी, शिल्पा कोयंडे, ज्योती ब्रह्मे, विणा कट्टी, तरंगिणी खोत, रोहिदास परब आणि हेमंत किरकर आदींनी नाट्य रसिकांसमोर ‘एक उत्कृष्ट कहाणी पणशीकरांची’ ही मेजवानी सादर करून रसिकांची मने जिंकली.

यावेळी रंगभूमीसाठी योगदान दिलेल्या पेडणे तालुक्यातील ज्येष्ठ नाट्य कलाकारांचा गौरव करण्यात आला. चंद्रकांत कोटकर, आनंद चणेकर, सुरेश बांदेकर, विठ्ठल परब, मुरारी म्हामल, विलास परब तर भानुमती मालपेकर यांचा सत्कार त्यांचे चिरंजीव कल्याण मालपेकर यांनी स्वीकारला. सत्कार मूर्तींना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सुरूवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रशांत मांद्रेकर यांनी सूत्रसंचालन केले. राजमोहन शेट्ये यांनी पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत केले. तर व्हायकाउंट हायस्कूलचे मुख्याध्यापक राजू बोंद्रे यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला.

जान्हवी पणशीकर यांची आज
प्रकट मुलाखत व नाट्यप्रयोग

सोमवार १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ नाट्यकलाकार व निर्मात्या जान्हवी पणशीकर यांची प्रकट मुलाखत नीलेश नाईक घेतील. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता श्री साई कला मंडळ, सांगोडा प्रस्तुत ऐतिहासिक नाटक ‘इथे ओशाळला मृत्यू’ सादर होईल. वसंत कानेटकर लिखित या नाटकाचे दिग्दर्शन अविनाश पुर्खे यांनी केले आहे. सहाय्यक दिग्दर्शक दत्ताराम ठाकूर, नेपथ्य – राजमोहन शेट्ये, पार्श्वसंगीत – नीलेश नाईक सांभाळतील. यात अविनाश पुर्खे, दत्ताराम ठाकूर, प्रशांत वझे, नूतन रेवोडकर, प्रेमानंद कलशावकर, पांडुरंग परब, नारायण हिरोजी, गुणाजी परब, बाबली कंडोळकर, दादू पार्सेकर, राजेंद्र भाईप, प्रमोद पुर्खे, कालिदास तुयेकर, अक्षय पुर्खे, राजन नाईक व विजय बर्डे हे कलाकार भाग घेतील. यावेळी प्रभाकर पणशीकर यांचा नाट्यप्रवास दर्शवणारे फोटो प्रदर्शन खास आकर्षण असेल. दोन दिवस चालणार्‍या या महोत्सवाला नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून महोत्सव यशस्वी करावा असे आयोजन समितीने आवाहन केले आहे.