नजर पीओकेवर

0
11

आपले जे बंधू भौगोलिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या आमच्यापासून विलग झालेले आहेत, ते कधीतरी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून भारताच्या मुख्य प्रवाहात नक्कीच परततील” अशी भविष्यवाणी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी काल एका कार्यक्रमात केली. त्यांचा रोख अर्थातच पाकव्याप्त काश्मीरकडे होता. काश्मीरचा जो भाग पाकिस्तानने आपल्या ताब्यात ठेवला आहे, तो पुन्हा भारतात सामील करण्याचा निर्धार व्यक्त करण्याची मोदी सरकारची ही काही पहिली वेळ नाही. ह्यापूर्वी देखील वेळोवेळी तो निर्धार व्यक्त झाला आहे. काश्मीरवर चर्चा करायची असेल तर ह्यापुढे केवळ पीओकेवर होईल ही भूमिका सरकारने मांडली आहे. बैसरान हल्ल्यानंतर जे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले गेले, त्याची इतिश्री पाकव्याप्त काश्मीर परत मिळवूनच होणार असे आशादायक चित्र देशात निर्माण झाले होते, परंतु अमेरिकेने डोळा वटारताच आपली धडक कारवाई आवरती घेऊन भारताने संघर्ष टाळला. मात्र, ‘ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही ही सरकारची भूमिका आहे आणि यदाकदाचित पुन्हा भारताची कुरापत काढण्याचा दहशतवाद्यांनी प्रयत्न केला, तर पुन्हा ही प्रत्युत्तराची कारवाई सुरू होऊ शकते असा इशाराच जणू त्यातून सूचकपणे दिला गेला आहे. आपले लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी नुकतेच आपले गुरू आचार्य रामभद्राचार्य यांच्या दर्शनास गेले. रामभद्राचार्यांनी त्यांच्याकडे ‘पाकव्याप्त काश्मीर’ची गुरूदक्षिणा मागितली आहे! एक योगायोग म्हणजे हेच उपेंद्र द्विवेदी लष्करप्रमुख बनण्यापूर्वी जेव्हा लष्कराच्या उत्तरी कमांडचे प्रमुख होते, तेव्हा ‘सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे’ असे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. पुढे केंद्रीय मंत्री बनलेले माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी देखील ‘पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात सामील होईल, थोडी प्रतीक्षा करा’ असे सांगितले होते. भारताच्या नकाशामध्ये मुकूटमणीसारखा शोभून दिसणारा अर्धाअधिक भाग प्रत्यक्षात पाकिस्तानच्या ताब्यात आहे. नकाशात तो भारताच्याच ताब्यात असल्यासारखा दाखवला जातो, कारण तो भूभाग मुळात भारताचा आहे आणि तो भाग वगळल्यास नकाशातील भारत मस्तक छाटल्यासारखा दिसू लागेल. जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील विधानसभा मतदारसंघाच्या जागा आजही रिक्त ठेवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात यावे ही संपूर्ण देशाची आस आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तसे ठरावही केलेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘आम्ही जम्मू आणि काश्मीर म्हणतो तेव्हा त्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरही सामील असते’ असे जाहीरपणे सांगून टाकले आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी देखील भारत सरकार व्याप्त काश्मीरच नव्हे, तर गिलगिट – बाल्टिस्थान देखील परत मिळवल्याविना स्वस्थ बसणार नाही असा इशारा पूर्वी दिलेला होता. ह्या सगळ्या विधानांमधून सातत्याने पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा निर्धार व्यक्त होत आला आहे. पाकिस्तान हा मुळात एकसंध देश नाही. पंजाब, सिंध, गिलगिट – बाल्टिस्थान, बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा अशा वेगवेगळ्या भिन्न संस्कृतींचे ते एक जबरदस्तीने केलेले कडबोळे आहे. राजसत्तेवर सदैव पंजाबचा वरच ष्मा राहिला आहे. इतर प्रांतांमध्ये त्यांनी चालवलेले मानवाधिकार हनन आंतरराष्ट्रीय समुदायाने पाहावे असे आवाहन भारत सरकारने मध्यंतरी केलेले होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये देखील तेथील मूळ शिया मुसलमानांची संख्या कमी करण्यासाठी सुन्नींच्या वसाहती वसवल्या जात राहिल्या आहेत. मूळ काश्मीर संस्थान दोन लाख बावीस हजार 236 चौरस किलोमीटरचे होते. सध्याचे काश्मीर आपल्या ताब्यात आहे ते केवळ सोळा हजार चौरस कि. मी. चे आहे. त्याच्या सहापट भाग आजही पाकिस्तानच्या ताब्यात आहे. पाकव्याप्त काश्मीरचाच विचार केला, तर तो जवळजवळ तेरा हजार 297 चौरस कि. मी. चा प्रदेश आहे. भारतात घातपात घडवण्यासाठी दहशतवादी तळ तेथेच उभारले जात राहिले आहेत. सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताने आपण नियंत्रण रेषा पार करून शह देऊ शकतो हे दाखवून दिले होते. बालाकोटची कारवाई त्याहीपुढे गेली आणि आता ‘ऑपरेशन सिंदूर’ने तर दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे यांच्यासाठी पाकिस्तानातील कुठलीही भूमी सुरक्षित नाही हे दाखवून दिले आहे. पाकव्याप्त काश्मीर परत मिळवणे तेवढे सोपे नाही कारण त्यामध्ये चीनचे हितसंबंध गुंतलेले आहेत हे खरे असले, तरी तेथील जनतेमध्ये भारतात सामील होण्याची आस जागविण्याच्या दृष्टीने भारत सातत्याने ही भूमिका मांडत राहिला आहे. कधी ना कधी त्याला फळ येईल अशी आशा करूया.