नक्शा या प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात पणजी महानगरपालिका, मडगाव आणि कुंकळ्ळी नगरपालिका क्षेत्रांमध्ये जमिनीच्या नोंदीची सखोल तपासणी, मालकी हक्कांची पडताळणी आणि आवश्यक डेटाबेस नोंदी अद्ययावत करण्याचे काम 6 जुलैपासून हाती घेतले जाणार आहे.
यासंबंधीची सूचना राज्य सरकारच्या सेटलमेंट आणि भू अभिलेख संचालनालयाने जारी केली आहे. केंद्र सरकारच्या नक्शा या प्रकल्पाचा उद्देश प्रगत द्रोन आणि जिओस्पेशियल तंत्रज्ञानाचा वापर करून शहरी जमिनीच्या नोंदींचे आधुनिकीकरण करणे हा आहे. सेटलमेंट आणि भू अभिलेख संचालनालयाकडून हा प्रकल्प तीन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर राबविला जात आहे.
या तीनही भागातील जमिनीची प्रत्यक्ष पडताळणी आधीच पूर्ण झाली आहे. आता पुढील टप्प्यात जमिनीच्या नोंदींची सखोल तपासणी, मालकी हक्कांची पडताळणी आणि आवश्यक डेटाबेस नोंदी अद्ययावत करणे यांचा समावेश आहे. या विभागातील सर्व जमीनमालक आणि संबंधित घटकांना त्यांच्या स्थानिक कार्यालयांमध्ये आयोजित पडताळणी सत्रांना उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
मालमत्तेच्या मालकीशी संबंधित सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. जर एखाद्या जमिनीबाबत अपील, कायदेशीर आव्हान किंवा दिवाणी खटला प्रलंबित असेल, तर पुढील कार्यवाही न्यायालयाच्या किंवा सक्षम प्राधिकरणाच्या अंतिम आदेशांनुसारच केली जाईल. नोंदी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे; त्यामुळे या क्षेत्रांतील सर्व रहिवाशांना सहकार्य करण्याचे आणि वेळेवर पडताळणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
पणजी पालिका व तिसवाडी
तालुक्यात आजपासून प्रारंभ
पणजी नगरपालिका क्षेत्र आणि तिसवाडी तालुक्यातील गावांसाठी, पडताळणी प्रक्रिया 6 जुलै ते 27 जुलै 2026 या कालावधीत पणजी येथील निरीक्षक, सेटलमेंट आणि भू अभिलेख संचालनालय-पणजी येथे पार पडेल. त्याच वेळी, मडगाव आणि कुंकळळी नगरपालिका क्षेत्रांसाठी ही प्रक्रिया 16 जुलै ते 14 ऑगस्ट 2026 या कालावधीत फातोर्डा येथील सेटलमेंट आणि भू अभिलेख संचालनालय कार्यालयात येथे होणार आहे.

