नंदिनी डेअरीच्या तुपात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

0
18

बंगळुरूमधील नंदिनी डेअरी पार्लरमध्ये बनावट तुपाचा पुरवठा करणारे एक टोळी उघडकीस आली असून, अधिकृत वितरकाच्याच माध्यमातून चालणारे हा प्रकार कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी समोर आणला आहे.
या चौकशीत उघड झाले की, हा गट तामिळनाडूमध्ये भेसळयुक्त तूप तयार करत होता. हे तूप नंदिनीचे बनावट सॅशे व प्लास्टिक बाटल्यांमध्ये भरले जात असे आणि नंतर ते बंगळुरूमधील अधिकृत परवानाधारक वितरकांकडे पाठवले जात असे. हे वितरक मग ते तूप घाऊक दुकाने, किरकोळ दुकाने आणि नंदिनी पार्लरना मूळ बाजारभावानेच विकत होते.

हा घोटाळा तेव्हा उघड झाला, जेव्हा कर्नाटक मिल्क फेडरेशन (केएमएफ) च्या अधिकाऱ्यांना त्यांच्या एका वितरकाच्या ऑर्डरमध्ये संशयास्पद बदल दिसून आला. महेंद्र नावाचा अधिकृत केएमएफ डीलर नियमितपणे मोठ्या प्रमाणात तुपाची ऑर्डर देत असे; पण गेल्या काही महिन्यांपासून त्याने 100 लिटरच्या ऐवजी फक्त 50 लिटर ऑर्डर देणे सुरू केले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली.
तपासणीदरम्यान वास्तविक कारण उघड झाले. मुख्य आरोपी महेंद्र हा अस्सल नंदिनी तुपात पाम तेल आणि इतर चरबी मिसळून भेसळ करीत होता. एका लिटर खऱ्या तुपाचे पाच लिटर भेसळयुक्त तुपात रूपांतर केले जात होते. हेच तूप नंदिनी पार्लरमध्ये मोठ्या प्रमाणात पुरवले जात होते.
गुप्त माहितीच्या आधारे सिटी क्राईम ब्रँच (सीसीबी) स्पेशल इन्व्हेस्टिगेशन स्क्वॉड आणि केएमएफच्या दक्षता विभागाने ही संयुक्त कारवाई केली. शुक्रवारी, पथकांनी चामराजपेट येथील महेंद्र आणि त्याच्या कुटुंबाच्या मालकीच्या कृष्णा एंटरप्रायझेसशी संबंधित गोदामे, दुकाने आणि मालवाहतूक वाहनांवर छापे टाकले. तसेच भेसळयुक्त तूप वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आले आणि चालकाला अटक करण्यात आली.