नंदनवन

0
4
  • मीना समुद्र

बाळाच्या त्या निर्भर हास्यात ती आई आपलेही हास्य मिसळते. आनंदाने आनंदाची लागण होते. बाळ चालू लागते तेव्हा आईला आनंदाने जणू पंख फुटतात. आणि बाळाला वाचा फुटते आणि ते पहिल्यांदा ‘आई’ उच्चारते तेव्हा पवित्र गंगास्नान घडल्यासारखे त्या आईला वाटते.

कृष्णाष्टमी जवळ आली म्हणून नव्हे; पण एरव्हीही छोट्या बाळांचे अगदी जन्मल्यापासूनचे ते 3-4 वर्षांपर्यंतचे फोटो आणि व्हिडिओ वेगवेगळ्या लीला दाखवणारे व्हॉट्सॲपवर पाहायला मिळतात. जन्मतःच मिचीमिची डोळे उघडून पाहणारे, भोकरी डोळे आणि गुबगुबीत गालातून हसणारे, गुलकंदी गुलाबाच्या रंगाचे तळहात-तळपाय असणारे, बोळकं पसरून हसणारे, छान गुरगटून उबेत गाढ झोपून गालात हसणारे, आंघोळ करणारे, बाबांनी पाण्यात टाकल्यावर सहजगत्या पोहणारे, भुकेले ‘आ आ’ करणारे, भरवलेले अर्धे सांडत अर्धे खाणारे, कुणी स्वतःच्या हाताने खाण्यासाठी हट्ट करणारे, फुर्रर्र करून तोंडातली लाळ उडवत तिची मजा घेणारे, गाणे ऐकून ओठ हलवणारे, घशातून नाना तऱ्हेचे आवाज काढणारे, कपाळाला-गालाला काजळतिटी लावलेले, हातपाय भराभर हलवून व्यायाम करणारे, कुणी पडल्या-पडल्या चुळबुळ करणारे, कुणी ढेरपोटे, कुणी किंचित आवाज झाला की झटकन मान वळवून पाहणारे, टाळ्या वाजवणारे, त्या आवाजाने आनंदून आणखी टाळ्या वाजवणारे, मऊमऊ गालिचावर- गादीवर गडाबडा लोळणारे, गालात खळ्या पाडीत हसणारे, पक्ष्यांबरोबर- कुत्र्यामांजराबरोबर आणि मऊ, खडबडीत कशाही खेळण्यांनी खेळणारे, क्वचित रुसणारे, क्वचित रडणारे, फारच क्वचित गंभीर वाटणारे, गाण्याच्या तालावर पाय नाचवणारे, छुम्‌‍छुम्‌‍चा आवाज करीत घरभर पळणारे, लपाछपी खेळणारे, कुकूक करणारे, तोंडावरचे गुरफटलेले पांघरूण काढणारे बाळ, जुळी कुशीवर वळणारी एकमेकांकडे पाहून खदखदणारी, आईबाबांच्या बोलण्याला हुंकार देणारी, गाय-हत्ती अशा प्राण्यांच्या कुशीत निर्धास्तपणे झोपणारी, त्यांच्या पोटावर चढणारी, आईचा गाल चाटणारी अशी किती किती बाळं आणि त्यांची बाळरूपं… त्यांची लीलाकौतुकं पाहताना मनाला अतिशय आनंद आणि आल्हाद वाटतो.

प्राण्यांनाही बाळाचा स्पर्श कळत असावा. शांतपणे ते पहुडलेले असतात. बाळाच्या हालचालींनी क्वचित शिंगे उभारतील, लाथ मारतील म्हणून आपल्यालाच भीती वाटते. एका व्हिडिओत तिरकस स्टॅण्डला लावलेल्या तिरकस पाळण्यात झोपलेले बाळ वरून लोंबत्या दुधाच्या बाटलीचं बूच तोंडात धरून पीत होते. आणि जवळच्या तशाच पाळण्यात एक सुंदर मांजरही टुणकन्‌‍ उडी मारून झोपली आणि तिने उताणे झोपून आपल्या बाटलीचे बूच तोंडात धरले. दुसऱ्या व्हिडिओत एक अंगठ्याएवढा छोटू बाबांना ताप आलेला पाहून त्यांना स्वस्थ झोपू दे म्हणून नाकावर बोट ठेवून आपल्याला शूःऽऽक करतो आणि बाथरूमचा नळ सोडून थंड पाण्याने बाबांचे तोंड पुसतो. त्यांच्या पायातले मोजे काढून व्यवस्थित चपलात घालून जागेवर ठेवतो. त्यांचे पाय पुसून घेतो. त्यांचा सोफ्यावरून खाली आलेला पाय वर उचलून ठेवतो. त्यांना आपले छोटुकले पांघरूण घालून- त्यांच्या शेजारी स्टुलावर बसून- त्यांच्या हातावर डोके ठेवून पडून राहतो. त्याच्या प्रत्येक इवल्या-इवल्या कृतीतून आणि लुटुलुटु चालण्यातून बाबांबद्दलची काळजी, प्रेम आणि त्याची आई कदाचित कामावर गेली असेल त्यामुळे त्याला आतून जाणवणारी जबाबदारीची जाणीव दिसते. बाळांच्या, बालकांच्या अशा नंदनवनातून पाय निघत नाही. डोळे थकत नाहीत.

एखाद्या बाळाचा जन्म म्हणजे स्त्रीजीवनाचेच नव्हे तर मानवी जीवनाचेच सार्थक! शिरीष पैंसारखी लेखिका, कवयित्री आपल्या एका कवितेत अशा प्रकारे व्यक्त होते-
बाळ जन्मले तेव्हा
मीही फिरून जन्मले
बाळ स्तनाला ओढी
तेव्हा भरती झाले
बाळ प्रकाशा पाही
तेव्हा डोळे माझे दिपले
बाळ हसू लागला
मीही नव्याने हसले
बाळ लागता चालू
पंख मला तर फुटले
बाळ म्हणाले ‘आई’
मी गंगेत न्हाले!!
बाळाच्या जन्माबरोबर आईचाही नवा जन्म होतो आणि बाबा-आई, आजोबा-आजी, मामा-काका-आत्या-मावशी, दादा-ताई अशी अनेक नवी नाती निर्माण होतात. पण बाळाचा जन्म म्हणजे आईचा पुनर्जन्म असे म्हणतात. मोठ्या कष्टाने आणि जबाबदारीने नऊ महिने उदरी वाढविलेला तो जीव जगात येतो तेव्हा ती अत्यंत आनंदाची गोष्ट असते. बाळ स्तनपान करू लागल्यावर मातेला आणखी दूध फुटते, जणू प्रेमाची भरती येते. ते डोळे उघडते तेव्हा त्याचे नवतेज पाहून मातेचे डोळे दिपतात. बाळाला हळूहळू भुकेपेक्षा वेगळ्या जाणिवा होऊ लागतात. ते हसते. त्या निर्भर हास्यात ती आई आपलेही हास्य मिसळते. आनंदाने आनंदाची लागण होते. बाळ चालू लागते तेव्हा आईला आनंदाने जणू पंख फुटतात. आणि बाळाला वाचा फुटते आणि ते पहिल्यांदा ‘आई’ उच्चारते तेव्हा पवित्र गंगास्नान घडल्यासारखे त्या आईला वाटते. गंगादर्शन आणि गंगास्नान आयुष्यात एकदा तरी घडावे अशी आपली धारणा असते. त्यामुळे बाळाच्या ‘आई’ या शब्दोच्चाराने मनात वात्सल्यगंगा अवतरते. इरावती कर्वेंसारख्या प्रज्ञावंत स्त्रीला ‘बाळाची आई’ अशी ओळख म्हणजे तिच्या जीवनाची ‘परिपूर्ती’ वाटते.

हजारो वर्षांपूर्वी एक माता मात्र याबाबतीत खूप दुर्दैवी ठरली असे वाटत राहते. धुवाधार पाऊस पडत असताना श्रावण कृष्ण अष्टमीच्या मध्यरात्री तिने एका विलक्षण तेजस्वी, गोजिरवाण्या बाळाला कंसाच्या बंदिवासात जन्म दिला; पण त्याला उराशी कवटाळून छातीला लावण्याआधीच तिला त्याच्या संरक्षणासाठी वसुदेवाच्या हवाली करून यमुनापार नंदाघरी पाठवावे लागले. कुठेही असो पण माझे बाळ सुरक्षित असो एवढीच मनीषा उरी बाळगून तिने जिवाच्या कराराने त्याला दूर केले. नंद-यशोदेघरच्या त्याच्या बाललीला ऐकून तिचाही जीव त्याला भेटण्यासाठी, त्याला बघण्यासाठी, उरी कवटाळण्यासाठी कासावीस झाला असेल. नंदाघरी नंदनवन फुलवणाऱ्या त्या मेघश्यामाचे, त्या माधव मुकुंदाचे, त्या गोपाळाचे दर्शन पुन्हा कधी होईल हे सांगता येत नव्हते. पण गोकुळात तो सुरक्षित होता याचेच समाधान मानत तिने दिवस कंठले असतील.

या बाळाच्या बाललीला काय वर्णाव्यात! सूरदासांनी या बाळकृष्णाच्या लीलांचे जे वर्णन दिले आहे त्याला तोड नाही. सवंगड्यांसमवेत दहीदुधाची, लोण्याची मडकी फोडून ती खाणे आणि ‘मैं नहीं माखन खायो’ म्हणत आपले छोटे हात तिथे कसे पोचतील, मी तर रानात गेलो होतो. ग्वालबालांनी हे माझ्या तोंडाला फासलं आहे. घे तुझं कांबळं आणि काठी असं म्हणून कृष्ण रुसला आणि यशोदेच्या कौतुकयुक्त हास्यात सारे विरून तिने त्याला उराशी कवटाळले. बलराम गोरा आणि मी का काळा- असा प्रश्नही त्याच्या बालबुद्धीला पडला. ‘अस्सा कसा देवाचा देव बाई ठकडा, देव एका पायाने लंगडा’ असे त्याचे कौतुक एकनाथांनीही गायिले. त्याची दहीहंडी आणि सर्वसमभावाचा गोपाळकाला, गोवर्धनपूजा, नृत्यगायनाचे कार्यक्रम, जगताला मार्गदर्शन करणारी भगवद्गीता या साऱ्या नंदनवनात आणि तपोवनात विहार करत आपण कृष्णाष्टमी साजरी करून त्याला वंदन करूया!