– अरुण जयराम कामत
साक्षेपी संपादक, संपादकीय कौशल्य असे शब्द वाचनात आले होते, कानावरून गेले होते, पण त्यांचा नेमका अर्थ, उत्कृष्ट संपादकाचं नेमकं काम याची तितकीशी जाणीव नव्हती. मी कॉलेजमध्ये असताना काकांच्या- विश्वचरित्रकोशकार श्रीराम पांडुरंग कामत- डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दोन महिने वाचनाची सक्त मनाई केली होती.
वाचन, आणि तेही वृत्तपत्रीय वाचन हे तर काकांचे प्राण. ज्याप्रमाणे सामान्य माणसास जगण्यासाठी श्वासाची गरज असते, तशीच त्यांना वाचनाची. काकी- गीता कामत- त्यांना वर्तमानपत्रे वाचून दाखवत. पण त्या स्वतः नोकरी करणार्या. शिवाय घरकाम, मुलंबाळं, बाहेरची कामं यामुळे त्यांनाही कमीच वेळ मिळत असे. त्यामुळे काकांनी एक दिवस मला फोन करून दर शनिवार-रविवारी वर्तमानपत्र वाचनासाठी पर्वरीला येण्याचा विनंतीवजा आदेश दिला. ते साधारण १९९४ चं साल असावं.
त्यावेळी त्यांच्याकडे पाच वर्तमानपत्रे येत. गोव्यातील तीन आणि मुंबईहून ‘महाराष्ट्र टाईम्स’ आणि ‘टाईम्स ऑफ इंडिया’ (तत्कालीन मुंबई आवृत्ती). त्या दोन महिन्यांतील दर शनिवारी-रविवारी मी अस्नोड्याहून पर्वरीला काकांच्या घरी जात असे. शनिवारी सकाळी नऊ वाजता आमच्या वाचनाला सुरुवात होत असे. संपूर्ण आठवड्याभरातील सर्व वर्तमानपत्रे काका नीट मांडून ठेवीत असत. आमची सुरुवात गोव्यातील वर्तमानपत्राने होत असे. नंतर मुंबईचा मटा आणि शेवटी टाईम्स. मी मोठ्या आवाजात, पण सावकाश एका-एका बातमीचा मथळा वाचत असे. तो मथळा ऐकून ते ती बातमी वाचायची की नाही ते मला सांगत. ‘हूं, हे वाच!’, ‘हूं, हे पुरे!’, ‘ही खरी बातमी, ही वाच!’, ‘छे! ही तर नुसती भर…’, ‘ही डेस्क न्यूज!’ अशा पद्धतीचे त्यांचे शेरे असत. एखादी बातमी वाचताना सदर बातमी कशा पद्धतीने मांडली असती तर अधिक प्रभावी ठरली असती, दुसरी एखादी बातमी कशी कमीत कमी शब्दांत चांगल्या प्रकारे मांडता आली असती याचे दाखले ते देत असत.
‘‘भर म्हणजे काय हो काका?’’ मी एकदा त्यांना विचारले. ‘‘भर म्हणजे वर्तमानपत्रात जागा भरण्यासाठी छापलेली बातमी!’’ ‘‘आणि डेस्क न्यूज म्हणजे?’’ ‘‘डेस्क न्यूज म्हणजे ऑफिसमध्ये बसून तयार केलेली बातमी.’’ काका सांगत….
वर्तमानपत्राच्या पहिल्या पानापासून ते शेवटच्या क्रीडा पानापर्यंतचे सगळे मथळे मी वाचत असे, आणि ते वाचताना त्यातील कुठली बातमी वाचायची हे ते सांगत. कधीकधी बातमीचा पहिला परिच्छेद वाचून झाल्यावर ‘बरे पुढे… मजकूर कळला. आता दुसरी घे’ असे ते सांगत. टाईम्स ऑफ इंडिया आणि मटामधील संपादकीय पान तर ते अगदी अथपासून इतिपर्यंत वाचून घेत असत. सुविचारापासून ते स्पिकिंग ट्रीपर्यंत. (म.टा.चे तत्कालीन संपादक गोविंदराव तळवलकरांचे ते चाहते होते.)
या वाचनाचा मला झालेला फायदा म्हणजे, वाचनाची नवीन दृष्टी तर प्राप्त झालीच, पण त्याचबरोबर स्पष्ट शब्दोच्चाराचीही सवय झाली. कारण एखादा शब्द चुकीचा उच्चारला तर तो शब्द नीट उच्चारेपर्यंत काका माझ्याकडून घोकून घेत.
ही वाचनिकाची भूमिका पार पाडताना, मी वर उल्लेख केलेल्या साक्षेपी संपादकाचं, एका उत्कृष्ट संपादकाचं नेमकं कार्य काय ते ध्यानात आलं, आणि त्याचबरोबर काकांच्या उच्च दर्जाच्या संपादकीय जाणिवेचं पहिल्यांदा फार जवळून दर्शन घडलं.
लहान असताना कधीही पर्वरीला गेलो तर ते आपल्या कार्यालयात वाचत बसलेले दिसत किंवा लिखाण करण्यात मग्न असत. ते नेमकं काय करतात ते तेव्हा आमच्या ध्यानी येत नसे. पण नंतर जेव्हा कळू लागले- विश्वचरित्रकोश म्हणजे काय, त्याचा आवाका केवढा, त्याची व्याप्ती केवढी- तेव्हा छाती दडपून गेली. आमच्याशी थट्टामस्करी करणार्या, आमच्यात रमणार्या काकांनी केवढे महाकाय काम हाती घेतले आहे याचा हळूहळू उलगडा होऊ लागला.
नंतर जसजशी काकांशी बोलण्याची संधी मिळत असे, तसा मी त्यांना त्यांच्या कॉलेज जीवनाविषयी, मुंबईतल्या दिवसांविषयी, दै. ‘गोमन्तक’मधील दिवस, ‘मांडवी’च्या काळातील अनुभवांविषयी विचारीत असे. तेही मग रंगात येऊन अनेक प्रसंग, अनेक किस्से खुलवून सांगत असत.
काकांचा जन्म १७ मे १९३४ साली अस्नोडा येथे झाला. त्यांचे पितृतुल्य बंधू कै. शिवराम कामत- त्यांना सर्व भावंडे दादा म्हणत- मुंबईला नोकरीला होते. त्यांनी आपल्या सर्व भावंडांना शिक्षणासाठी मुंबईला विलेपार्ले येथे नेले. मुंबईला काकांनी मुंबई विद्यापीठाची एम.ए. पदवी प्राप्त केली. त्याचप्रमाणे फावल्या वेळेत ते आकाशवाणीवर पुष्कळ लेखन करीत. आकाशवाणीत त्यांनी अनेक श्रृतिका सादर केल्या. त्यांची ‘गोफ’ ही संगीत नाटकातील विविध गाजलेली पात्रे घेऊन सादर केलेली श्रृतिका तेव्हा फारच गाजली होती.
त्या लहान वयात, संस्कारक्षम वयात पु.लं.शी झालेली भेट ते खूप रंगवून सांगत असत. पु.ल.ही तेव्हा पार्ल्यात राहत असत. त्यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांनी दिलेला सल्ला- ‘आयुष्यात एक निश्चित ध्येय बाळग आणि ते पूर्ण करण्याचा ध्यास ठेव’- खूप मोलाचा ठरला, असे काका सांगत. ‘फार मोठ्या मनाचा माणूस,’ असे गौरवोद्गार काढत.
पदवीपर्यंत काकांचे शिक्षण मुंबईला रूपारेल कॉलेजमध्ये पार पडले. मराठी आणि संस्कृत विषय घेऊन त्यांनी मुंबई विद्यापीठाची बी.ए. पदवी प्राप्त केली. नंतर १९६० ते १९६२ या दोन वर्षांत एम.ए.च्या अभ्यासकाळात त्यांना खूप चांगले मार्गदर्शक भेटले, चांगले मित्र लाभले. काका सांगत ः ‘फोर्टमधल्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये आणि चौपाटीवरील विल्सनमध्ये आमचे एम.ए.चे वर्ग भरत असत. केशव मेश्राम, अशोक दामोदर रानडे, प्रा. एस. एस. नाडकर्णी हे माझे सहाध्यायी होते.’
गोवा मुक्तीनंतर काका गोव्यात आले. दै. ‘गोमन्तक’चे तत्कालीन संपादक कैै. बा. द. सातोस्करांनी त्यांना आपल्या दैनिकात बोलावून घेतले. उपसंपादक म्हणून दै. ‘गोमन्तक’मध्ये रूजू झाल्यावर ‘दादांच्या हाताखाली खूप काही शिकायला मिळाले’ असे काका सांगत. दादा सातोस्करांबद्दल ते आणि माझे वडीलही नेहमी आदराने बोलत असत/असतात.
पण दै. ‘गोमन्तक’मध्ये केवळ रुक्ष बातम्यांच्या पसार्यात त्यांच्या संवेदनशील मनाचा कोंडमारा होऊ लागला. विविध वृत्तसंस्थांकडून येणार्या बातम्या अनुवादित करून छापायच्या या साचेबद्ध कामात त्यांना रस नव्हता. स्वतःचे असे वाङ्मयीन नियतकालिक असावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती.
त्याच ध्यासातून ‘मांडवी’ मासिकाचा पार नदीकाठी जन्म झाला. आपले बंधू जयराम कामत त्यांच्या सहकार्याने अतिशय कठीण परिस्थितीत पण अत्यंत निष्ठेने त्यांनी ‘मांडवी’ हे कला, साहित्य, संस्कृती आणि राजकारण अशा विविध विषयांना वाहिलेले मासिक ७-८ वर्षे चालविले. मेजर कँडेथ भारतीय राष्ट्रध्वज फडकावित असलेल्या छायाचित्राने ‘मांडवी’च्या पहिल्या अंकाचा शुभारंभ झाला. भारतीय राष्ट्रध्वज फडकावून जशी गोमंतकाची पोर्तुगीज राजवटीतून राजकीय मुक्तता झाली, तशीच नवीन मुक्त साहित्यिक, वाङ्मयीन विचारधारा आणि अभिरूची रुजविण्याचे काम मांडवी येणार्या काळात करणार, याचेही ते द्योतक असावे.
त्याकाळी महाराष्ट्रात ‘सत्यकथा’, ‘अनुष्टुभ’, ‘युगावाली’, ‘प्रतिष्ठान’ यांसारखी अनेक प्रतिष्ठित नियतकालिके प्रसिद्ध होत असत. त्या दर्जेदार नियतकालिकांच्या पंगतीत गोव्यातील, तेही अस्नोड्यासारख्या आडगावातून प्रसिद्ध होणार्या ‘मांडवी’ने मानाचे पान पटकाविले होते, हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. काकांच्या कष्टाचे, मेहनतीचे ते फळ होते. मांडवीत छापून येणार्या लेखांचा दर्जाही महाराष्ट्रातून प्रसिद्ध होत असलेल्या नियतकालिकांच्या तोडीचा असावा, किंबहुना ‘मांडवी’तील साहित्य इतर नियतकालिकांपेक्षा सरस असावे याकडे त्यांचा कटाक्ष असे.
काकांनी आठ वर्षे नेकीने मांडवीचा संसार चालवला. पण नंतर काही अपरिहार्य कारणामुळे जड अंतःकरणाने त्यांनी ‘मांडवी’ बंद करण्याचा निर्णय घेतला. ‘मांडवी’ने वेळोवेळी अनेक निमित्ताने काढलेले विशेषांक आजही लोकांच्या स्मरणात आहेत. काकांनी ‘मांडवी’चा पहिला विशेषांक प्रसिद्ध केला होता तो गोमंतक साहित्य संमेलनाचे औचित्य साधून. त्यानंतर ह. ना. आपटे जन्मशताब्दी, केशवसुत जन्मशताब्दी, मामा वरेरकरांची ८० वर्षे, बा. भ. बोरकरांची षष्ट्यब्दीपूर्ती अशा अनेक विशेषांकांची मेजवानी त्यांनी साहित्यरसिकांना दिली. त्यांतील अनेक विशेषांक विशेषतः केशवसुत विशेषांक आणि बोरकर षष्ट्यब्दीपूर्ती विशेषांक आजही त्या-त्या विषयाच्या अभ्यासकांना संदर्भग्रंथ म्हणून मार्गदर्शन करतात आणि या गोष्टीचा काकांना अतिशय अभिमान होता. ‘मांडवी’ मासिकाचा प्रत्येक अंक हा काकांच्या उच्च दर्जाच्या संपादकीय कौशल्याची प्रचिती देणारा असे.
‘‘मांडवीचे काम थांबल्यानंतर आपण साहित्यक्षेत्रात काहीतरी अभिनव आणि चिरकालीन टिकणारे काम करावे अशी माझी इच्छा होती. नेमके काय करावे ते सुचत नव्हते. पणजीतील सेंट्रल लायब्ररीत बसून मी वाचन करीत असे. एक दिवस महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी संपादित केलेला ‘चरित्रकोश’ माझ्या हाती लागला आणि त्याच क्षणी माझ्या नजरेसमोर भावी आयुष्यात हाती घ्यायच्या कामाची दिशा स्पष्ट झाली….’’ कोशकार्याच्या निर्मितीविषयी बोलताना काका सांगत.
मानवी जीवनाला स्पर्श करणार्या विविध शाखांमधील अतुलनीय काम केलेल्या विश्वातील व्यक्तींची माहिती संग्रहित करून, आजपर्यंत कुठल्याही भारतीय भाषांत तयार झाला नाही असा ‘विश्वचरित्रकोश’ मराठीत निर्माण करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. वाईला जाऊन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सहकार्याने त्यांनी कच्चा आराखडा तयार केला. श्वसूर आणि थोर कवी बा. भ. बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली १७ सप्टेंबर १९७७ रोजी विश्वचरित्र संशोधन केंद्र, गोवा नावाचा न्यास स्थापन केला. आळंदीला ज्ञानोबा माऊलींच्या अन् देहूला तुकोबांच्या चरणी माथा टेकवून त्यांनी विश्वचरित्रकोशाच्या शिवधनुष्यास हात घातला, आणि त्या दिवसापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत हा माणूस अक्षरशः विश्वचरित्रकोश जगत होता.
मुळात कोशकार्यासाठी आवश्यक असणारे जिद्द, चिकाटी आणि संशोधनाची आवड हे गुण त्यांच्यात होते. त्याचबरोबर ‘मांडवी’च्या संपादनामुळे महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांशी त्यांची चांगली ओळख झाली होती. त्यामुळे म. म. दत्तोवामन पोतदार, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पं. महादेवशास्त्री जोशी, पु. ल. देशपांडे, यदुनाथ थत्ते यांसारख्या दिग्गज आणि बुद्धिवंत सारस्वतांच्या अनुभवाचा आणि मौलिक मार्गदर्शनाचा काकांना वेळोवेळी लाभ झाला.
साहित्य, संगीत, चित्रपट, क्रीडा, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान इ. मानवी जीवनाशी निगडीत वेगवेगळ्या ७३० अंगांतील हजारो मान्यवरांची यादी त्यांनी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या साहाय्याने तयार केली. त्याला चाळणी लावून, वेगवेगळे निकष लावून त्यांची लघुयादी तयार केली. आसेतुहिमाचल विखुरलेल्या अभ्यागत तज्ज्ञ संपादकांकडून त्यांच्यावर नोंदी तयार करून घेतल्या. तज्ज्ञांकडून आलेल्या नोंदीवर योग्य ते संपादकीय संस्करण करून त्या विश्वचरित्रकोशात समाविष्ट केल्या. मराठी विश्वकोशाच्या आकाराचे एक हजाराहून अधिक पृष्ठसंख्या असलेले सहा खंड तयार करण्याची त्यांची योजना होती. केंद्र सरकारच्या संस्कृती विभागातर्फे संशोधनकार्यासाठी काकांना १९८०-८१, ८१-८२ यासाठी छात्रवृत्ती प्राप्त झाली होती.
महाराष्ट्र सरकारने विश्वकोश निर्मितीसाठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाईला तर्कतीर्थांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केले होते. गोव्यात मात्र त्याच तोडीचे काम श्रीराम कामत एकहाती करत होते. त्यांना या सर्व प्रवासात खंबीरपणे जर कुणी साथ दिली असेल तर ती त्यांच्या पत्नीने- काकीने. आपले काम आटोपून त्या वेळोवेळी कोशाच्या कामात काकांना मदत करीत असत.
विश्वचरित्रकोशाचे काम पुढे नेताना काका कोशाच्या मुख्य संपादकपदापासून ते कारकुनापर्यंतची सर्व कामे स्वतःच करीत. सरकारी अनुदानासाठी शासकीय अधिकार्यांना भेटण्यापासून ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यापर्यंत, वेगवेगळ्या विषयांच्या संपादकांना वेळोवेळी पत्रे लिहिण्यापासून आलेल्या नोंदी व्यवस्थित फायलिंग करण्यापर्यंत, संस्थेचे आर्थिक व्यवहार सांभाळण्यापासून ते संस्थेच्या प्रशासकीय कामाचा पासरा आवरण्यापर्यंत सर्व कामे त्यांना स्वतःलाच करावी लागत. सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंत सतत ते कामात व्यग्र असत.
कवी बोरकरांनंतर प्राचार्य गोपाळराव मयेकर, डॉ. सदाशिव देव, प्रा. में. पु. रेगे, डॉ. रघुनाथराव माशेलकर यांसारख्या दिग्गजांनी विश्वचरित्रकोश मंडळाचे अध्यक्षपद भूषविले.
दरम्यानच्या काळात काकांची बायपास सर्जरी बेळगाव केएलईमध्ये करण्यात आली. आपल्या जबर इच्छाशक्तीच्या बळावर आणि कोशकार्याच्या ध्यासाने ते त्यातूनही लवकर बाहेर पडले. सर्व प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत २००० सालच्या अक्षयतृतीयेच्या दिनी (६ मे २०००) या अक्षय कोशाच्या प्रथम खंडाचे प्रकाशन प्राचार्य राम शेवाळकर यांच्या हस्ते झाले.
या प्रकाशन सोहळ्यावेळी घडलेला एक प्रसंग तर अजूनही माझ्या हृदयावर कोरला गेला आहे. वक्तादशसहस्रेषु, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष, विद्यावाचस्पती प्रा. रामभाऊंनी खंडाचे प्रकाशन झाल्यावर काकांना वाकून चरणस्पर्श केला. काकाच नव्हे तर सभागृहातील सर्व उपस्थित अक्षरशः अवाक झाले. काका तर जागच्या जागी थिजून गेले. ‘‘अहो रामभाऊ, हे तुम्ही काय करताय?’’ काका म्हणाले. ‘‘श्रीरामभाऊ, कोशकार्य हे अक्रोडची शेती करण्यासारखे आहे. ते लावणार्याला त्याची फळे चाखायला मिळत नाहीत. पण त्याच्यासाठी अपार कष्ट आणि अखंड मेहनत घ्यावी लागते. हा नमस्कार तुमच्या कार्याला!’’
त्यानंतर दर दोनेक वर्षांनी प्रत्येक नवीन खंडाचे प्रकाशन होऊ लागले. मध्यंतरी काकांना केपे येथे भरलेल्या अखिल गोमंतकीय साहित्य संमेलनात मानाचे सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर म्हापसा येथे भरलेल्या २६ व्या अखिल गोमंतकीय सा. संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
सर्वकाही सुरळीत चालू होते. चौथा खंड प्रकाशित झाल्यानंतर पाचवा खंड प्रकाशित होण्याच्या अंतिम टप्प्यात असताना अचानक काकांच्या सहधर्मचारिणी, त्यांच्या जीवनातील सर्व प्रसंगांत त्यांना साथ देणारी, कोशकार्यात आपल्या परीने खारीचा वाटा उचलणारी काकी त्यांची साथ सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेली. आम्हा सर्वांसाठी तो मोठा आघात तर होताच, पण वैयक्तिक जीवनात प्रत्येक क्षणी सीतेप्रमाणे साथ देणार्या पत्नीचा वियोग हा या श्रीरामासाठी प्रचंड मोठा धक्का होता.
कोशनिर्मितीचा अखंड ध्यास घेतलेल्या काकांनी हेही दुःख पचविले. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी ठरलेल्या वेळापत्रकानुसार पाचवा खंड पूर्ण केला. माशेल येथे भरलेल्या २७ व्या अखिल गोमंतकीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर त्या खंडाचे सन्मानाने प्रकाशन करण्यात आले.
त्यानंतर काका शेवटच्या खंडाच्या कामाला लागले. त्याच दरम्यान त्यांनी बा. भ. बोरकर जन्मशताब्दीनिमित्तानेही एक मोठा प्रकल्प हाती घेतला होता.
मे २००९ मध्ये आम्ही कुटुंबीयांनी त्यांची पंचाहत्तरी साजरी करायची असे ठरविले. काका कसेच तयार होईनात. म्हणाले, ‘‘अरे ही गेल्यापासून कुठंच मन लागत नाही. ही असती तर मी आनंदाने तयार झालो असतो. ‘कळ्यांचाही वास जीवा जाहलासे फास, एकाकी प्रवास आता उदास उदास’ अशी अवस्था झाली आहे.’’ काका डोळ्यांत पाणी आणून म्हणाले, ‘‘एवढं सहाव्या खंडाचं प्रकाशन होऊ दे, आणि बोरकर जन्मशताब्दीनिमित्ताने हाती घेतलेला प्रकल्प पूर्ण होऊ दे, मग मी मरायला मोकळा. त्यानंतर एकही दिवस जगायची इच्छा नाही बघ माझी.’’
सहाव्या खंडाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. फक्त शेवटचा हात फिरवण्याचे काम बाकी होते. जानेवारी २०१० च्या शेवटच्या आठवड्यात त्यांना अस्वस्थ वाटू लागले. १९९६ साली बेळगावला केएलईत डॉ. दीक्षितांनी त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया केली होती. त्या डॉ. दीक्षितांकडे जाण्याचा त्यांचा मानस होता. बेळगावला जायच्या आदल्या दिवशी रात्री त्यांनी आपल्या सर्व भावंडांना फोन करून निरोप घेतला. मग माझ्याशीही बोलले. काका अगदी निरवानिरवीची भाषा करत होते. म्हटलं, ‘‘काका, तुम्ही ठीक होऊन परत याल. १७ मेला तुमच्या वाढदिनी आपण सहाव्या खंडाचं प्रकाशन करू.’’ पण ते होणे नव्हते.
बेळगावला जाताना त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. सहा दिवस ते आयसीयूत होते. प्रकृतीत सुधारणा होत होती, आणि अचानक कुणाच्याही ध्यानीमनी नसताना त्यांनी १५ फेब्रुवारीला इहलोकीचा निरोप घेतला.
हा मर्मांतक धक्का पचवून विश्वचरित्रकोश मंडळाचे सल्लागार संपादक सुरेश र. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाव्या खंडाचे काम पूर्ण केले गेले. जुलै २०१० मध्ये या सहाव्या खंडाचे प्रकाशन कला अकादमीत करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यात एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यांत आसू अशी आमची अवस्था होती.
आनंद या गोष्टीचा की ज्यासाठी काकांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले तो यशाचा, सार्थकाचा क्षण येऊन ठेपलाय यासाठी, आणि दुःख यासाठी की हा सोनियाचा दिन पाहायला, प्रत्यक्ष हरिदर्शनाचा, साफल्याचा क्षण अनुभवायला काका आमच्यात नाहीत याचं.
बोरकरांचे शब्द आहेत- ‘देखणे पाऊल जे ध्यासपंथी चालती…’ या अशाच ध्यासपंथी चाललेल्या पावलांना त्यांच्या ८० व्या जयंतीदिनी भावपूर्ण वंदना.

