ध्यान : अंतर्मनाच्या शांततेचा आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग

0
25
  • डॉ. मनाली महेश पवार

आजच्या धकाधकीच्या युगात प्रत्येकाने दिवसातून काही मिनिटे ध्यानासाठी दिल्यास केवळ वैयक्तिक आरोग्यच नव्हे, तर कुटुंब, समाज आणि कार्यक्षेत्रातील संबंधही अधिक सुदृढ होतील. अंतर्मनातील शांतता शोधायची असेल तर ध्यान हीच खरी गुरुकिल्ली आहे.

योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारे विज्ञान आहे. महर्षी पतंजली यांनी योगाची अष्टांग पद्धत सांगितली आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी ही आठ अंगे आहेत. यांपैकी ध्यान हे सातवे अंग असून हा योगमार्गातील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी टप्पा मानला जातो. ‘धारणा’ म्हणजे मनाला एका विषयावर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न. तर त्या प्रयत्नातून निर्माण होणारा अखंड, सहज आणि अविरत मानसिक प्रवाह म्हणजे ध्यान.
आजच्या धावपळीच्या, तणावग्रस्त आणि माहितीच्या प्रचंड ओघात मन सतत अस्थिर, चिंताग्रस्त आणि थकलेले असते. मानसिक आरोग्याच्या समस्या, निद्रानाश, नैराश्य, चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव यांसारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत ध्यान ही केवळ आध्यात्मिक साधना नसून मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्य सुधारण्याची प्रभावी जीवनशैली ठरते.

ध्यान म्हणजे काय?
पतंजली योगसूत्रात ध्यानाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे-
तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम्‌‍॥ (योगसूत्र 3.2)
याचा अर्थ- धारणेच्या विषयावर चित्ताचा अखंड, एकसंध आणि अविरत प्रवाह राहणे म्हणजे ध्यान.
ध्यान म्हणजे विचारांना जबरदस्तीने थांबविणे नाही. विचार येतात, जातात; परंतु साधक त्यांच्यात गुंतत नाही. तो साक्षीभावाने त्यांचे निरीक्षण करतो आणि मन पुन्हा निवडलेल्या विषयाकडे सहजपणे वळते.

अष्टांग योगातील ध्यानाचे स्थान
ध्यानापूर्वी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि धारणा या सहा अंगांचा सराव आवश्यक आहे. शरीर स्थिर, श्वास संतुलित, इंद्रिये संयमी आणि मन एकाग्र झाल्यावरच ध्यान सहज शक्य होते. ध्यान परिपक्व झाले की समाधीची अवस्था प्राप्त होऊ शकते.

ध्यानाचे महत्त्व
मानवाचे मन हे त्याच्या सुख-दुःखाचे प्रमुख कारण आहे. अस्थिर मनामुळे ताण, भीती, राग, मत्सर आणि असंतोष वाढतो. ध्यानामुळे मन शांत, प्रसन्न आणि संतुलित होते.

ध्यानाचे प्रमुख लाभ-

  • मानसिक तणाव कमी होतो.
  • चिंता आणि अस्वस्थता कमी होते.
  • एकाग्रता वाढते.
  • स्मरणशक्ती सुधारते.
  • भावनिक संतुलन राखण्यास मदत होते.
  • आत्मविश्वास वाढतो.
  • झोपेची गुणवत्ता सुधारते.
  • निर्णयक्षमता आणि सर्जनशीलता वाढते.
  • सकारात्मक विचारसरणी विकसित होते.

ध्यानाचे प्रकार
योग आणि भारतीय परंपरेत ध्यानाच्या विविध पद्धती आढळतात.

  1. श्वास ध्यान
  • श्वासाच्या येण्या-जाण्याकडे जागरूकपणे लक्ष देणे.
  1. मंत्र ध्यान
  • ॐ, गायत्री मंत्र किंवा इष्टदेवतेच्या नामाचा जप करत मन स्थिर करणे.
  1. साक्षीभाव ध्यान
  • मनात येणाऱ्या विचारांचे केवळ निरीक्षण करणे.
  1. प्रेमभाव ध्यान (मैत्रीभाव)
  • स्वतःसाठी आणि सर्व जीवांसाठी शुभेच्छा व मंगलभाव निर्माण करणे.
  1. ईश्वर चिंतन
  • परमात्म्याच्या स्वरूपाचे चिंतन करून मन अंतर्मुख करणे.

ध्यान करण्याची योग्य पद्धत
सकाळी ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी शांत वेळ निवडावी. स्वच्छ, हवेशीर आणि शांत ठिकाणी बसावे. पद्मासन, सुखासन किंवा वज्रासनात स्थिर बसावे. पाठीचा कणा सरळ ठेवावा. काही मिनिटे दीर्घ श्वसन किंवा नाडीशोधन प्राणायाम करावा. डोळे हलकेच मिटून श्वास किंवा मंत्रावर लक्ष केंद्रित करावे. मन भरकटल्यास निराश न होता पुन्हा शांतपणे लक्ष केंद्रित करावे. सुरुवातीला 10 मिनिटे आणि नंतर हळूहळू 20-30 मिनिटांपर्यंत कालावधी वाढवावा.

आयुर्वेद आणि ध्यान
आयुर्वेदानुसार मन हे सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांनी प्रभावित होते. रजोगुणामुळे अस्थिरता, तर तमोगुणामुळे आळस आणि जडत्व वाढते. ध्यानामुळे सत्त्वगुणाची वृद्धी होते. त्यामुळे मन प्रसन्न, शांत आणि विवेकी बनते.
आयुर्वेदात प्रज्ञापराध, असात्म्येंद्रियार्थ संयोग आणि कालपरिणाम ही रोगांची प्रमुख कारणे सांगितली आहेत. ध्यानामुळे मन संयमी राहते, प्रज्ञापराध कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते.

आधुनिक विज्ञान आणि ध्यान
अनेक वैज्ञानिक संशोधनांमनुसार नियमित ध्यानामुळे ताण निर्माण करणाऱ्या हार्मोन्सचे प्रमाण कमी होते, रक्तदाब नियंत्रणात राहतो, हृदयाचे आरोग्य सुधारते, एकाग्रता वाढते आणि भावनिक संतुलन राखण्यास मदत होत असल्याचे आढळले आहे.
ध्यानाचा सकारात्मक परिणाम मेंदूतील स्मरणशक्ती, भावना आणि निर्णयक्षमतेशी संबंधित भागांवरही दिसून येतो.

विद्यार्थ्यांसाठी ध्यान
विद्यार्थ्यांमध्ये वाढता अभ्यासाचा ताण, स्पर्धा आणि डिजिटल विचलन लक्षात घेता ध्यान अत्यंत उपयुक्त आहे. याने अभ्यासात लक्ष केंद्रित होते, स्मरणशक्ती सुधारते, परीक्षेची भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो, शिकण्याची क्षमता वाढते.

महिलांसाठी ध्यान
घर, नोकरी, कुटुंब आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांवर मानसिक ताण अधिक असतो. ध्यानामुळे भावनिक स्थैर्य, मानसिक शांतता आणि संयम वाढतो.

ज्येष्ठ नागरिकांसाठी
ध्यानामुळे एकटेपणा, चिंता आणि नकारात्मक विचार कमी होतात. मन प्रसन्न राहते आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो.

ध्यानाबाबतचे काही गैरसमज
अनेकांना वाटते की ध्यान म्हणजे फक्त संन्याशांसाठी किंवा वृद्धांसाठी आहे. प्रत्यक्षात ध्यान प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी उपयुक्त आहे. ध्यान म्हणजे विचार पूर्णपणे बंद करणे नाही, तर विचारांकडे साक्षीभावाने पाहण्याची कला आहे.

दैनंदिन जीवनात ध्यानाचा समावेश

  • दिवसातून किमान 15 मिनिटे ध्यानासाठी राखून ठेवा.
  • मोबाईल आणि इतर डिजिटल साधनांपासून काही वेळ दूर रहा.
  • शांत वातावरणात नियमित सराव करा.
  • सातत्य ठेवा; परिणाम हळूहळू जाणवतात.
  • योग्य आहार, पुरेशी झोप आणि प्राणायाम यांची जोड द्या.

ध्यान ही मनाला शांत, स्थिर आणि जागरूक बनविणारी प्रभावी साधना आहे. महर्षी पतंजलींनी सांगितलेल्या अष्टांग योगातील सातवे अंग म्हणून ध्यानाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. नियमित ध्यानामुळे शरीर, मन आणि बुद्धी यांचा समतोल साधला जातो. तणाव, चिंता आणि अस्थिरता यांवर मात करून आनंदी, निरोगी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी ध्यान हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे.
आजच्या धकाधकीच्या युगात प्रत्येकाने दिवसातून काही मिनिटे ध्यानासाठी दिल्यास केवळ वैयक्तिक आरोग्यच नव्हे, तर कुटुंब, समाज आणि कार्यक्षेत्रातील संबंधही अधिक सुदृढ होतील. अंतर्मनातील शांतता शोधायची असेल तर ध्यान हीच खरी गुरुकिल्ली आहे.